'भारता'साठी/महात्माजींचा पराभव



महात्माजींचा पराभव


 माझं सुदैव म्हणा की दुर्दैव, आयुष्यात मला कोण्या महात्म्याचं दर्शन झालं नाही. गांधीजी गेले तेव्हा मी लहान होतो, विद्यार्थी होतो त्यामुळे त्यांच्या दर्शनाचा योग आला नाही. मोठा झाल्यानंतर मी माझ्या कामाला लागलो. दरम्यान, काही महात्मे समोर येऊन गेलेही असतील पण त्यांचं महात्म्य मला जाणवलं नसावं म्हणून मला दुर्दैवी म्हणा. नंतर कदाचित लक्षात येईल की, अमुक एक व्यक्ती भेटली होती आणि ती महात्मा होती; पण आजपर्यंत असं जाणवलं नाही.
 याला एक अपवाद आहे. त्यांची भेट झाली होती म्हणणं कठीण आहे; पण रविशंकर महाराजांचं जेव्हा दर्शन झालं तेव्हा ते त्यांच्या अखेरच्या आजारपणात होते. बिपीनभाई मला त्यांच्यासमोर घेऊन गेले. रविशंकर महाराजांना बोलताना कष्ट होत होते, ऐकू येण्यातही अडचण होती, पण त्यांची बुद्धी स्वच्छपणे काम करीत होती. बिपीनभाईंनी जेव्हा माझं नाव सांगितलं तेव्हा माझं नाव शेतकरी आंदोलनाशी जोडलेलं आहे याची त्यांना माहिती असल्याचे जाणवले. हे एक उदाहरण सोडलं तर महात्म्यांचं दर्शन होण्याचे भाग्य - सौभाग्य किंवा दुर्भाग्य मला लाभलेलं नाही.
 सौभाग्य शब्द मी यासाठी वापरतो की सर्वसाधारण माणसाच्या जीवनावर महात्म्यांच्या संपर्काचा परिणाम काय होत असावा हे सांगणं कठीण आहे; पण अनेक महात्म्यांच्या परिवारांची मती व गती कुंठित झालेलीच पाहायला मिळते.
 महाकवि कालिदासांनी रघुवंशाच्या 'इंदुमति स्वयंवर' या अध्यायात उपमालंकाराचा अत्यंत सुरेख आविष्कार दाखविला आहे. राजकन्या इंदुमतीच्या स्वयंवरासाठी बरेच राजपुत्र मंडपात बसले होते. इंदुमतीला घेऊन सुनंदा एका एका राजकुमाराचा परिचय करून देत पुढे पुढे जात होती. जसजशी इंदुमती एखाद्या राजकुमारासमीप येऊ लागे तसतशी त्या राजकुमाराच्या मनात आशा जागी होत असे की ही मलाच माळ घालील आणि त्याचा चेहरा उजळून जात असे; पण त्याला वगळून ती पुढे जाऊ लागताच त्याचा चेहरा काळवंडून जात असे.
 आपल्याही समोर आपल्या आयुष्यभरात काही 'महात्मे' येऊन जात असतील, आपण त्यांचे महात्म्य ओळखू म्हणून त्यांचे चेहरे उजळत असतील आणि आपल्याला त्यांच्यात महात्म्य जाणवले नाही म्हणून ते चेहरा पाडून जात असतील. आपली निराशा होते, त्यांचीही निराशा होत असेल!
 महात्मा म्हणजे अंधारामध्ये प्रकाश देणारा दिवा किंवा उन्हामध्ये छाया देणारा वृक्ष होय असे धरले तरी तो जो काही प्रकाश किंवा ती जी काही छाया असेल त्याचा फायदा घेणे, न घेणे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असते.
 सूर्य आपला प्रकाश सर्व ठिकाणी सारखाच देतो. सूर्याचे प्रकाशकिरण मातीवर पडले तर ते परावर्तित होत नाहीत; पण तेच किरण जर एखाद्या रत्नावर किंवा हिऱ्यावर पडले तर त्यावरून त्यांचे परावर्तन होते आणि रत्न किंवा हिरा मोठा विलोभनीय दिसतो.
 घनदाट सावलीचा वृक्ष रणरणत्या उन्हात चालणाऱ्या वाटसरूसाठी काही काळासाठी विश्रांतिस्थान होऊ शकतो. विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने आपली वाटचाल तो वाटसरू पुढे चालू करणार असेल तर विश्रांतीचा काही उपयोग झाला असे म्हणता येईल; पण जर का वाटसरू त्या सावलीच्या मोहात पडून तिथेच थांबून राहिला तर तो वृक्ष त्या वाटसरूच्या उपयोगी पडला असं म्हणणं कठीण आहे.
