पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९६ : शतपत्रे

संध्यादिक कर्मे, व्यवहार इत्यादिक आहेत. त्यामध्ये ईश्वराचे विशेष ज्ञान नाही, अनेक देवता आहेत, त्यांस संतुष्ट करून स्वर्ग इच्छा करावी, इतकेच यात आहे व इंद्रिये दमन वगैरे करावे यात काही कर्ममार्गी ऋषीदेखील मोठे रागीट असत व शाप देत हे प्रकरण मांत्रिक आहे.
 एकूण हे तीन मार्ग प्रसिद्ध आहेत. सर्व हिंदू लोक या तिहींतील एका मार्गात बहुधा असतात. आमचे मत असे आहे की, तिन्ही मार्गामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. त्या घेऊन जे शहाणे असतील त्यांनी परमेश्वराची भक्ती करावी, जगात दया करावी; यांत सर्व आले. ज्ञानमार्ग व कर्ममार्ग यांत घोटाळा दिसतो.

♦ ♦


नीति - प्रशंसा

पत्र नंबर ८८ : १३ जानवारी १८५०

 आमचे लोकांची सुधारणा व्हावयास मुख्य काय पाहिजे, याचा विचार केला असता असे दिसते की, मुख्य त्यांस विद्या पाहिजेत. विद्या कोणत्या म्हणाल तर हल्ली ज्या विद्या सत्यप्रतिपादक व वास्तविक जे व्यवहार आणि राज्यनाती यांना दर्शक आहेत, त्या विद्या प्रगट झाल्या पाहिजेत.
 पूर्वीच्या विद्या ज्या संस्कृतद्वारा येतात, त्या उपयोगी नाहीत. कारण त्यात असत्य गोष्टी फार आहेत व मूर्खपणाच्या समजुती फार आहेत. त्या विद्या प्राचीन काळच्या लोकांच्या, इतकेच जाणून त्या आता एकीकडेच ठेवून दिल्या पाहिजेत व नूतन ज्या कळा, शिल्प इत्यादी निघाल्या आहेत, त्या ग्रहण केल्या पाहिजेत. पूर्वीच्या चुकांनी ज्या भरलेल्या विद्या आहेत, त्या उपयोगी नाहीत. लहान मुलांस अठराही पुराणे पढविली तरी त्यांस काय ज्ञान येईल बरे ? याचा विचार पहा; त्यांतील असत्सिद्धान्त तेही आता दाखवितो.

क्ष रइक्षुसुरासर्पीदधिक्षीरजलार्णवः ॥

हे सागराचे ज्ञान होईल. स्त्रियांचे गुण कसे आहेत, हे वृद्ध चाणक्यात दुसरे अध्यायात एका श्लोकात दाखविले आहे की,