या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोपाळ गणेश आगरकर

आजच्या तरुण पिढीनें गरिबी व गुलामगिरी यांची वाढ करणारी जुनीं जीवनमूल्यें आणि जुनी समाजरचना ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारलें तर गेलें अर्धे शतक शब्दसृष्टींत तरंगत राहिलेलीं आगरकरांचीं अनेक सामाजिक सुखस्वप्नें सत्यसृष्टींत आणणारी शूर पिढी म्हणून इतिहास आदरानें तिचा उल्लेख करील. महाराष्ट्र दारिद्र्याबद्दल जितका प्रसिद्ध आहे तितकीच बंडखोरपणाबद्दलहि त्याची प्रख्याति आहे. या भूमींत सोनें पिकत नसलें तरी स्वातंत्र्यलालसेचा दुष्काळ कधीहि पडलेला नाही. या भूमीत हिऱ्याच्या खाणी नसल्या तरी मानवी रत्नें दुर्मिळ नाहींत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत या भूमीच्या सुपुत्रांनीं वेळोवेळीं बंडाचे निशाण उभारून बहुजनसमाजाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा केला आहे. समाजाला समजणाऱ्या भाषेमध्येंच त्याचें वाङ्मय निर्माण झालें पाहिजे, असें अट्टाहासानें सांगणारा एक संन्याशाचा मुलगा या भूमींत संतपदाला पोंचला आहे. आपला पिता एका मुसलमानी राज्यांतला श्रेष्ठ अधिकारी आहे याची जाणीव असूनही स्वातंत्र्याचें तोरण बांधणारा एक मिसरुड न फुटलेला क्षत्रिय युवक या भूमींत स्वराज्य-संस्थापक म्हणून गाजून गेला आहे. १८५७ सालीं याच भूमीचा अभिमान बाळगणाऱ्या

एका महाराष्ट्रीय अबलेनें प्रबल इंग्रजांना धूळ चारण्याचा चमत्कार करून दाखविला. महाराष्ट्राची ही बंडखोरपणाची परंपरा आगरकरांनीं  वैचारिक क्षेत्रापर्यंत आणून पोचविली. तिची ज्योत अखंड तेवत ठेवून तिच्या प्रकाशांत प्रगतीचा मार्ग आक्रमण्यानेच महाराष्ट्राचें उद्यांचें जीवन सुखी आणि सफल होईल.

१७-६-४५ कोल्हापूर. वि. स. खांडेकर 3\S