पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १७९

तीन संस्कार ठेवून बाकीचे सर्व रद्द करावे. (चवथे) जे कर्म करणे ते स्वभाषेत अर्थ समजेल असे करावे. भजन, पूजन, संस्कार सर्व ज्यांचे त्यांचे भाषेत करावे. संस्कृत भाषा पाहिजे ते शिकतील; परंतु ज्यांस येत नाही त्यांणी संस्कृत भाषेत कर्म करणे जरूर नाही. (पाचवे) प्रत्येकास आपले विचाराप्रमाणे आचार व बोलण्या-लिहिण्याची मोकळीक असावी. त्यांस प्रतिबंध असू नये.
 (सहावे) स्त्रीपुरुषांचे अधिकार धर्मसंबंधी कामात व संसारात एकसारखे असावे. येणेकरून पुनर्विवाह व मोठेपणी लग्न झाले. (सातवे) आचारापेक्षा नीती प्रमुख असावी. आचाराचे महत्व हल्ली आहे तसे असू नये. आता किती एक बायका लबाड असतात; परंतु पिंपळाच्या प्रदक्षिणा अंतरीत नाहीत; हे काही उपयोगी नाही. (आठवे) अर्थाशिवाय काही एक म्हणू नये. (नववे) मनुष्यमात्रास तुच्छ मानू नये. जाति- अभिमान नसावा. सर्वांशी सारखे दयापूर्वक वर्तावे. सर्वांचे कल्याण करावे. (दहावे) स्वदेशाची प्रीती व त्याचे कल्याण विशेषेकरून मनात वागवावे. (अकरावे) ज्यास जो पाहिजे तो त्याणे रोजगार करावा. (बारावे) गुणेकरून व योग्यतेकरून जातिभेद मानावा. कुलेकरून मानू नये. (तेरावे) सरकारहून प्रजेचे अधिकार अधिक असावे, म्हणजे जे जे रयतेच्या हिताचे कायदे आहेत, ते सरकारशी भांडून घेत जावे. (चवदावे) राजाने जे नियम केले असतील, ते व जे ईश्वरी बुद्धिसूचित नेम आहेत ते मानावे.
 (पंधरावे) विद्यावृद्धीकरिता सर्वांनी मेहनत करावी. दुःखितांस सुख, रोग्यास औषध, मूर्खास ज्ञान व दरिद्र्यास द्रव्य शक्त्यनुसार देण्यास अंतर करू नये. (सोळावे) शेवटचे कलम असे आहे की, सत्याने सर्वांनी चालावे. सत्याचे विरुद्ध वर्तणूक करू नये. विद्येमध्ये ज्या ज्या सत्य गोष्टी आहेत, त्यांचाच शोध करण्यास आळस करू नये आणि सापडतील त्या सर्व प्रसिद्ध कराव्या व विद्या व ज्ञान संपादन करण्यास सर्व सारखे, अशी मोकळीक असावी.
 या दर एक कलमाविषयी एक ग्रंथ उदाहरणेसहित करावा, असे माझे मनात फार आहे. व इतक्या गोष्टी मी लिहिल्या आहेत. त्यांस काही शास्त्र व हिंदू धर्म प्रतिकूल नाही. सर्व हिंदू धर्मातीलच आहे; परंतु त्याचा शोध मात्र केला पाहिजे. एके ठिकाणी सापडणार नाही. परंतु चहोकडून मिळविले म्हणजे सापडेल.
 जसा गीतेत एक ईश्वर आहे; इतर देवता भजू नयेत, अशी स्पष्ट वाक्ये पुष्कळ आहेत; ती घ्यावी. जरी ती पुराणास विरुद्ध असतील तरी पुराणे सोडावी. जे चांगले ते घ्यावे. जातीविषयी वेदाचे मत घ्यावे. कारण की, संस्कृत भाषेत अनंत ग्रंथ आहेत. ज्या ज्या ऋषींच्या जसे मनात आले तसे त्यांणी लिहिले