पान:नित्यनेमावली.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०

महाराजांच्या मुख्य मुख्य शिष्यांचें वर्णन समास ४ मध्ये आहे. पांचव्या समासांत ग्रंथकर्त्याने विविध विषयांचे विवरण केलें आहे.
 कोणत्याही मोठया पुरुषाची योग्यता त्यांजवळ पुष्कळ दिवस सतत राहिल्यावांचून कळत नाहीं. त्याचप्रमाणें श्री भाऊरावमहाराज यांची योग्यता थोडीबहुत तरी कळण्यास त्यांजवळ पुष्कळ दिवस राहून त्यांच्या प्रत्येक क्रियेचें अवलोकन केलें पाहिजे. त्यांची पूर्ण योग्यता कळण्यास प्रत्यक्ष त्याप्रमाणेंच झालें पाहिजे :- "तुका म्हण अंगे व्हावें ते आपण । तरीच महिमान येईल कळो ||" हें शक्य नसल्यानें त्यांची थोडीबहुत तरी योग्यता त्यांच्याशी सहवास. केल्यानेंच कळणार आहे. प्रस्तुत लेखकास अलीकडे बरेच दिवस त्यांजबरोबर रहाण्याचा प्रसंग आला होता; व त्यांच्या प्रत्येक क्रियेचें त्यानें सूक्ष्म अवलोकन केलें आहे. त्यांची निःस्पृहता, त्यांचे दयालुत्व, त्यांचा नेमस्तपणा, त्यांचा दृढतर मनोनिग्रह, आबाल- वृद्धांशीं समता, शिष्यांवर अलोट प्रेम गुरूंवर व आत्मज्ञानावर निःसीम भक्ति, अलौकिक शांति व उपाधीपासून अलिप्त राहण्याची शैली, हे व इतर अनेक गुण वरवर पाहणारांस सुद्धां दिसून येतील. फार काय सांगावें ? दासबोधांतर्गत निःस्पृह वर्तणूक ( ११ - १० ) नि. स्पृहलक्षण ( १४ - १ ), निःस्पृहव्यापलक्षण (१५-२) वगैरे जे आचारबोधक समास आहेत, त्यांतील प्रत्येक ओवीप्रमाणें त्यांनीं आपले वर्तन ठेविलें आहे !