पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रत्यक्ष पुरावा व आक्षेपनिरसन

३५

चढतांना डोळे मिटून बेफिकिरीनें न चालतां खबरदारीनेंच पावलें टाकीत चालेल. तसेंच आपल्या भाललिखितांत जेवढी संपत्ति लिहिली असेल तिच्याहून एक कवडीदेखील ज्यास्त किंवा कमी आपल्याला मिळावयाची नाहीं अशी आपली बालंबाल खात्री असली तरी आपल्याला चांगली नोकरी मिळावी किंवा मिळालेल्या नोकरींत चांगली बढती मिळावी असे प्रयत्न आपण नेहमी करीतच असतो. तसेंच एखाद्या मुलाची व मुलीची जन्मगांठ पडणें ही गोष्ट सर्वस्वी ईश्वरी नेमानेमाची आहे असा पूर्ण भरंवसा असणारे आईबापही आपल्या मुलीला शक्य तितके चांगले स्थळ शोधून काढण्यासाठी झटत नाहींत काय ? आणि असें आपण वागतों याचें कारण इतकेंच, कीं परमेश्वरी सूत्राच्या गोष्टीदेखील मानवी प्रयत्नाचे निमित्त पाहून घडत असतात. आम्ही दुसऱ्या एका ग्रंथांत म्हटल्याप्रमाणे दैवाधीन गोष्टींचा प्रवाह आपल्यापुढें वाहत असतो खरा; पण आपल्या स्वतःच्या प्रयत्नाच्या भांड्यानें त्यांतील पाणी आपण भरून घेतल्याशिवाय - आपल्याला मिळावयाचें नाहीं. आणि असें आहे तर संततिनिय- मनाचा प्रयत्न व्यर्थ व हास्यास्पद मानावयास अवकाश कोठून उरला ?
 दुसरा एक आक्षेप उद्भवण्यासारखा आहे तो असा, की विवाहित स्त्री-पुरुषांना संतति व्हावी हें मुळीं निसर्गप्राप्तच आहे, तेव्हां संतति- नियमन हैं निसर्गविरुद्ध होय. पण या आक्षेपाचें चटकन निरसन करतां येण्यासारखें आहे. कोणतीही गोष्ट कितीही नैसर्गिक असली तरी ती कांहीं एका विशिष्ट प्रमाणांत घडेल तोपर्यंतच ती व्यक्तीला काय किंवा समाजाला काय हितकारक होते; आणि त्या प्रमाणाच्या बाहेर ती गोष्ट जाऊं न देणें हें अनैसर्गिक नसून उलट ती तशी जाऊं देणें हेंच निसर्गविरुद्ध समजलें पाहिजे. उदाहरणार्थ, माणसानें जेवणें व पाणी पिणें ही गोष्ट नैसर्गिक आहे; परंतु ती नैसर्गिकच असली तरी लोकांनीं पोट फुटेपर्यंत जेवावें किंवा आरोग्य बिघडेपर्यंत पाणी प्यावें