या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आईबापांचा मित्र.
भाग पहिलाः-आपली सुधारणा.

 १ ‘बाप तसा बेटा व कुंभार तसा लोटा’, ‘आई तशी बेटी व खाण तशी माती’, ह्या ह्मणी आपल्याच भाषेतल्या आहेत. यांत पुष्कळ तथ्य आहे. कुंभार जसा आकार लोट्याला देईल, तसा तो होईल. त्यानें लोट्याचा कांठ थापटल्यास, लोटा बिचारा काय करील ! आईबाप हे मुलांस शिक्षण देणारे आहेत. ते मुलांस जसें शिक्षण देतील, तशीं तीं तयार होतील. त्यांनीं शिक्षणाची हयगय केल्यास मुलांवर वाईट परिणाम होईल, पण त्यास मुलांनीं काय करावें ? हें शिक्षण ह्मणजे ‘श्री श्री श्री श्री’ करून द्यावयाचें नव्हे, तर आपल्या अनुकरणाचे ! लहान मुलांकडे लक्षपूर्वक पाहिल्यास असें आढळून येईल की, त्यांच्या डोळ्यांपुढे ज्या गोष्टी घडत असतात, त्यांचे तीं अनुकरण करीत असतात. त्यांनीं शिमग्यांतली राधा पाहिल्यास, तीं हात वर करून गिरक्या मारतांना दिसतात; कथा पाहिल्यास, बोआप्रमाणें आ, ई, करून-साधल्यास गळ्यांत माळ घालून-हातांत तंबुरीच्या बदला काठी घेऊन,-बोआची हुबेहुब नक्कल करण्यांत गुंतलेली दिसतात; नाटक पाहिल्यास, सोंगें घेऊन पात्रांच्या हावभावांचे व भाषणांचे प्रतिबिंब उठवतांना दिसतात; घोड्यांची सरकस पाहिल्यास, कांहीं मुलें घोडे होऊन नाचतांना, कांहीं बॅन्डची नक्कल तोंडानेंच करितांना किंवा वाद्ये वाजवितांना दिसतात-व एखादा प्रोफेसर बनून चाबूक फडकावतांना दिसतो;-एकंदरींत तीं अनुकरणप्रिय असतात.

 २ आईबापांचा-त्यांतही आईचा-मुलांशीं निकट संबंध असल्यामुळे तीं आईबापांचे-विशेषत: आईचे-पुष्कळ अंशीं अनुकरण