पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१२ : शतपत्रे

वर्तणुकीची विचक्षणा, आमचे शहरात पूर्वापार धर्मसभेची जागा आहे, तेथे झाली असती; परंतु ही गोष्ट चुकली, हे बरे झाले.
 तात्पर्य, ब्राह्मणांनी लोभ फार अंगीकारिला. आता ब्राह्मणांचा संतोष किंमतीने विकत घ्यावयाचा आहे. दुसरे काही करावयास नको. जे म्हटले ते कर्म ब्राह्मण करतील व आळसामध्ये आपले पोषण व्हावे, अशी तजवीज काढतील. त्यांस जेवावयास व दक्षिणा मिळाली, म्हणजे झाले. धर्म, अधर्म, अनुशासन, यांचा विचार ते करीत नाहीत. मला वाटते की, आता कुळंबी धर्मात्मे निघतील; परंतु ब्राह्मण निघणार नाहीत. सर्व जातीपेक्षां ते नीचपणास उतरले आहेत. त्यांच्यामध्ये आता गर्व मात्र शेष राहिला आहे. ज्ञान, न्याय, नीती व गुण काही नाही. किती एक ब्राह्मण हल्ली तुकाराम व ज्ञानेश्वरपंथी झाले आहेत व गळ्यात माळा व वीणा घेऊन रस्त्यावर नाचतात. ज्यांस वैराग्य साधन करावयाचे, ते असे करतील काय ? दररोज नवीन संत होतात व मग पैका जमल्यावर त्याची भांडणे लागतात. किती एक शिष्य त्यांस सोडून जातात व बावांना शिव्या देतात. व बावांची कर्मे पाहिली, तर उच्चार करवत नाही. कोणी व्यभिचारी, कोणी चोर, कोणी लबाड असे आहेत; सारांश, ते साधू नव्हत. परंतु भोंदू साधू आहेत. ते द्रव्याच्या लोभाकरिता जेथे पुष्कळ लोक जमतात तेथे कथा, भजन करतात व लोक जमत नाहीसे झाले, म्हणजे चालते होतात. असे लोकांना ठकवीत फिरतात. आणि आपण काही उद्योग न करता भीक मागून यथास्थित पोट भरितात व लोक तरी किती आंधळे आहेत पहा ! असे लबाड ठगास साधू म्हणून कबूल करतात. साधूने कसे राहावे याविषयी तुकारामाचा अभंग कसा आहे-

हरिभक्त जे म्हणवीती, हीना दीना का मागती ।
देखुनी सभेचा समुदाय, दावी भक्तीचा हा भाव ।
कथेमध्ये हालवी ढोंग, संत नव्हे तो बेसंग ।
पाहुनि स्त्रियांचा तो मेळा, काढि सुस्वर तो गळा ।
तुका म्हणे नव्हे योग, पोटासाठी केले ढोंग ॥१॥
जेथे कीर्तन करावे, तेथे अन्न व सेवावे ।
तट्टू बैलांशी दाणा, तेथे मागू नये जाणा ।
बुका लावू नये भाळा, गळा घालू नये माळा ।
तुका म्हणे तेचि संत, बाकी सगळे ते हो जंत ॥२॥

 याप्रमाणे असून वेदशास्त्र सोडून तुकारामपंथ धरतात. मग त्यासारखे