या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार



प्रसंग गुदरला, तो या भारतीय आर्यशास्त्रेवर गुदरला नाहीं ! यामुळें हैं जरठ झाड कसे तरी अजून उभे आहे ! पण त्यांत कांहीं त्राण उरलेलें नाहीं ! तें आंतून अगदीं शुष्क होत आलें आहे, व त्याचें खोड व फांद्या डळमळू लागल्या आहेत. याला आतां असेंच उभे ठेवण्यास व यापासून नवीन शाखांचा उद्भव होऊन यास फिरून नवनावस्था आणण्यास एकच उपाय आहे. तो कोणता म्हणाल तर त्याची खूप खच्ची करून त्यास अर्वाचीन कल्पनांचें भरपूर पाणी द्यावयाचें ! असें केलें तरच त्याचें पूर्वस्वरूप पूर्ण नष्ट न होता, त्यापासून नूतन शाखावृत्त वृक्ष अस्तित्वांत येईल; पण तसें न केलें तर त्यावर प्रस्तुतकालीं चोहोंकडून जे तीव्र आघात होत आहेत, त्यां- खालीं तें अगदीं जेर होऊन, अखेरीस जमिनीवर उलथून पडेल.
 हिंदुस्थानचा पूर्व इतिहास व सांप्रत स्थिति सुधारकाच्या वाचकांच्या लक्षांत थोडक्यांत यावी, यासाठीं वर ज्या रूपकाचें साहाय्य घेतलें आहे, त्यापासून लेखकाचा भाव त्यांच्या मनांत उतरला असेल अशी त्याची आशा आहे. त्याचें स्पष्ट म्हणणे असे आहे कीं, हिंदू लोक रानटी अवस्थे- तून निघाल्यावर कांहीं शतकेंपर्यंत राज्य, धर्म, नीति वगैरे कांहीं शास्त्रे, वेदांत, न्याय, गणितादि कांहीं विद्या; व काव्य, गीत, नर्तन, वादनादि कांहीं कला यांत त्यांचें पाऊल बरेंच पुढे पडल्यावर त्यांच्या सुधारणेची वाढ खुंटली, व तेव्हांपासून इंग्रजी होईपर्यंत ते कसें तरी राष्ट्रत्व संभाळून राहिले! यामुळें त्यांचा इतिहासपट इतर देशांच्या इतिहासपटांहून फारच कमी मनोवेधक झाला आहे. आमची गृहपद्धति, आमची राज्यपद्धति, आमचीं शास्त्रे, आमच्या कला, आमचे वर्णसंबंध, आमच्या राहण्याच्या चाली, आमच्या वागण्याच्या रीति-सारांश इंग्रजी होईपर्यंत आमचें सारें व्यक्तिजीवित्व व राष्ट्रजीवित्व ठशांत घालून ओतलेल्या पोलादासारखे किंवा निबिड शृंखलाबद्ध बंदिवानासारखें, अथवा उदकाच्या नित्य आघातानें दगडाप्रमाणें कठिण झालेल्या लांकडांसारखे किंवा हाडकासारखे शेंकडों वर्षे होऊन राहिलें, असें म्हणण्यास हरकत नाहीं.
 ही आमची शिळावस्था आम्हांस पाश्चिमात्य शिक्षण मिळू लागल्यापासून _बदलूं लागली आहे. आजमित्तीस या शिक्षणाच्या टांकीचे आघात फारच थोड्यांवर घडत आहेत. पण दिवसेंदिवस ते अधिकाधिकावर घडूं लागतील