डॉ. भालचंद्र फडके यांनी प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे आर्यभूषण छापखान्यातील अंकाची उपलब्धी. तसेच डॉ. श्रीपती कापरे यांचा 'करमणूक' वरील अप्रकाशित प्रबंध वा 'मराठी कथेची वाटचाल' पाहायला हवे होते. परंतु जयकर ग्रंथालयाकडून पत्रव्यवहार करूनही 'करमणूक' बाबत संदर्भ साहाय्य उपलब्धीबाबत कळविले गेले नाही. एका अर्थाने डॉ. भालचंद्र फडके यांची ही प्रस्तावना घेतल्याने 'न्यून्य ते पुरते' झाले आहे.
गोखले एज्युकेशन सोसायटीने याही पुस्तिकेच्या प्रकाशनासाठी रुपये ५०० चे अनुदान दिले, त्याबद्दल संस्थेचे सचिव मा. डॉ. मो. स.गोसावी यांचा मी कृतज्ञ आहे.
या निमित्ताने हरिभाऊ आपट्यांच्या मूळ साप्ताहिक 'करमणूक' च्या अंकाकडे जाणकार मराठी रसिक-वाचकांचे लक्ष वेधले गेले आणि वाङ्मयीन नियतकालिकांच्या आणि मराठीच्या अभ्यासकांना ही पुस्तिका उपयुक्त ठरली तरच या लेखनाचे सार्थक होईल.
विभा प्रकाशनाच्या या पाचव्या प्रकाशनाला मराठी रसिकांनी उत्तम प्रतिसाद द्यावा, अशी नम्र विनंती आहे.
वंदनीय पिता श्री. बाबासाहेब गिरधारी, वाहेगावकर यांच्या चरणी ही पुस्तिका अर्पण करतो. कारण त्यांनीच कंबर कसून निर्भयपणे सदा वागण्याचा संदेश दिला आहे.
पुनश्च कृतज्ञता!
- भास्कर गिरधारी
गुरुपौर्णिमा, शके १९१३
दि. २६ जुलै, १९९१.