पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९८ : शतपत्रे

लोकांस समजेल. शास्त्राचे प्रमेय लोक समजत नाहीत. शास्त्री, पंडित अर्थांचा अनर्थ करतात व काही काही गोष्टी ज्या आहेत, त्यांचा यथार्थ अर्थ समजत नाहीत. आता पहा की, एका ठिकाणी पुराणात असे लिहिले आहे की,

विप्रावदर्शनात् क्षिप्रं क्षीयन्ते पापराशयः ।
वंदनान्मंगलावाप्तिरर्चनादच्युतं पदम् ॥१॥
आधिव्याधिहरं नृणां मृत्युदारिद्र्यनाशनम् ।
श्रीपुष्टिः कीर्तिदं वन्दे विप्रश्रीपादपंकजम् ॥२॥
सागरे सर्वतीर्थानि पदे विप्रस्य दक्षिणे ॥३॥

 याप्रमाणे ब्राह्मणांचे वर्णन केले आहे, ते खरे समजून लोक ब्राह्मणांच्या पायाचे तीर्थ पितात. सदावर्ते ब्राह्मणाकरिताच घालतात. ब्राह्मणांची पूजा केली, तर मोक्ष होतो, असे समजतात. यास प्रमाण पुराणांचे दाखवितात. की, प्राचीन राजे व श्रीकृष्णदेखील ब्राह्मणांची उष्टी काढीत होते. याप्रमाणे ब्राह्मणांस चढवून दिले आहेत. तेव्हा अशा गोष्टींवर किती विश्वास ठेवावा, याचे प्रमाण लोकांस समजत नाही व पुराणिक आणि हरिदास असाच उपदेश करून लोकांस वेड लावितात. याचा विचार लोकांनी करावा. ब्राह्मण हे मनुष्य. यांचे पायांचे पूजन केले म्हणजे मोक्ष कसा होईल ? हे विलक्षण मत आहे.
 याप्रमाणे लक्षावधी गोष्टी आहेत, याचप्रमाणे लोक क्षुल्लक धर्म व महान् धर्म यांचा भेद जाणत नाहीत. महान व परम धर्म असे की, सत्य बोलणे, दया करणे, क्रोध न धरणे, शांती धरणे, चोरी, अभिलाषा न करणे, व्यभिचार न करणे इत्यादी नीतीचे धर्म याविषयी अभिमान सोडून क्षुल्लक धर्म सांगतात. ते असे की, तुम्ही तुळशी वहाव्या, बेल वहावा, चंदनाची खोडे झिजवावी, वाती जाळाव्या, काळे वस्त्राने विटाळ होतो; काडी मोडली म्हणजे ब्राह्मणहत्या होते, शंखोदक घेतले म्हणजे पाप जाते, वाती तुपात घालाव्या, डबीत मंगळसूत्र द्यावे. सारांश, इत्यादी मूर्खपणाच्या गोष्टीस धर्म असे माझ्याने म्हणवत नाही. याविषयी लोकांस वेड लावून हे करवितात; परंतु परम धर्म कोणास सांगत नाहीत.
 पहा की, कामदार मोठाले असतात; त्यास कोणी असे सांगत नाही की तुम्ही लाच खाऊ नका, खरे काम करा, लबाड बोलू नका. हे सांगायचे सोडून त्यांचे पूजन करावयाचे ढोंग, देवपूजेची भांडी, ढोल व देव्हारे वाढवितात आणि त्यास दुनीतीचे मार्ग शिकवितात. ब्राह्मणांची मते अशी आहेत की, चोऱ्या केल्या तरी चिंता नाही. ब्राह्मणांस भोजने घातली, म्हणजे मग त्याचे