पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८८ : शतपत्रे

 तत्रापि ही गोष्ट खचित आहे की, इंग्रज लोकांचे बुद्धीस मंदपणा असतो, याचे कारण दुसरे काही नाही. दारू वगैरे मादक पदार्थ भक्षण करतात. येणेकरून त्यांचे बुद्धीस जरा येते. आणि जेव्हा एखादा मुकद्दमा सोपा असतो व त्यात काही तक्रार नाही असते, तेव्हा तो त्यांस समजतो. परंतु जो मुकद्दमा तक्रारीचा असतो व ज्यांस बहुत घोटाळा असतो, तो किती जरी समजाविला, तरी समजत नाहीत मग न समजताच हुकूम देतात, हे आम्ही नित्य पहातो व असेच सर्व ठिकाणी आहे. इंग्रज लोक बारीक कज्जे व तक्रारी सर्व बरोबर समजणारे क्वचित आहेत. आणि असले तरी त्यांस बुद्धी नीट ठेवावी लागते. फार श्रम होत नाहीत. दरम्यान हवा बदलून आराम विश्रांती घेतात, तेव्हा पुन्हा बुद्धी ताळ्यावर येते आणि त्यांस कामकाज सुचते.
 परंतु हे आमच्या लोकांस नको. हे पन्नास वर्षे सारखे काम करीत असले तरी त्यांस बुद्धी ताळ्यावर आणावी लागत नाही. व नाना फडणीस वगैरे मेहनती लोक होते ते एक दिवसही कामाखेरीज बसले नाहीत. याचे कारण हेच की, आमचे अन्न निर्मळ आणि इंग्रज लोकांचे अन्न बुद्धी मंद करणारे जड आहे. परंतु त्यांचे देशाची हवा शीतळ आहे. याजमुळे ते उद्योगी असतात. आमचे देशात हवा उष्ण येणेकरून लोक आळशी आहेत. ते जर मद्यमांस खाऊ लागले, तर फारच आळशी होतील.
 दारूसारखा दुष्ट पदार्थ दुसरा नाही व या पदार्थाचे व्यसन फार बलाढ्य आहे. एकदा लागले, तर सुटत नाही. व सर्वस्वी गेले आणि सर्वांचा नाश झाला, तरी काही सुटत नाही. हे व्यसन मोठे घातकी आहे. यास्तव शासन नेमून याजपासून लोक परावृत्त केले पाहिजेत. परंतु हे दारू पिणारांचेच राज्यात होईल काय ? अस्तु. व्हावे हे चांगले. ते आपण स्वतः दारू पितात. परंतु टाकतील तर त्यासही चांगले आहे. आमचे लोकांस हे व्यसन न लागावे इतके तरी त्यांनी केले पाहिजे. जरी आज ते उत्पन्नावर व लोभावर दृष्टी देत असतील, तरी हे करणे सरकारास योग्य नाही. कारण आज थोडे उत्पन्न होईल. परंतु लोक जर भिकारी झाले आणि दरिद्री होऊन काही उपयोगी नाहीत असे झाले, तर मग सरकार त्याजपासून काय घेईल ? सरकारची मातोश्री लोक आहेत. त्यांस त्यांजला रोगी, आळशी, अशक्त करून मग त्यांचे पोरांचे पोषण कसे होईल ? याजकरिता उत्पन्न सरकारने अगदी सोडून मनाई करावी म्हणजे लोक जगतील. नाही तर या सरकारखाली जी रयत आहे, तीस हे व्यसन कधी सुटावयाचे नाही व इंग्रज लोक या देशातून गेले तरी इकडे या लोकांत हे व्यसन राहून त्यांचे पाय इकडे लागले होते, हे स्मरण इतिहासातच राहील