या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार असतात. कोणत्याही गोष्टीकरतां मानेवर खडा ठेवून घेऊन किंवा भूकतहान वगैरे पडतील ते हाल सोसून श्रम करण्याचा त्यांचा मगदूर नसतो.व्याख्यानास जावें, गोड गोड बोलावें, पांचचार वर्तमानपत्रांस किंवा एखाददुसऱ्या पुस्तकास उदार आश्रय द्यावा; मनाची फारच प्रसन्नता असल्यास एखादें छोटेखानी व्याख्यान झोडावें किंवा लहान आर्टिकल खरडावें; आणि फारच झालें तर प्रसंगविशेषीं ज्यानें त्यानें पवित्र मानलेल्या कामाकरतां रुपया दोन रुपये वर्गणी द्यावी, इतकें केलें म्हणजे बहुतेकांची शिकस्त होते.’ सामान्य मनुष्य असा असतो हें गांधीजीही नाकबूल करणार नाहींत. पण तो तसा राहिला आहे म्हणूनच बुद्ध-ख्रिस्तांना पूज्य मानणारीं राष्ट्रें आज राक्षसी संहारांत आनंद मानीत आहेत आणि एकीकडे वैभवाचीं गगनचुंबी शिखरें व दुसरीकडे दारिद्र्याच्या खोल खोल दऱ्या असली भीषण दृश्यॆं जगांत दृष्टीला पडत आहेत, असें ते म्हणतात. निसर्ग, समाज आणि आत्मा हे मनुष्याचे जेवढे मोठे मित्र तेवढेच मोठे शत्रु आहेत. या तीन शत्रूंपैकीं निसर्ग आणि समाज यांच्याशीं लढण्याचें शिक्षण सामान्य मनुष्याला आतांपर्यंत थोडें फार मिळालें आहे. पण तो स्वतःशीं लढायला मात्र अद्यापि शिकलेला नाहीं.सामाजिक हिताच्या दृष्टीनें या तिन्ही शत्रूंशीं लढण्याइतकी त्याची तयारी झाली तरच यापुढें मानवता सुखीं होऊं शकेल असा गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा रोख आहे. आज आगरकर असते तर त्यांनी गांधींच्या कर्तृत्वाचें आणि आशावादाचें कौतुक केले असतें. पण क्रांतीच्या शिखराकडे जाणारा सरळ व बुद्धिग्राह्य मार्ग म्हणून रशियांतल्या समाजवादाचें आभिनंदन करण्याला ते मुळींच चुकले नसते. १३ आज आगरकर असते तर! किती विचित्र कल्पना वाटते ही! आगरकरांच्या बरोबरीचे लोकमान्य टिळक!जवळ जवळ पंचवीस वर्षें अभूतपूर्व राजकीय कर्तृत्व गाजवून ते गेले. ते गेल्याला सुद्धां पंचवीस वर्षें झालीं. एक पिढी मागे पडली. अशा स्थितीत 'आगरकर असते तर?' या कल्पनेशीं चाळा करीत बसण्यांत काय अर्थ आहे ?