या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार ४० (१) विचार करणारे, उपभोग घेणारे व काम करणारे असे जे सांप्रतकालीं प्रत्येक देशांत तीन ठळक वर्ग दृष्टीला पडतात ते कायमचे नव्हत. हळु हळु प्रत्येक व्यक्तीस विचार,उपभोग,आणि काम हीं समप्रमाणांत करावी लागून, साऱ्यांच्या सुखानुभवाची इयत्ता सारखी होत जाणार आहे,व जों जों ती तशी होईल तों तों मनुष्याची खरी उन्नति होऊं लागली असें म्हणतां येईल. (२) मनुष्यतेचें ऐहिक सुखवर्धन या सार्वत्रिक भावी धर्माची ज्यांनीं दीक्षा घेतली असेल त्यांनी कोणास न भितां आपल्या मनास जें शुद्ध, प्रशस्त व कल्याणप्रद वाटत असेल तें दुसऱ्यास सांगावें आणि तदनुसार होईंल तेवढें आचरण करावें. (३) कोटिक्रमाचीं अस्त्रे पडताळून जो वादाला बसला तो आपल्या खऱ्या मतांची दाद सहसा लागूं द्यायचा नाहीं. आळस,निरुद्योगीपणा, धनातितृष्णा, परस्त्री-किंवा परपुरुष-चिंतन या गोष्टी अत्यंत त्याज्य आहेत हें कोणत्या सुशिक्षित स्त्रीस किंवा पुरुषास कळत नाहीं? किंवा त्या तशा आहेत असें बोलण्यांत किंवा लिहिण्यांत कोण नाहीं म्हणत नाहीं? तथापि या अमंगळ गोष्टींचा आपणांस विटाळ झाला नाहीं असें किती स्त्रिया व पुरुष छातीला हात लावून म्हणूं शकणार आहेत ? तात्पर्य, मनुष्याच्या वास्तविक स्थितींत व जाणून बुजून दुसऱ्यापुढें यांचें जें बोलणें चालणें होत असतें त्यांत बरेंच अंतर असतें. हें अंतर नाहींसें होत जाणें व सर्व काळीं त्यांचें एकच स्वरूप दिसूं लागणें हें एक त्यांच्या सुधारणेचें व्यंजक होय. (४) सध्यां अगदीं भिन्न अशा दोन सुधारणांचें आमच्या देशांत संघटन झालें असल्यामुळे उभयतांचा मोठा संग्राम माजून राहिला आहे. हिंदु सुधारणेत जेवढा चांगला भाग आहे तेवढा गमावण्याची कोणासही भीति नको. जें चांगले आहे तें कोणीही टाकीत नाहीं...फार थोड्या काळांत पूर्वपश्चिम सुधारणेंतील अत्यंत हितकारक भाग जींत सामील झाले आहेत अशा एका नामी सुधारणेची येथें स्थापना होऊन भारतीय आर्य अननुभूतपूर्व अशा आधिभौतिक व आध्यात्मिक सुखाचा उपभोग घेऊं लागतील.