 अंधारात एक प्रकाशकिरण चमकला, पुढे पाऊल कसे टाकायचे याचे दर्शन झाले की, त्या प्रकाशकिरणाच्या टप्प्याबाहेरील अंधारातही एखादं पाऊल टाकण्याची हिम्मत आली तर त्या प्रकाशकिरणाच्या जनक दीपाने काही काम केले असे म्हणता येईल; पण त्या दिव्यावरच जीव जडून तेथेच बसून राहिले तर दिव्याचा आपल्याला काही उपयोग झाला असं म्हणणं कठीण आहे.
 मला असं वाटतं की, बऱ्याच महात्म्यांच्या बाबतीत दुर्दैवाची गोष्ट ही घडली आहे की, त्यांच्या सावलीमध्ये ज्यांचं लालनपालन व्हायला हवं होतं, त्यामध्ये जे मोठे व्हायला हवे होते आणि मोठे होऊन त्या सावलीतून बाहेर पडून पुढच्या पिढीसाठी ज्यांनी सावल्यांच्या जागा तयार करण्याची हिम्मत करायला हवी होती ते बहुतांशी त्या महात्म्यांच्याच सावलीत विश्रांती घेत बसले. सावलीतून बाहेर पडण्याची त्यांनी हिम्मत दाखविली नाही.
 मी आजवर अनेक वेळा म्हटले आहे की, महात्म्याचं खरं दुर्भाग्य हे की त्यांचा पराभव जगाने नाही केला, त्यांचा पराभव त्यांच्याच शिष्यांनी केला. त्यांचे शिष्य त्यांना पूर्णांशाने समजू शकले नाहीत आणि त्यांच्या समजुतीमध्ये ज्या गोष्टी बसल्या त्याच ते कर्मकांडाप्रमाणे करत बसले. जयंत्या-पुण्यतिथ्या करणे ठीक आहे, त्यांनाही काही महत्त्व असते; पण त्यातच अडकून राहणे आणि महात्म्याला सापडलेला सत्यकण डावलून फक्त त्या महात्म्याची व्यक्तिपूजा करत राहणे यातच महात्म्यांच्या पराभवाची सुरुवात होते.
 माझं हे विवेचन बऱ्याच जणांना मान्य होणं अवघड आहे. मी स्वत:ला, गांधीजींना सापडलेला सत्यकण जोपासणारा मानतो; पण त्याचबरोबर मी सातत्याने मांडत आलो आहे की कोणा एका व्यक्तीला प्रमाण मानणे आणि असे म्हणणे की कोणत्याही समस्येची उकल कोण्या एका व्यक्तीच्या विचारधारेमध्ये किंवा कोण्या एका ग्रंथामध्ये मिळू शकते हे चूक आहे. असं जर कुणी मनापासून मानत असेल तर त्याचा अर्थ इतकाच की त्या व्यक्तीसमोर खरे प्रश्न अजून आलेच नाहीत. भगवान कृष्ण असो, पुरुषोत्तम राम असो की महात्मा गांधी असोत. कितीही मोठा महात्मा असला तरी तो सांत (Finite) रूप घेऊनच जन्मला होता, कोणीही अनंतर (Infinite) रूपाने जन्मला नव्हता ही बाब जोवर खरी आहे तोपर्यंत सांत महात्म्यांचे दर्शन-विचारप्रणाली अनंत काळपर्यंत चालणारी आहे असं जर कुणी म्हणायला लागलं तर त्याचा अर्थ इतकाच की असं म्हणणारानं अजून विचार करायला सुरुवातच केलेली नाही.
 याचप्रमाणे, जे लोक धर्माच्या अभिमानाच्या गोष्टी बोलतात त्यांच्या बाबतीतही हेच आहे. मी त्या धर्माभिमान्यांना मानायला, त्यांच्याबद्दल आदर बाळगायला तयार आहे की ज्या धर्माचा ते सन्मान करतात, अभिमान बाळगतात, गर्व करतात तो धर्म त्यांना जन्माच्या अपघाताने मिळालेला नाही. ज्या धर्मात जन्मला त्याचा अभिमान बाळगताना त्या धर्माचा विचारपूर्वक अभ्यास केला असण्याची शक्यता नसेल असे नाही; पण असा अभ्यास केल्याचे सिद्ध करून दाखवावे लागेल. जो धर्म जन्माच्या अपघाताने मिळालेला नाही त्याबद्दल एखादी व्यक्ती अभिमान बाळगत असेल तर तिने त्या धर्माचा विचारपूर्वक अभ्यास केला आहे असं समजायला हरकत नाही.
