या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६९

सामाजिक घडामोड

नीतिप्रसार असो - काय पाहिजे तें असो, अगदीं शुष्क गोष्टीपासून मोठ्या महत्त्वाच्या गोष्टीपर्यंत सरकारापुढें तोंड वेंगाडल्याशिवाय, व राज्यकर्त्यांची मदत मागितल्याशिवाय, आमचे हातून कांहीं एक होणार नाहीं, असा आमचा पक्का ग्रह होऊन बसला आहे. (केशवपन किंवा बालविवाह कायद्यानें ' बंद करा असें कोणी म्हटले की एवढा अनर्थ करून सोडावयाचा की जशी कांहीं स्वातंत्र्यवृक्षावर आकाशांतील कुन्हाडच पडत आहे ! म्हणजे काय कीं बायकांच्या व मुलांच्या पारतंत्र्याचा विच्छेद करणाऱ्या कायद्यास स्वातंत्र्या पहारक कु-हाड म्हणावयाचें आणि ज्या गोष्टीनीं खरोखर स्वातंत्र्यापहार होत आहे त्यांस स्वातंत्र्य संरक्षक म्हणून प्रेमानें कवटाळावयाचें - अशी आमची शोचनीय अवस्था होऊन गेली आहे ! पण कांहीं अंश ही अपरिहार्य आहे. पारतंत्र्यांत ज्यांचीं अनेक शतके गेलीं आहेत त्यांना स्वातंत्र्याचा बाऊ वाटावयाचा ! आणि पारतंत्र्यच सुखावह वाटावयाचें ! आम्हा अर्धवट सुधारलेल्या लोकांची तर कथा काय ? पण फ्रान्स व जर्मनी अशा सुधारलेल्या देशांतील तत्त्ववेत्त्यासही न कळत अशा प्रकारची भूल पडते, हें आश्चर्य नव्हे काय ? सामाजिक नियंत्रण बलात्कारतत्त्वावर न होतां संमतितत्त्वावर होऊं लागेल तेव्हांच सामाजिक सुखाची परमावधि होण्याचा संभव आहे, हें सिद्ध करण्यासाठी प्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्ता ऑगस्ट कौंट बसला असून वाहता वाहतां भलतीकडे जाऊं लागला ! संमतितत्त्वावर फ्रेंच समाजाची स्थापना करण्याकरतां त्यानें जी राज्यपद्धत वर्णिली आहे ती फ्रान्स देशांत आजपर्यंत रूढ असलेल्या राज्यपद्धतीहून अधिक सक्तीची आहे ! जर्मनीतील अलीकडल्या सामाजिक तत्त्ववेत्त्यांची विचारपद्धति अशाच प्रकारची आहे. यांनीं लोकांस पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या हेतूनें ज्या राज्य- पद्धतीचे विवरण केलें आहे ती खरोखरीच अंमलांत आल्यास, व्यक्ति- स्वातंत्र्य कोठें दृष्टीस पडेल किंवा नाहीं, याचीच शंका आहे तात्पर्य, हाडामांसास खिळलेले आचार सामान्य लोकांसच बरे वाटतात असे नाहीं, तर त्यांतील दोष विचारी विद्वानास देखील सहसा दिसत नाहींत, व दिसले | तरी त्यांचा अव्हेर करणें हें त्यांच्यानेही सहन होत नाहीं. यामुळे ज्या ठिकाणीं सरकारी अंमल मोठ्या जुलमाचा असतो त्या ठिकाणीं तो वाढत जाण्यास प्रजेचें वर्तनही बऱ्याच अंशीं कारण होतें. जो जो सरकारी अधि-
·