या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

४२

प्रकारचे पशुपक्षी संचार करीत आहेत; ज्यांत कोठें उष्ण कटिबंधांतली, कोठें शीत कटिबंधांतली व कोठें समशीतोष्ण कटिबंधांतली हवा खेळत आहे; सारांश, ज्यांतील कित्येक अत्यंत रमणीय प्रदेशांस ' अमरभूमि, नंदनवन, ' "इंद्रभुवन, ' ' जगदुद्यान' अशा संज्ञा प्राप्त झाल्या आहेत, असा हा आमचा हिंदुस्थान देश आधिभौतिक संपत्तीत कोणत्याही देशास हार जाईल, किंवा यांतील सृष्ट पदार्थांचा चित्रपट दुसऱ्या कोणत्याही देशाच्या चित्रपटापेक्षा कमी मनोरम ठरेल असें वाटत नाहीं.
 याप्रमार्णे सृष्ट पदार्थोच्या चित्रपटांचे अवलोकन करून पूर्ण समाधान पावल्यावर, दुसऱ्या पटाकडे वळल्याबरोबर चित्तवृत्तींत केवढा बदल होतो पहा ! या दुसऱ्या ऐतिहासिक चित्रपटाच्या केवळ लांबीचाच विचार केला, तर कदाचित् आमच्या पटाची लांबी सर्वात अधिक भरण्याचा संभव आहे. वैदिक कालापासून आजतारखेपर्यंत आम्हांस जितकीं शतकें मोजतां येणार आहेत, तितकीं बहुशः दुसऱ्या कोणत्याही देशास मोजता येणार नाहींत. या विस्तीर्ण कालावधीत अनेक राष्ट्रांची उत्पत्ति, अभिवृद्धि व लय होऊन तीं प्रस्तुत नामशेष मात्र राहिलीं आहेत; कांहींचा मुळींच मागमूस नाहींसा झाला आहे; व कांहींचा -हास झाला तरी त्यांनी संपादिलेल्या विद्यांचीं फळांचीं रूपांतरें कोटकोठें अद्यापि दृष्टीस पडत असल्यामुळे, तीं त्यांच्या भवाची साक्ष देत आहेत. ज्याप्रमाणें कांहीं वनस्पति व कीटक परिणतावस्था प्राप्त झाली असतां, आपलें तेन नूतनोत्पन्न अंकुरांत ठेवून आपण पंचत्वाप्रत पावतात, त्याप्रमाणें अमेरिकेतील व आशियांतील आणि विशेषतः युरोपांतील पुष्कळ राष्ट्रांची स्थिति झाली. ग्रीक विद्या आणि कला रोमन लोकांच्या हातीं पडून ग्रीस देशाचा अंत झाला. रोमन लोकांची सुधारणा अर्वाचीन युरोपीय राष्ट्रांकडे येऊन रोमन लोक नष्ट झाले. आशिया व अमेरिका यांतील जुन्या राष्टांचीही कांहीं अंशीं अशीच स्थिति झाली, व त्यांच्या सुधारणेच्या कांहीं खुणा अद्यापि कोठेंकोठें दृष्टीस पडतात. चीन व हिंदुस्थान हे दोन देश मात्र खूप जुने असून काळाच्या जबड्यांतून वांचले आहेत, व कदाचित् आणखीही अनेक शतके वाचण्याचा संभव आहे. पण अशा प्रकारच्या वांचण्यांत विशेष पुरुषार्थ आहे कीं काय हा मोठा विचारणीय प्रश्न आहे. अशा प्रकारचें केवळ वांचणें म्हणजे बऱ्याच अंशीं