पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
संतति-नियमन

पण तसे नसेल तर हें रक्त दर महिन्याला गर्भाशयांतून फुटून बाहेर पडतें व योनिमार्गानें वाहूं लागतें.
 अंडवाहिनी ः— अंडवाहिनी दोन असतात, व त्या पातळ नळ्या- सारख्या असतात. त्यांच्या योगानें दोन्ही अंडाशयांचा आणि गर्भा- शयाचा संबंध जडतो. अंडवाहिनी म्हणजे अंडाशय आणि गर्भाशय यांमधील दळणवळणाचे मार्गच होत. दर महिन्याला एक सूक्ष्मांड परिपक्व होऊन अंडाशयांतून निघालें, कीं त्याला वाट देऊन गर्भा- शयापर्यंत पोचवावयाचें हेंच या अंडवाहिनी नलिकांचें मुख्य कार्य होय. पुरुषाच्या रेतांतून सुटलेल्या लाखों सूक्ष्मत्रीजांपैकी कांहीं जेव्हां गर्भाशयांत शिरतात व अंडकाच्या शोधार्थ वेगानें धांवतात तेव्हां शेवटीं त्यांपैकी एकाची व सूक्ष्मांडाची गांठ बहुधा अंड- वाहिनींतच पडते, व त्याच ठिकाणीं सूक्ष्मांडक सूक्ष्मबीजाकडून सुफलित होतें. अशा प्रकारें सुफलित झाल्यानंतर सूक्ष्मांड खालीं गर्भाशयांत उतरतें, तेथेंच कोठें तरी जागा शोधून राहतें, गर्भरूपानें वाढतें, व शेवटी अपत्यरूपानें बाहेर येतें.
 गर्भाशयः- वर आम्हीं म्हटलेंच आहे, कीं गर्भाशय म्हणजे सुफलित सूक्ष्मांडक ज्या ठिकाणीं वाढीस लागून अपत्यरूप धारण करतो, ती जागा होय. गर्भाशय हा एक आंतून पोकळ असलेला मांसल अवयव आहे. त्याच्या कडा चांगल्या जाड असतात, आणि गर्भाच्या वाढीच्या वेळीं त्याला पाहिजे तितका अवसर देण्यासाठी विस्तार पावण्याचा गुण त्याच्या अंगी आहे. त्याचा आकार साधा- रणपणें पेरूसारखा असतो, आणि त्याचा रुंद भाग वरच्या बाजूस आणि निमुळता भाग खालच्या बाजूस असा तो आधारलेला असतो. वयांत आलेल्या स्त्रीचा गर्भाशय सुमारें तीन इंच रुंद आणि एक इंच जाड असतो, आणि त्याचे वजन एक किंवा दीड औंस असतें. गर्भाशयाच्या आंतील पोकळी साधारणपणें त्रिकोणाकृति असते.