या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय कलांचें पुराणत्व


 अलीकडे आम्हांस जी कारुण्यावस्था प्राप्त झाली आहे, व इंग्लिश लोकांसारख्या बलाढ्य लोकांपुढे आमची जी तेजोहीनता दृष्टीस पडूं लागली आहे, तीमुळे आम्ही पूर्वीपासूनच सर्व बाबतीत असेच गचाळ होतों कीं काय, असें परकीयांसच नव्हे तर आमचें आम्हांस देखील वाहूं लागलें आहे. असें सांगतात की इंग्लंडचा प्रसिद्ध बृहस्पति एडमंड बर्क जेव्हां वारेन हेस्टिंग्ज विरुद्ध पार्लमेंट समेत गर्जू लागला तेव्हां त्याच्या वाग्वज्रानें पार्लमेंटच्या सामान्य सभासदांची अंतःकरणें रागानें व शोकानें विदारून गेल येवढेच नाहीं, तर ज्या इतभाग्य हेस्टिंग्सवर त्याच्या वाणीचे आघात होत होते, त्या खुद्द हेस्टिंग्ससाहेबांचें पाषाणहृदय देखील उकलूनं जाऊन क्षणभर त्यांस असें वाटलें कीं, " मी मोठा कर्मचांडाळ दुरात्मा असलों पाहिजे !” बर्कच्या वाक्प्रभवामुळे हेस्टिंग्सची जशी दशा झाली तशीच आमचीहि अलीकडे होऊं लागली आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीं. व्यापार, विद्या, कला, युद्धकौशल्य, धाडस, शरीरसामर्थ्य, मानसिक शक्ति वगैरे कोणत्याही गोष्टींत आम्ही आपली युरोपीअन लोकांर्शी, मुख्यत्वेंकरून इंग्लिश लोकांशी तुलना करूं लागलों कीं त्यांच्या आमच्यांत जमीन- अस्मानाचें अंतर स्पष्टपणे निदर्शनास येऊन, त्यांचे पारडे पृथ्वीवर बसल्या- सारखें व आमचें आकाशांत लोंबत असल्यासारखे दिसतें ! इंग्लिश लोकांत व आम्हांत खरोखरीच एवढें अंतर असतें, तर आमच्या मनाची जी सध्यां स्थिति झाली आहे, व तीविषयीं दुसन्यांस जें वाटत आहे त्याबद्दल इतका खेद करण्याची गरज नव्हती. अनेक गोष्टींत आम्ही आज- मित्तीस इंग्लिश लोकांच्या मार्गे शेंकडों योजनें आहों, व आम्ही त्यांपासून शिकण्यासारख्या अनेक वस्तू आहेत, हें निर्विवाद आहे. पण येवढ्यावरून असें सिद्ध होत नाहीं कीं, ज्याचा आम्ही अभिमान मानावा, किंवा ज्याच्या विचाराने पुढील वर्तन करतांना उत्साहावलंबन करावें असें आमच्या इति- हासांत कांहींच नाहीं.... जुन्या ग्रीक किंवा रोमन लोकांच्या इतिहासाइतका