 गांधीजींच्या एका परमभक्ताबरोबर चर्चा चालली होती. ते म्हणाले की, "आम्ही गांधीजींना एक प्रकारे 'संपूर्ण महात्मा' मानतो." मी जेव्हा म्हटले की, "मला हे सैद्धांतिकदृष्ट्या अशक्य वाटते." तेव्हा ते म्हणाले, "आम्ही सर्व तऱ्हेने विचारविमर्श करून या निर्णयाप्रत आलो आहोत की गांधीजी 'संपूर्ण महात्मा होते." मला वाटतं अशी माणसं 'ऊशीप ज्ञहरी हश वेशीप ज्ञ' (म्हणजे त्याला समजत नाही की, त्याला समजत नाही.) या प्रकारात बसतात.
 मी आग्रहपूर्वक मानतो की गांधीजींना सापडलेला सत्यकण जोपासून पुढे नेणारा मी आहे आणि यातच गांधीजींबद्दलचा माझ्या मनातला परम आदर मी व्यक्त केला आहे. परमेश्वराची कल्पना पिता म्हणून केली तर कोणाही पित्याला आपला मुलगा सकाळ दुपार संध्याकाळ, सर्व काळ आपल्या पायाला हात लावून सतत आपली पूजा करीत राहावा असं वाटणार नाही. अशा पूजेने चांगला पिता खुश होईल असं मला वाटत नाही. त्याचप्रमाणे, महात्म्यांच्या बाबतीतही त्यांची सकाळ, संध्याकाळ पूजा करणे, त्यांनी सांगितलेला शब्द न् शब्द बरोबरच आहे, त्यात चुकीचं काही नाही, असं मानणं म्हणजे त्या महात्म्यांशी केलेला द्रोहच आहे.
 महात्म्यांसंबंधी या विवेचनात विशेषकरून मी महात्मा गांधीजींच्या संदर्भात भर देणार आहे. कारण महात्माजींचा अभ्यास गांधीभक्तांप्रमाणे मीही केला आहे. गांधीजींचं जे काही साहित्य माझ्या वाचनात आलं आहे त्यावरून मी ठामपणे म्हणू इच्छितो की 'गांधीजींइतका गतिमान (Dynamec) दर्शन देणारा महात्मा सापडणे विरळाच.'
 सेवाग्रामला मी बऱ्याचदा येतो, येत राहणार आहे; यावंसं वाटतं; पण इथे आल्यानंतर एका गोष्टीचे दुःख होतं. खरं तर सेवाग्राम हे एक स्फूर्तिस्थान आहे. इथे माझ्यासारखे, जे गांधीपरिवारातील म्हटले जात नाहीत, आले म्हणजे त्यांच्याही मनामध्ये काही ना काही प्रेरणा उचंबळून येतात; पण एक प्रश्नही उभा राहतो. गेल्या सत्तेचाळीस वर्षांमध्ये, गांधीजींच्या निर्वाणानंतर गांधीपरिवाराने आपली जबाबदारी पार पाडली आहे काय? मला वाटतं कोणीतरी या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं पाहिजे.
 गेले दोन महिने महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांत मी निवडणुकीच्या प्रचारसभांतून भाषणे करीत फिरतो आहे. प्रत्येक भाषणात काही प्रश्न पुढे ठेवले. त्या प्रश्नांवर विचारविमर्श होणे आवश्यक आहे.
 पहिला प्रश्न. गांधीजींची इच्छा सव्वाशे वर्षे जगण्याची होती. आज गांधीजी असते तर ते सव्वाशे वर्षे वयाचे असते. आज जर ते असते तर त्यांनी फक्त पंचा वापरण्याऐवजी अंगभर कपडे वापरायला सुरुवात केली असती का? ते म्हणाले असते का की, आता देशातील सर्व लोकांना पुरेसे कपडे वापरायला मिळू लागले आहेत, आता मला इतके कमी कपडे वापरण्याची जरूरी नाही?
 दुसरा प्रश्न. आज गांधीजी असते तर सेवाग्राममध्येच असते का साबरमतीला परत गेले असते? ते म्हणाले असते का की साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला निघताना मी प्रतिज्ञा केली होती की देशाला संपूर्ण स्वराज्य मिळेपर्यंत मी या आश्रमात परत येणार नाही; आता देशाला पूर्ण स्वराज्य मिळाले आहे तेव्हा मला साबरमतीला परतायला हरकत नाही?
 तिसरा प्रश्न. ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान केले, हौतात्म्य पत्करले त्यांच्या आत्म्याला देशाची आजची परिस्थिती पाहून सुख लाभत असेल का?
 महाराष्ट्र आणि गुजरातमधील प्रचारसभांत हे तीन प्रश्न विचारून लोकांकडून त्यांची उत्तरे मागत आलो.
