पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २०९


कन्याहत्या, गवरनरसाहेबांची बदली व ब्राह्मण लोकांचे अज्ञान

पत्र नंबर ५

 हिंदुस्थानातील वाईट चाली बहुतेक बंद होत चालल्या आहेत. इंग्रजांचे अमलातील मुलखात हत्या व खून, हिंदू लोक धर्म जाणून हमेश करीत होते, ते त्यांनी बंद केले.
 तत्रापि अद्याप गुप्तरूपेकरून गुजराथेत कन्याहत्या झाऊज लोक करतात. तेथील बंदोबस्त करण्याकरिता बडोद्याचे रेसिडेंट व पूर्वीचे गवरनर डंकिनसाहेब वगैरे यांनी बहुत मेहनत केली; तेव्हा काही मनाई झाली, तत्रापि अद्यापि पोरे मारतात. त्याचे कारण असे की, रजपूत लोकांचे राज्य एके कन्येचे हातून जाईल, असे त्यांस कोणी ब्राह्मणाने भविष्य सांगितले आहे. जसे कंसास नारदाने सांगितले होते, तसे हे आहे. यास्तव ते मुळी ठेवीत नाहीत. हा मूर्खपणाचा परिचार बंद व्हावा, म्हणून पेशजीप्रमाणे हल्लीचे साली इंग्रजी व गुजराथी भाषेत २ ग्रंथ करावे व जो चांगले करील, त्यांस ६०० व ४०० रुपये बक्षीस मिळतील, म्हणूस सरकारने जाहीरनामा लाविला आहे.
 आनरबल क्लार्कसाहेब गवरनर जाऊन त्याचे कामावर लॉर्ड फॉकलंड गवरनर येणार म्हणून वर्तमान ऐकिले आहे. त्या लॉर्डास हिंदुस्थान प्रकरणी माहिती नाही म्हणून ऐकण्यात आहे; परंतु तो कुलीन, थोर व विलियम फोर्थ- माजीराजा याचा जावई आहे, असे म्हणतात. हल्लीच्या गवरनरास गुणावरून नेमले होते. व त्यांनी थोडके दिवसात सत्कीर्ती चांगली संपादन केली. आता हे जातात, येणेकरून लोकांस जे सुख होते, तितके पुढे होणार नाही, असे दिसते.
 हिंदू लोक जे आजकालपर्यंत गाढ निद्रेत आहेत. ती जाण्यास बहुत ग्रंथ व बहुत ज्ञान पसरले पाहिजे व असे होण्यास बहुत काळ पाहिजे. व त्यांस मुख्य अडचण अशी आहे की, सांप्रत काळचे द्रव्यवान ब्राह्मण लोक हे यास आडवे येतात; म्हणून हे लोक जाऊन नवी प्रज्ञा होईल तोपर्यंत हिंदू लोकांची सुधारणा होईल, असे दिसत नाही. इतर जातीचे लोक तर सांगितलेले ज्ञान ग्रहण करावयास सिद्ध आहेत. परंतु ब्राह्मण लोक तसे नाहीत. पूर्वीपासून त्यांची समजूत अशी पडलेली आहे की, आम्ही पृथ्वीवर देव आहो; व देवही आमचे हाती आहेत व आमचे आशीर्वादाने व श्रापाने पाहिजे तसे होईल;