श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ ऑगस्ट

२८ ऑगस्ट

आनंदापासून दूर करते ती माया.


वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया होय. माया म्हणजे जी असल्याशिवाय राहात नाही, पण नसली तरी चालते; उदाहरणार्थ, छाया. माया ही नासणारी आहे. ती जगते आणि मरते. मला विषयापासून आनंद होतो; पण तो आनंद भंग पावणारा आहे. आनंदापासून मला जी दूर करते ती माया. आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येते. हा आपला अनुभव आहे. माया आपल्याला विषयात लोटते; विषयांचे आमिष दाखवून चटकन निघून जाते. आहे त्या परिस्थितीत चैन पडू न देणे, हेच तर मुळी मायेचे लक्षण आहे. पैसा हे मायेचे अस्त्र आहे. मायेचे थोडक्यात वर्णन करायचे म्हणजे, भगवंतापासून मला जी दूर करते ती माया. भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते, तेव्हा आपल्याला ती माया बनते, आणि तिचे कौतुक जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा ती लीला बनते. एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा, असे म्हटले म्हणजे मायेचे निरसन झाले. मायेचा अनर्थ माहीत असूनही तो आपण पत्करतो, याला काय करावे ?

जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे. आपण त्याला बळी पडू नये. जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल, भोवर्‍यात सापडेल, आणि कुठे वाहात जाईल याचा पत्ता लागणार नाही. आपण प्रवाहात पडावे पण प्रवाहपतित होऊ नये. आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावे; यालाच अनुसंधान टिकवणे असे म्हणतात. भुताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसे ते जवळ आहे असे सारखे वाटते, तसे आपल्याला भगवंताच्या बाबतीत झाले पाहिजे. परंतु बाधा ही भितीने होते; त्याच्या उलट, भगवंत हा आधार म्हणून आपल्याजवळ आहे असे वाटले पाहिजे. मनात वाईट विचार येतात, पण त्यांच्यामागे आपण जाऊ नये, मग वाईट संकल्प-विकल्प येणार नाहीत. सर्वांना मी 'माझे' असे म्हणतो, मात्र भगवंताला मी 'माझा' असे म्हणत नाही; याला कारण म्हणजे माया. वकील हा लोकांचे भांडण 'माझे' म्हणून भांडतो, पण त्याच्या परिणामाचे सुखदुःख मानत नाही, त्याचप्रमाणे, प्रपंच 'माझा' म्हणून करावा, पण त्यामधल्या सुखदुःखाचे धनी आपण न व्हावे. खटल्याच्या निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते. तसे, प्रपंचात प्रारब्धाने ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात. आपले कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो, त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये, अनुसंधान कमी होऊ देऊ नये, कर्तव्य केल्यावर काळजी करू नये, म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. हे ज्याला साधले त्यालाच खरा परमार्थ साधला.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.