पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६० : शतपत्रे

आणि देवाचे नाव घेतले व त्यावर खंडीभर पाला घातला, तर त्यात पुण्य कशाचे ? यास्तव लोकांनी जर कोणास चांगलेवाईट म्हणावयाचे असेल तर त्याच्या स्नानसंध्येकडे पाहू नये; त्यांचे वर्तणुकीकडे पहावे. कारण स्नानसंध्या हे केवळ पोकळ आचरण आहे. त्यात काही उपयोग नाही. खरे पुण्य ते वेगळे आहे. याजकरिता पुष्कळ अनुष्ठाने केली, तरी त्यात जीव नाही. ब्राह्मणांकडून मजुरी केली, तरी सारखेच. त्यापेक्षा मजुरांची मजुरी बरी. चार ब्राह्मण लावून अभिषेक करावा, त्यापेक्षा चार मजुरदार लावून रस्ता नीट करावा, हे चांगले; कारण ती लोकहिताची मजुरी आहे. यास्तव स्नानसंध्या करण्यात काही पुण्य नाही.

♦ ♦


देवपूजा

पत्र नंबर ३७ : ३ डिसेंबर १८४८

 शास्त्रामध्ये सर्व धर्मप्रकरणी बहुत मार्ग लिहिले आहेत. कोणी म्हणतात, जिवास भजावे, जीव तोच शिव आहे. व कोणी म्हणतात शिव अधिक आणि कोणी म्हणतात विष्णू, इत्यादी अनेक मते आहेत. तसेच अग्निसेवा, यज्ञ इत्यादिक श्रौत मार्ग आहेत. कोणी सूर्योपासक, कोणी शाक्त व फार अमंगळ आहेत. त्यांची पूजा सर्वांहून मूर्खपणाची आहे. ती केवळ मूर्ख व अविचारी असतील, ते मात्र स्वीकारतील. असे हे अनेक मार्ग आहेत.
 परंतु माझे मत सर्व मार्गांतील एक मार्ग खरा आहे, तो कोणता म्हणाल तर ऐका. मी त्यांस शास्त्रातून प्रमाणही काढून देईन. तो असा की, ईश्वर काही मनुष्यास दृष्ट नाही, त्याचे अस्तित्व सृष्टीकडे पाहिल्याने मात्र समजते. याप्रमाणे सर्व लोकही कबूल करीतात. तेव्हा देवाचे भजन करणे योग्य व तो सर्वांहून वरिष्ठ आहे, परंतु त्याचे भजन करावे कसे, हे कळले पाहिजे. ईश्वरास जर आम्ही फुले अर्पण केली, तर पहा बरे, त्याने पृथ्वी निर्माण केली, तेव्हा त्यांस काही कमी आहे काय ? तसेच त्यांस नैवेद्य दाखवावा, तर तो उपाशी आहे काय ? त्यांस कोणताही उपचार करावयास मनुष्य योग्य नाही, कारण तो परिपूर्ण आहे. याजविषयी पूर्वीचे ऋषींचे मत असेच आहे.