या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

४६

व्यक्तीस लोकांची पवी न करितां स्वतंत्रपणे वर्तावें लागतें व सरकारास 'लोकमताविरुद्ध कायदे करावे लागतात. बारकाईचा विचार केला तर असें दिसून येईल कीं, प्रजासत्ताक राज्यांत सुद्धां अनेकदां बहुमताविरुद्ध अधि- कृत लोकांचें म्हणजे सरकारचें वर्तन होत असतें. तथापि सामान्यतः सर- काराचें वर्तन लोकमतास धरून असेल तितकें बरें. पण जे लोक हा सिद्धान्त कबूल करतात ते, लोकमत दिवसोंदिवस सुधारत चालले आहे, असें समज- तात. तेव्हां आतां असा प्रश्न उत्पन्न होतो की, लोकमताची सुधारणा व्हावी तरी कशी ? जो तो अस्तित्वांत असलेल्या लोकमतापुढे जाण्यास भिईल तर त्यांत बदल व्हावा कसा ? लोकाग्रणींनीं हें काम पत्करलें नाहीं तर तें कोणी पतकरावयाचें ? जो तो या लोकमताच्या बागुलबोवाला भिऊन दडून बसेल तर कोणत्याही समाजाला उन्नतावस्था येणार नाहीं; इतकेंच नाहीं, तर त्याची चालू स्थितीसुद्धां कायम न राहतां उलट त्यास उतरती कळा लागून अखेर त्याचा -हास होईल. म्हणून कोणी तरी अस्तित्वांत असलेल्या लोकमतांतील दोषस्थलें दाखविण्याचें, व समाजांतील बहुतेक लोकांस अप्रिय परंतु पथ्यकारक असे विचार त्यांच्यापुढे आणण्याचें, अभिमत काम करण्यास तयार झालेच पाहिजे. असें करण्यास लागणारें धैर्य या समाजांतील कांहीं व्यक्तींच्या सुद्धां आंगीं नसेल त्या समाजांनीं वर डोके काढण्याची आशा कधींही करूं नये. हे विचार बरोबर असतील तर त्यांवरून हे दिसून येईल कीं, जे कोणी कोणत्याही मिषानें किंवा रूपानें लोकांपुढे लोकाग्रणी म्हणून भिरखूं लागले असतील, त्यांनी लोकांची मर्जी संपादण्यासाठीं, अथवा त्यांजकडून आपली पाठ थोपटून घेण्यासाठीं, किंवा परोपकाराचें ढोंग करून स्वहित साधण्यासाठी त्यांच्या दोषांचें किंवा दुराग्रहांचें संवरण किंवा मंडन करणें अत्यंत लज्जास्पद होय. असे लोकाग्रणी त्यांस सुमार्ग न दाखवितां केव्हां एखाद्या खड्डयांत नेऊन घालतील हें सांगवत नाहीं. प्रस्तुत स्थितींत अशा लोकाग्रणींचे वर्तन आमच्या देशास फारच विघातक होणार आहे. ज्यांना समाजाच्या घटनेचीं, अभिवृद्धीचीं व लयाची कारणें ठाऊक नाहींत; कदा- चित् पितृतर्पणापुढें ज्यांचें ज्ञान गेलेले नाहीं; विषयोपभोगाशिवाय अन्य व्यवसाय ज्यांना अवगत नाहीं; वरिष्ठाची प्रशंसा आणि कनिष्ठाशीं गर्वोक्ति