पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०४ : शतपत्रे

नाही. व त्याची मदत उपयोगी नाही. व त्याचा स्पर्शही उपयोगी नाही. तेव्हा स्वतः पाणी नदीवरून आणावे व पुनः लागले, तर आणखी हेलपाटा द्यावा, असे तापत्रय घडतात. यास्तव ब्राह्मणांकरिता अन्नछत्रे घालतात. तेणेकरून हे ब्राह्मणांचे श्रम जावे इतकाच त्याचा हेतू आहे.
 या देशात ब्राह्मणास बाहेर प्रवास करणे म्हणजे अतिशय दुःखकारक आहे. याजकरिता जर दर एक गावी एक घर बांधून, त्यात सर्व सोयी केल्या, तर फार चांगले होईल. परंतु जातीमुळे अडचणी फार आहेत. तत्रापि प्रवासी लोक जातीचा विधिनिषेध फारसा बाळगीत नाहीत. बरोबर शिजलेले अन्न घेतात. त्यांस कोणी शिवले, तरी तेच खातात, त्यांचे रीतीप्रमाणे एक घर सर्व जातीस बांधले, तरी त्यात सर्व प्रवासी लोक राहतील. यात संशय नाही. आणि सुख फार होईल. पहा, आता पुण्यात असे नाही म्हणून प्रवासी कोणी आला, तर त्याला उतरावयास जागा बहुधा मिळत नाही, कदाचित् मिळाली तर ती देवळात किंवा धर्मशाळेत. व त्यांस कोणी सामान देणार नाही. हात धुवावयास नदीवर गेले पाहिजे. लाकडे शोधून आणली पाहिजेत. याजकरिता जरूर आहे की, एका माणसाने अशा धर्मशाळेचे मुखत्यार होऊन त्याने पैसा घेऊन सर्व पुरवावे व जातीप्रमाणे प्रत्येकाचा धर्म राखावा, इतकी तजवीज झाली तर बरे पडेल.
 मुंबईचे वाटेने असे ब्राह्मण लोक आहेत. परंतु जेथे ब्राह्मण लोक आहेत, तेथे कुळंबी जावयाचा नाही. जेथे कुळंबी जातो, तेथे महार जाणार नाही. या अडचणी अतिशय आहेत. या युक्तीनेच दूर केल्या तर होतील. नंतर ब्राह्मण लोक प्रवास करू लागतील. सांप्रत ब्राह्मणास जर चौफट नफा जाहला, तर घराबाहेर जाणार नाहीत. ते म्हणतात पुण्यात दहा रुपये नफा बरा; पण मुंबईस पन्नास रुपये नको. ते म्हणतात की, या विटाळात कोण जातो ? येथून जाण्याचे तापत्रय, आपला ब्राह्मणी विचार व आचार कसा चालेल ? कोठे प्रवासाला जावे ? इत्यादी विचार करून ब्राह्मण लोक बहुतकरून घराबाहेर पडत नाहीत. जर कदाचित् उपाय नाहीसा झाला, तर मात्र पडतील. तरी त्यांस फार अमंगळ वाटेल. त्यांस वाटेल की आज पंधरा दिवस मुंबईत मी राहिलो खरा, परंतु जरी दोन पैसा नफा झाला, तरी धर्म बुडाला, पाणी विटाळाचे प्यालो, शिवाशिवी जहाली; निर्मळपणा काही राहिला नाही. सोनार, परभू यांचा संपर्क जाहला. आणि याप्रमाणे हजारो ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मणांची रीत अशी की, घरात सोवळे-ओवळे माजवावे व पुढे पाणी शिंपून मागे चालावे. ग्रहण पडले म्हणजे सर्व घरांतील टाकून द्यावे. आंघोळी कराव्या कुळंब्यांचा शब्द कानी पडू देऊ