हिरीताचं देनं घेनं - नको लागूं जीवा , सदा मतल...

नको लागूं जीवा, सदा मतलबापाठीं
हिरीताचं देनं घेनं नही पोटासाठीं
उभे शेतामधी पिकं
ऊन वारा खात खात

तरसती 'कव्हां जाऊं
देवा, भुकेल्या पोटांत'
पेटवा रे चुल्हा आता, मांडा थाटवाटी
नको लागूं सदा जीवा, मतलबापाठी

पाहीसनी रे लोकाचे
यवहार खोटे नाटे
तव्हां बोरी बाभयीच्या
आले आंगावर कांटे

राखोयीच्यासाठीं झाल्या शेताले कुपाटी
नको लागूं जीवा, आतां मतलबापाठी
किती भरला कनगा
भरल्यानं होतो रिता

हिरीताचं देनं घेनं
नहीं डाडोराकरतां
गेली देही निंघीसनी नांव रे शेवटीं
नको लागूं जीवा, सदा मतलबापाठीं


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.