पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३४ : शतपत्रे

न सांगता द्रव्य हरण करतील व ते असे म्हणतील की, काही पैसा असला तर सर्व प्रायश्चित्त करा आणि आमचे हातावर उदक सोडून आम्हास द्या. म्हणजे तुम्ही देवाजवळ जाल. अशी पैसा काढावयाची तजवीज सांगतील. श्रीमंताचे घरी भट गेला, तर सर्व सांगेल आणि गरिबाचे घरी गेला, तर त्याच्याजवळ पैसा नाही, असे पाहून त्याचे मनात येईल की, हा भिकारी, यांस मोक्षास नेण्यास पैशाशिवाय मी काय सांगू ? पैसा असता तर मग काही तरी सांगितले असते. पैशाशिवाय ईश्वरप्राप्ती होत नाही. जे द्रव्यवान तेच धर्म करून देवाजवळ जातात. हे मत ब्राह्मण लोकांमध्ये चालू आहे. त्याप्रमाणे भट गरिबाजवळ मुळीच जाणार नाहीत. श्रीमंताजवळ पैसा काढावयाकरिता जमतात. अशी या भटांची वर्तणूक आहे.
 भट एखाद्याचे घरी त्याचा नातलग असला, म्हणजे यजमानाचे मनात त्यांस काही तरी पोचवावे असे असते. मग भट सांगू लागतो की, चार महिने नित्य दान करावे. रोज देवापुढे पैसा ठेवावा. नैवेद्यास रोज साकर असली पाहिजे. असे सांगून ते सर्व आपण घेतो. याप्रमाणे यजमानापासून शेंपन्नास रुपये मिळवून निर्वाह करतो. बरे, यात काही उपयोग किंवा धर्म झाला काय ? प्रत्येक गृहस्थाचे घरी भट म्हटला म्हणजे बहुधा बायकोचा भाऊ असतो. याप्रमाणे नाती असतात. मग बायकोही आपल्या भावास पैसा पोचविण्याकरिता नवऱ्यास सांगते की, पुढे चातुर्मास आला आहे; दर व्यतिपातास गोप्रदानाबद्दल दोन रुपये देत जा. मग ते आपले भावास देवविते. याप्रमाणे किती एक लोक ठकले जातात; परंतु हा व्यय काही चांगला झाला की काय ? याप्रमाणे माझे उत्तर पहिल्या कलमाचे आहे.
 आता दुसरे कलमाचा जबाब लिहिला आहे, त्याचे उत्तर. परमेश्वराचे स्मरण करतात, असे 'यथार्थवादी' म्हणतो; परंतु कोणता ब्राह्मण देवाचे स्मरण करतो ? जर कोणी मरण पावत असला किंवा श्राद्ध असले, तर ब्राह्मणाचे स्मरण करण्याची रीती अशी आहे की, वेदाचे दोनचार वर्ग मोठ्याने म्हणतात; परंतु जो मरत असतो, त्यांस किंवा जो म्हणतो, त्यांस त्यातील अर्थ काही समजत नाही. ईश्वराचे स्मरण करण्यात काही तरी ईश्वराचा विचार झाला पाहिजे. जे २४ पाठ गीतेचे किंवा विष्णुसहस्रनामाचे ३०० पाठ करतात, किंवा कोटिलिंगे सकाळपासून सारा दिवस करतात, त्याजकडून वास्तविक काही भजन झाले की, काय ? व त्यांस ईश्वराजवळ गती मिळेल की काय ? व त्यांस आपण लहान, मनुष्याची शक्ती लहान असे वाटेल की काय ? जे नित्य पाठ करतात आणि अर्थ समजत नाहीत, ते ईश्वराविषयी काय समजले ? व त्याचे अंतःकरण