श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ ऑक्टोबर

१ ऑक्टोबर

उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहे.



उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट् झाले. लग्नामध्ये खऱ्या विवाहविधीला, म्हणजे अंतरपाट धरून सप्तपदी होईपर्यंत, थोडाच वेळ लागतो; पण या संस्काराचे महत्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून चार दिवस एवढे सोहळे करतात. त्याचप्रमाणे, उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हे मुख्य आहे बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत. आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे. देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचे प्रेम वाढीला लागावे हाच आहे. दिवाळीमध्ये फटाके उडवणे, गोड खाणे, फराळ करणे, या सर्व गोष्टी मागचे दुःख विसरण्यासाठी म्हणून आहेत. उत्सव काय, सण काय, धार्मिक कृत्ये काय, तीर्थक्षेत्रे, पूजापठण, इत्यादि सर्वांचे कार्य भगवंताचे प्रेम मिळवणे हेच मुख्यतः आहे. आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे, म्हणजे हवे नकोपण नाहीसे होऊन, त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल. देवाचे प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे. आपण भुताखेतांवर आपला विश्वास नाही असे म्हणतो; पण करणी केलेला कुणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर, आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते. जी भीती आपल्याला भुताखेतांची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला प्रेम कसे उत्पन्न होणार ? तेव्हा देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका. देव कधीही कोणाचे वाईट करणार नाही याची खात्री बाळगा. परमेश्वर दयेचा सागर आहे. आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माउलीला कधी वाटेल का ? आपण तिला मनापासून हाकच मारीत नाही. भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही; इथेच आपले सर्व चुकते. तेव्हा, गोंदवल्यास आल्यासारखे, रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, 'रामा, तुझे प्रेम आम्हाला दे.' तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल ह्यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे. रामाची भक्ती करण्याने, आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका. भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल. नाम हे भगवंताला अत्यंत जवळचे आहे. या नामाची तुम्ही संगत धरा, त्याचा सतत सहवास ठेवा, त्याला प्राणापलीकडे जपा; मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचविल्याशिवाय राहणार नाही. जिथे राम तिथे नाम, आणि नाम तिथे राम. खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा, मग राम तुमच्यापुढेच उभा आहे.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.