या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५३

आमचे दोष आम्हांस कधीं दिसूं लागतील ?

ऊहापोह करतां येत नाहीं एवढीच नड आहे. नाहीं तर ग्रीक पुराणांतल्या आणि भारतीय पुराणांतल्या अनेक कथा घेऊन त्यांचें साम्य दाखविलें असतें; व त्यावरून त्या लोकांचे आणि आमचे आचार व विचार किती एकसारखे होते हैं वाचकांच्या डोळ्यांपुढे उभे केलें असतें. तथापि होमरच्या महा- काव्याचा आणि वाल्मीकींच्या रामायणाचा येथें उल्लेख करण्यास हरकत दिसत नाहीं. या दोन महाकवींच्या मुख्य कथानकांत इतकें साम्य आहे कीं, युरोपियन कवींचा स्वाभाविकपणे पक्षपात करूं इच्छिणाऱ्या कित्येक अर्वाचीन युरोपिअन पंडितांनी अशी शंका प्रदर्शित केली आहे की रामायणाचे कथानक भारतीय कवीनें बहुधा ग्रीक कवीच्या इलिअडपासून घेतलें असावें. रामायणांत ज्याप्रमाणे रामाची सीता रावणानें हरण करून नेली, व ती लंकेहून परत आणण्यासाठी रामानें राक्षसांशी तुंबळ युद्ध केलें; त्याप्रमाणेंच इलिअडमध्येही एका राजानें दुसन्या राजाची सुंदर स्त्री पळ- वून नेली, व ती फिरून काबीज करण्यासाठी त्या चंचल वनितेच्या नवऱ्यानें घनघोर युद्ध केलें, अशी मुख्य गोष्ट आहे. प्रधान कथानकांत एवढें साम्य दिसून आल्यावर तें एकानें दुसन्यापासून उचललें असावें, अशी शंका येणें स्वाभाविक आहे; आणि त्याप्रमाणे ती एका प्रसिद्ध जर्मन पंडिताला आली यांत कांहीं नवल नाहीं. पण अशा प्रकारच्या वादांत मूळ रचना कोणाची असावी; आणि तिचें अनुकरण करणारा कोण असावा याचा निर्णय कर- ण्याची मोठी मारामार पडते. कथानकाच्या साम्यावांचून दुसरा पुरावा नसेल तर वाचकांच्या किंवा टीकाकारांच्या तब्यतीप्रमाणें पाहिजे त्याकडे आद्यत्व देतां येतें ! ज्या वेळेस जर्मन पंडितानें रामायण होमरपासून उतरलें असावें असें आपलें मत दिलें त्या वेळेस वाल्मीकीपासून इलिअड उतरलें असावें असें मत देणेंही तितकेंच योग्य होणार आहे, असा विचार त्याच्या मनांत कसा नाहीं आला कोण जाणे ! कै. आ. मि. जस्टिस तेलंग यांनी आपल्या मनाला हाच प्रश्न घातला; आणि पुष्कळ शोध करून असें सिद्ध करून दाखविलें कीं होमर व वाल्मीकी यांपैकी एकानें दुसऱ्याची प्रत किंवा नक्कल केली असें म्हणणें शक्य असेल तर ती होमरनें म्हणजे ग्रीक कवीनें केली असावी, हें विशेष संभवनीय आहे ! ज्यांना या वादाविषय विशेष माहिती हवी असेल, व तो करण्यांत मि तेलंग यांनीं बुद्धीचें