या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

५६


तेथें आतां कदाचित् शंभर असतील; कधीं मुसलमानांपुढे घट्ट तुमान व लांब आंगरखा घालून कोपरापासून सलाम करीत पळावें लागत असेल, तर कधीं पाटलून व बूट चढवून आणि कोट घालून विलायतेच्या गोऱ्यांपुढें धांवावें लागत असेल; पूर्वी मर्जीविरुद्ध कर द्यावे लागत असले, तर आतां कदाचित् ते कायद्याने द्यावे लागत असतील; पूर्वीचे राज्यकर्ते उघड उघड पक्ष- पात करीत असले, तर आतांचे कदाचित् न्यायाच्या पांघरुणाआड करीत अस- तील - पण असल्या स्थित्यंतरास स्थित्यंतर म्हणावें किंवा नाहीं याचा आम्हांस बराच संशय आहे. अगदी अलीकडे लाखपन्नास हजार लोकांच्या आचार- विचारांत जें अंतर पडलें आहे तें सोडून द्या. तें पङ्कं लागेतोपर्यंत आमचा म्हणण्यासारखा काय फेरफार झाला होता, व या घटकेस देखील सामान्य लोकांच्या स्थितीत म्हणण्यासारखा काय फरक पडला आहे हें आम्हांस कोणी समजावून सांगेल तर आम्ही त्याचे मोठे आभारी होऊं. ' राजा कालस्य कारणम् ' राजा आई, राजा बाप, राजा करील ती पूर्वदिशा, लोक राजाचे गुलाम - ह्या ज्या आमच्या नीच राजकीय कल्पना त्या जशा राम- राज्यांत तशा अजूनही कायम आहेत, ज्याला ह्याचें प्रत्यंतर पाहिजे असेल त्यानें बडोदें, लष्कर, हैदराबाद, म्हैसूर वगैरे पाहिजे त्या लहान मोठ्या नेटिव संस्थानाची फेरी करून तेथील जुन्या पद्धतीच्या लोकांचे विचार व आचार कसे आहेत याची बारकाईने चौकशी करावी. या संस्थानच्या शास्त्यांपैकी एखाद्याने आपल्या प्रजेपैकीं एखाद्याला केवळ चेनीखातर चाबकाचा खरपूस मार दिला, अथवा राखेचा तोबरा चढवून पाठीवर भला मोठा दगड दिला, किंवा प्रसंगविशेष एखाद्याचे नाहीं तसले हाल करून खूनही केला तरी देखील भोगणाऱ्याचे आप्त किंवा इतर लोक आपल्या स्वामीविरुद्ध उठावयाचे नाहींत ! ही आमची राजभक्ति आणि राजनिष्ठा ! धिक्कार असो आम्हांला, आमच्या राजभक्तीला आणि आमच्या शास्त्यांना ! सारेच एका माळेचे मणि! आजमित्तीस कोणत्याहि नेटिव संस्थानांत ब्रिटिश पोलिटिकल एजंटच्या सान्निध्यांत असा प्रकार घडत असेल असे आम्ही म्हणत नाहीं. पण घडल्यास निदान आमचे लोक तरी आपण होऊन त्याबद्दल बोभाटा करणार नाहींत अशी आमची पक्की खातरी आहे. अशा राजभक्तांनीं परक्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या