या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३९ गोपाळ गणेश आगरकर

जीवनाचे भक्त असतात. ते शब्दांचे अथवा संकेतांचे दास होत नाहीत. आणि म्हणूनच मानवी जीवनाला खुरटवून टाकणाऱ्या जुन्या सांकेतिक नीतिविरुद्ध ते हत्यार उपसतात. नीतिमूल्यें हीं केवळ परंपरापुनीत असतां उपयोगी नाहीत, तीं बुद्धिगम्य असलीं पाहिजेत, एवढेंच काय तें त्यांचे म्हणणें असतें. जुनीं धर्मनिष्ठ नीतिमूल्यें काय किंवा नवीं अर्थनिष्ट नीतिमूल्यें काय, दोन्हींही विषमता निर्माण करणारी असल्यामुळें आणि ती विषमता सामान्य मनुष्याचा विकास कुंठित करून त्याच्या कपाळीं पिंढयान् पिढ्या गुलामगिरी लादीत असल्यामुळें, खऱ्या सुधारकाला समाजांत चाललेला या मूल्यांचा उदोउदो कधींही सहन होत नाहीं. नीतिमूल्यें हीं मुख्यतः दया आणि न्याय यांच्यावर उभारलीं गेलीं पाहिजेत, परलोक आणि पैसा यांच्यावर आधारलेल्या मूल्यांच्या चौकटींत जीवनाचें चित्र कापून वेडेंवांकडें करून बसविण्याचा प्रयत्न करणें हा नुसता मूर्खपणा नाहीं, तो अखिल मानव जातीविरुद्ध केलेला अक्षम्य गुन्हा आहे, असें त्याला मनःपूर्वक वाटत असतें. 'समाजाच्या सर्व प्रकारच्या कल्पना आणि आचार यात कालानुरूप फेरबदल होत गेल्याखेरीज त्याची प्रकृति निरोगी राहणार नाहीं, जे लोकं अशा प्रकारच्या दशांतरास विरोध करतात ते त्याचे हितशत्रु होत' असें प्रतिपादन करून आगरकरांनी जुन्या धर्मनिष्ठ नीतिमूल्यांचा जसा धिक्कार केला आहे, त्याप्रमाणें इंग्रजासारख्या साम्राज्यवादी राज्यकर्त्यांना ' हिंदुस्थानचे राज्य तुम्हांस कष्टावह झालें असलें तर तें तुम्ही सोडून का देत नाहीं ?’ असा खोंचक प्रश्न विचारून नव्या अर्थनिष्ठ नीतिमूल्यांचा घातकपणाही त्यांनीं सूचित केला आहे. नीतिमूल्यें हीं धर्मनिष्ठ किंवा अर्थनिष्ठ असूं नयेत,तीं जीवननिष्ठच असली पाहिजेत, जीवन जसजसें बदलत जाईल तसतसा त्या मुल्यांतही फरक होणें अपरिहार्य आहे, ही आगरकरांची भूमिका जो ध्यानांत घेईल त्याला निरनिराळ्या ठिकाणीं विषयानुरोधानें त्यांनीं जे बहुमोल विचार प्रदर्शित केले आहेत ते सुसंगत रीतीनें एकत्र करून त्यांच्या तत्त्वज्ञानाची ओळख करून घेणें कठिण जाणार नाहीं. हें तत्त्वज्ञान महाराष्ट्रातल्या मध्यम वर्गापुरतें मर्यादित होतें असें खाली दिलेलीं त्यांचीं पांच सूत्रे वाचल्यावर कोण म्हणूं शकेल ?