या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

६४

मानांचें लागतों, असें म्हणणें शुद्ध साहस आहे. शिवाय मुसलमान लोकांनी आपल्या कसबानें किंवा विद्येनें आमच्या कारागिरांत किंवा विद्येत प्रचंड क्रांति करून त्यांचा मागमूस नाहीसा करावा, असा त्यांचा अधिकार हि नव्हता. मुसलमान लोक आम्हांहून विशेष कडवे, विशेष शूर, विशेष मिजासी, व धर्माभिमानी आहेत, हें क्षणभर कबूल करतां येईल; पण इंग्रज लोकांप्रमाणे ज्ञानांत, कलाकौशल्यांत, राजकारणांत किंवा कल्पकतेंत आम्हांहून ते श्रेष्ठ होते, असें म्हणण्यास बिलकुल आधार नाहीं. त्यांनी येथे पांचसहाशे वर्षे आपली बादशाही चालविली हें कबूल आहे; पण इंग्रजांनीं आपल्या शंभर वर्षांच्या अंमलाने आमच्या अंतर्बाह्य स्थितींत जे जमीनअस्मानाचें अंतर पाडिलें आहे, तें मुसलमानांस सहाशें वर्षांच्या एकछत्री अंमलानें पाडितां आलें नाहीं, हें निर्विवाद आहे. आणि असेंच होणें स्वाभाविक होतें. वर निर्दिष्ट केलेल्या गुणांत आम्हांहून मुसलमान लोक खरोखरीच श्रेष्ठ असते तर त्यांच्या सहा वर्षांच्या अंमलांत आमच्या घरच्या सुधारणेचा मागमूसहि न राहता; आपणाहून कमी सुधारलेल्या ज्या ज्या लोकांस त्यांनी जिंकून पादाक्रांत केलें, व ज्या ठिकाणी त्यांनीं आपलीं कायमचीं राज्यें स्थापिलीं त्या ठिकाणच्या जुन्या सुधारणेचा आतां पत्ताहि लागत नाहीं. ताप्तर्य काय की, कोणत्याही कमी सुधारलेल्या लोकांनीं आप- णांहून अधिक सुधारलेल्या राष्ट्रास जिंकून तेथें आपली गादी स्थापिली, व अनेक वर्षे त्यांचें अव्याहत राज्य केले, तरी त्यांच्या हातून तेथल्या लोकांच्या वरिष्ठ सुधारणेचा बीमोड होऊं शकत नाहीं, हा जो इतिहासज्ञांनीं नियम काढला आहे तोच आम्हांसही लागू होतो. याच गोष्टीचा दुसरा प्रत्यय असा आहे कीं, दक्षिण हिंदुस्थानांत म्हणजे कर्नाटक, म्हैसूर वगैरे प्रांतांत मुसलमान लोकांचा स्थायिक अंमल कधींच झाला नाहीं, व पश्चिम हिंदु- स्थानांत तो फार स्वल्पकालीन होता. यामुळें पश्चिम हिंदुस्थानांतल्या कला- कौशल्यावर मुसलमानांच्या अंमलाची झांक यत्किंचित् दिसते, पण कर्ना- टकांतील व म्हैसूर प्रांतांतील कारागिरीस म्लेंछस्पर्श कधींहि झाला नाहीं, असें त्या त्या प्रांतांतील कारागिरीच्या आजच्या स्थितीवरून म्हणणें भाग पडतें. उलट, अहमदाबाद, हैद्राबाद ( दक्षिण ) अशा थेट मुसलमानी शहरांत सुद्धा आमची कारागिरी मशिदीपर्यंत व जनानखान्यापर्यंत जाऊन भिडली आहे असे दिसून येईल !