या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४५

सुधारक काढण्याचा हेतु




असा अजमास दिसत आहे. ज्यांना या टांकीपासून बराच संस्कार झाला आहे, ते समुदायापासून अगदीं विभक्त झाल्यासारखे होऊन, उभयतांत सांप्रतकाल एका प्रकारचें वैषम्य उत्पन्न झालें आहे. या वैषम्यास विशेष कारण कोण होत आहेत हे येथे सांगण्याची गरज नाहीं. येथें एवढंच सांगितलें पाहिजे कीं मूळ प्रकृति म्हणजे भारतीय आर्यत्व न सांडतां या पाश्चिमात्य नवीन शिक्षणाचा, व त्याबरोबर ज्या नवीन कल्पना येत आहेत त्यांचा आम्ही योग्य रीतीनें अंगीकार करीत गेलों, तरच आमचा निभाव लागणार आहे. या कल्पना आमच्या राज्यकर्त्यांकडून येत आहेत; म्हणून त्या आम्हीं स्वीकाराव्या असें आमचें म्हणणें नाहीं. त्यांचे अभिनंदन करून त्यांचा आपण अंगीकार केला पाहिजे, असें जें आम्ही म्हणतो, तें अशा- साठीं कीं, त्या शिक्षणांत व त्या कल्पनांत मनुष्यसुधारणेच्या अत्यवश्य तत्त्वांचा समावेश झाला आहे. म्हणून ज्या लोकांस लयास जावयाचे नसेल त्यांनीं त्यांचें अवलंबन केलेच पाहिजे; त्याशिवाय गत्यंतर नाहीं. समाजाचें कुशल राहून त्यास अधिकाधिक उन्नतावस्थायेण्यास, जेवढीं बंधने अपरि- हार्य आहेत, तेवढ कायम ठेवून बाकी सर्व गोष्टींत व्यक्तिमात्रास ( पुरुषास व स्त्रीस ) जितक्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतां येईल तितका घ्यावयाचा, हूँ अर्वाचीन पाश्चिमात्य सुधारणेचें मुख्य तत्त्व आहे, व है ज्यांच्या अंतःकरणांत बिंबले असेल त्यांना आमच्या समाजव्यवस्थेंत अनेक दोषस्थलें दिसणार आहेत, हे उघड आहे. ह्रीं दोषस्थले वारंवार लोकांच्या नजरेस आणावीं, तीं दूर करण्याचे उपाय सुचवावे, आणि युरोपीय सुधा- रणेंत अनुकरण करण्यासारखे काय आहे, तें पुनःपुन्हां दाखवावें, यास्तव हैं सुधारक पत्र काढलें आहे. कोणत्याहि वादग्रस्त प्रश्नाविषयीं जें लोकमत असेल, तें पुढे आणणे हेच काय तें पत्रकर्त्याचें कर्तव्य असें जे मानीत असतील, ते तसें खुशाल मानोत. लोकमत अमुक टप्प्यापर्यंत येऊन पोचलें आहे. सबब कोणत्याही व्यक्तीनें किंवा सरकारने त्यापुढे जाऊं नये, असें म्हणणे म्हणजे झाली आहे तेवढी सुधारणा बस आहे, पुढे जाण्याची गरज नाहीं, असेंच म्हणण्यासारखें होय. व्यक्तोनें किंवा सरकारने साधारणपणें लोकमतास धरून वर्तन करणें किंवा कायदे करणें हें सामान्य गोष्टींत ठीक आहे; पण कांहीं प्रसंगी लोकांच्या गाढ अज्ञानामुळें किंवा दुराग्रहामुळें,