या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोपाळ गणेश आगरकर

(५) हा अज्ञानरोग सर्व शारीरिक रोगांच्या मुळाशीं आहे. इतकेंच नाहीं तर झाडून साऱ्या मानुषीय विपत्तींचें हाच बीज आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. मनुष्याचा व्यवहार सुरळीत चालण्यास व उत्तरोतर त्याचें पाऊल पुढें पडत जाण्यास ज्ञानवृध्दि व ज्ञानप्रसार यांसारखें साधन नाहीं. १२ आगरकरांच्या लिखाणांत विखुरलेलीं असलीं विचारसंपन्न सूत्रें वाचली म्हणजे त्यांचा द्रष्टेपणा मनाला पुरेपूर पटतो. त्यांनीं मार्क्स वाचला नसेल. पण समतावादाचे महाराष्ट्रांतले ते पहिले बुद्धिवादी पुरस्कर्ते आहेत. एका हातांत समतेचा ध्वज आणि दुसऱ्या हातांत बुद्धिवादाचें खङ्ग घेऊन आयुष्यभर एकाकी लढत असतांनाही त्यांनी कधीं कच खाल्ली नाहीं, माघार घेतली नाहीं, निराशेची पुसट छाया सुद्धां आपल्या मनावर पडूं दिली नाहीं. न्यायमूर्ति रानड्यांची अष्टपैलु बुद्धिमत्ता त्यांच्यापाशीं नव्हती. पण रानड्यांच्या अंगीं नसलेलें वीरत्व आगरकरांमध्यें विपुलतेनें वास करीत होतें. लोकहितवादी व जोतीराव फुले यांची समाजसुधारणेची तळमळ आगरकरांच्यापेक्षां कमी तीव्र होती असें म्हणतां येणार नाहीं. पण सामाजिक तत्त्वज्ञानाची बैठक आणि वाङ्मयीन प्रतिभेची झळाळी या दोन्ही गुणांत ते आगरकरांच्या मानानें फिक्के वाटतात. लोकमान्य टिळकांनीं आगरकरांच्या मृत्यूनंतर पाव शतक हिंदी राजकारणाचें तेजस्वी नेतृत्व केलें. असामान्य पांडित्य आणि अलौकिक वीरत्व यांचा संगम त्यांच्या ठिकाणीं झाला होता. पण राष्ट्रपुरुष या नात्यानें टिळक कितीही मोठे असले तरी त्यांच्या स्वातंत्र्यवादांत सर्वस्पर्शी सामाजिक क्रांतीला अतिशय गौण स्थान होतें. नव्या जगाचीं, नव्या समाजरचनेचीं, सामान्य मनुष्याच्या संपूर्ण विकासाची आणि त्याच्या उद्यांच्या सुखी संसाराचीं स्वप्नें टिळकांना सहसा पडत नसत. ती पाहण्याकडे त्यांची प्रवृत्तीच नव्हती. त्यांची प्रतिभा पंडिताची होती, ती महाकवीची नव्हती!त्यांचे वीरत्व लढवय्याचे होतें; तें संतांचें वीरत्व नव्हतें!