पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १७५


आचार

पत्र नंबर ५८ : २९ एप्रिल १८४९

 हिंदू लोकांमध्ये सांप्रत आचार फार माजला आहे. म्हणजे किरकोळ निरर्थक कर्मे आणि ढोंगे फार होऊन, त्यांतील बीजरूप जी नीती ती भ्रष्ट झाली आहे.
 ब्राह्मणाच्या घरात जाऊन पाहिले म्हणजे आचार किती असतात, ते लक्षात येतात, म्हणजे सोवळेओवळे हे एकच प्रथम; नंतर पुरुषाचे सोवळे, बायकांचे सोवळे, कित्येक ठिकाणी देशस्थ ब्राह्मणाचे हातचे म्हणून कोकणस्थांच्या बायका जेवीत नाहीत. पिठास पाणी लागले, म्हणजे ओवळे झाले; खरकटे, शिळे, उष्टे हजारो नेम आहेत. जेवताना वाढणाराचा स्पर्श झाला, तर पुनः आंघोळ केली पाहिजे; उष्टे-विटाळ म्हणजे आंचवण्यापूर्वी कोणास स्पर्श न करणे; दाणे भाजले म्हणजे ओवळ्यांनी खाण्यास चिंता नाही; परंतु हिरवे दाणे खाऊ नये आणि त्यांस पाणी लागले म्हणजे विटाळ झाला. जेवून उठला, म्हणजे पुनः अन्न खाऊ नये व प्रोक्षण करण्याच्या पूर्वी खाऊ नये. व जेथे जेवले तेथे शेणपाणी लावल्याखेरीज दुसरा जेवावयास बसत नाही. अन्नास जो हात लागला, तो तसाच अंगास लागला, तर अंग धुतले पाहिजे. मुकटा, धाबळ, रेशमी कापडे सोवळी, कापूस ओवळा, म्हणजे धुतल्याशिवाय तो घेऊन जेवीत नाहीत.
 परंतु वास्तविक विचार केला. तर रेशीम करण्यात बहुत हिंसा होते. असे असून ते पवित्र व कापूस झाडाचे फूल ते ओवळे, हे कसे असेल ? याचा ठराव किंमतीमुळे पूर्वी शास्त्रकर्त्यांनी केला किंवा कसे ? याचा ठिकाण लागत नाही. पितांबर पन्नास वर्षे धूत नाहीत; परंतु धोत्रे रोज धुतात आणि धोब्याजवळ दिली, तर ती सर्वदा ओवळी होतात. तेव्हा हे सर्व चमत्कारिक नियम ज्यामध्ये ब्राह्मणांस तीस घटका जातात, त्याचा उपयोग पाहिला, तर काही नाही; परंतु लोक म्हणतात की, जितके ज्यास होईल, तितके त्याणे करावे. म्हणून जे भटभिक्षुक आहेत, ते ढोंग दाखविण्याकरिता फारच करतात. शंकराचार्यांचे वंशातील शिष्य, जे संस्थानी आहेत, त्यांचे येथे पाहिले, तर आचार इतका आहे की, तो पाहण्यानेदेखील कंटाळा येतो मग त्याचा त्रास कोण सोशील ?