पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७० : शतपत्रे

अशा गोष्टीची त्यांस लज्जा वाटत नाही व दुसऱ्याचे दुःख पाहून मनास कोमलता येत नाही. वास्तविक पाहिले असता जे श्रीमंत आहेत, त्यांणी गरिबांस पाहिले म्हणजे त्यांस लज्जा यावी; आणि अंतःकरण विरघळावे.
 कारण की, भिकारी आणि श्रीमंत यांचे शरीरामध्ये किंवा बुद्धीमध्ये काही फरक नसतो. इतकेच की कालेकरून एकाने दुसऱ्याचे हरण करून फार माल जमविला असतो व दुसऱ्याचा तो हरण जहाला म्हणून तो भिकारी असतो. ईश्वराने पृथ्वीवर पदार्थ निर्माण केले. हे सर्वांस सारखे पोचावे हा त्याचा हेतू होय. परंतु मनुष्यामध्ये जितके शहाणपण, तितकाच मूर्खपणा आणि अज्ञान आहे. याजमुळे पन्नास लोकांस लुटून एक श्रीमंत होतो.
 पन्नास कुळंबी गावातील नांगर धरून मेहनत करतात आणि एक जहागिरदार किंवा इनामदार त्यांस कोंडा ठेवून त्याचे दाणे घेतो आणि आपण रेशीमकाठी धोतरे नेसतो व कामकाज काही एक करीत नाही. हे माहात्म्य एकाचे आणि दुसरे गरीब बिचारे इनामदारापेक्षा शहाणे असले तरी आपल्या मेहनतीचा हिस्सा त्यांस देतात, हे आश्चर्य आहे.
 आणखी जर एक गोष्ट सांगितली, तर याविषयी पक्की खात्री होईल. प्राचीन काळी एक विचारशील मनुष्य शेतात बसत असे आणि भिक्षा मागून खाई. त्याणे एक दिवस पाहिले की, एक विलक्षण जनावराची टोळी जिचे नाव जाणते पक्षी ते सरासरी दोनशे त्या शेतात आले. तेव्हा दाणे पुष्कळ पडले होते. ते सर्वांनी सारखे खावे, ते सोडून त्यांणी काय केले. त्या पक्ष्यांपैकी एक रोगिष्ट व निर्बल होता त्यांस त्यांनी एका पारावर बसविले आणि बाकीचे सर्व शेतात जाऊन त्यांनी आपले शक्तीप्रमाणे दाणे जमा करून त्या रोगिष्ट पक्ष्याजवळ आणून रास घातली आणि आपण काही न खाता त्या पक्षिराजाच्या सभोवते बसले आणि तो पक्षिराज त्या दाण्याचे राशीवर नाचे आणि उडवी, परंतु कोणास काही देत नसे. आणि कर्मास त्या पक्ष्यांपैकी बलिष्ठ होते, ते सहाय्य होऊन इतर पक्षी जरी क्षुधेने व्याप्त होते तथापि त्यांस काही खाऊ देत ना. जरी त्यांणी ती रास घातली होती, तरी त्या राशीपैकी कोणी खावयास लागला, तर सर्व पक्षी एकत्र जमून या अपराधी पक्ष्यास मारून टाकीत. असे दोनचार पक्षी मारले.
 हे त्या पाहणाऱ्या मनुष्यास आश्चर्य वाटून, तो आपले मित्राकडे गेला आणि त्यांस त्याने हे वर्तमान विदित केले. आणि म्हणाला पक्ष्यांची जात काय मूर्ख आहे ? आपण उपाशी मरतात आणि रोगिष्टाकडून आपण संचय केलेले धान्य नाशिवतात. तेव्हा तो म्हणू लागला की, "अरे बाबा, याचे