 भले, मनमोहनसिंग म्हणोत की आम्ही प्रगती केली आहे किंवा पी. व्ही. नरसिंह राव म्हणोत की आम्ही देशाचा विकास केला आहे; पण मला कोणत्याही सभेत लोकांच्या चेहऱ्यावर या प्रश्नांची होकारार्थी उत्तरे दिसली नाहीत.
 अजून एक प्रश्न मी विशेषतः गुजरातमध्ये विचारला.
 आज निवडणुकीमध्ये आपल्यासमोर तीन प्रमुख पक्ष आहेत. एक पक्ष आहे, भाजप जो विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहे, राष्ट्रीय सेवक संघाशी संबंधित आहे. गांधीजींच्या देहाच्या हत्येची जबाबदारी ज्यांच्यावर टाकली जाते अशा लोकांशी हा पक्ष संबंधित आहे. त्यांच्यातील काही वक्ते आजसुद्धा गांधीजीना शिव्या देतात.
 दुसरा पक्ष आहे काँग्रेस. मी गेली १५ वर्षे सातत्याने मांडत आलो आहे की, गांधीजींच्या हत्येनंतर नेहरूंनी देशाचा कारभार एखाद्या सिनेमातील श्रीमंताच्या दिवाणजीने मालकाच्या मृत्यूनंतर केलेल्या कारभाराप्रमाणेच केला. मरणाच्या घटका मोजणाऱ्या श्रीमंताने दिवाणजीच्या हाती विश्वासाने तिजोरीच्या किल्ल्या सोपवून म्हणावे की माझी मुलं लहान आहेत, अजाण आहेत, त्यांची काळजी घे; पण दिवाणजीने मात्र सर्व मालमत्तेवर डल्ला मारून मालकाच्या मुलांना देशोधडीला लावावे. गांधीजींच्या आर्थिक विचारसरणीची हत्या पंडित नेहरूंनी केली. त्या नेहरूंचा काँग्रेस पक्ष सत्तेचाळीस वर्षे या देशावर राज्य करीत आहे. 'समाजवाद' शब्दाची भूल पडल्यामुळे कदाचित, सर्वसामान्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नसेल; पण जेव्हा नेहरू-गांधीजींचा विचार फेकून देऊन देशाला चुकीच्या दिशेने घेऊन जात होते - ज्यामुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले. देश बुडाला आणि आज साऱ्या देशाला कळून चुकलं आहे की ती चुकीची दिशा होती. तेव्हा ती दिशा चुकीची आहे हे देशाला सांगण्याची जबाबदारी स्वतःला गांधी परिवारातील म्हणविणारांची होती. गांधी परिवाराने गेल्या सत्तेचाळीस वर्षांत आपली ही जबाबदारी पार पाडली आहे का? का तेसुद्धा शासनाकडून मिळणाऱ्या सोयीसवलतीतच गुंतून पडले? नेहरू राजवटीने देशाची, देशातील सर्वसामान्य जनतेची जी लूट केली त्यात अन्यार्थाने गांधी परिवाराचाही काही हात नव्हता ना?
 तिसरा पक्ष आहे कांशीरामजींचा बहुजन समाज पार्टी. ते लोक तर आजही गांधीजींना खुलेआम शिव्या देत आहेत. त्यांना म्हटलं की, यात सभ्यपणा नाही, शिष्टाचार नाही तर तेही ते मानायला तयार नाहीत. गांधीजींच्या 'हरिजन' शब्दाचीही ते कुचेष्टा करतात. या पक्षाच्या लोकांनी गांधीजींच्या समाजशास्त्राची हत्या केली आहे.
 देश स्वतंत्र झाल्यानंतर सत्तेचाळीस वर्षांनी आज लोकांसमोर तीन पक्ष आहेत - एक गांधीजींच्या देहाच्या हत्येशी संबंधित, दुसरा त्यांच्या अर्थविचाराच्या हत्येशी संबंधित आणि तिसरा त्यांच्या समाजशास्त्राच्या हत्येशी संबंधित. गांधीजींच्या या सेवाग्रामच्या आश्रमामध्ये वृक्ष वाढत आहेत, रोपे वाढत आहेत; इथे सावलीही भरपूर आहे; इथे आल्यानंतर इतिहासाच्या आठवणींना उजाळा मिळतो; पण गांधी विचारांचा जो आत्मा आहे तो पुढे नेणारं आंदोलन काही या आश्रमातून पुढे आले नाही. मग गेल्या सत्तेचाळीस वर्षांत गांधी या महात्म्याच्या या तिहेरी हत्येला या महात्म्याच्या सावलीत विश्रांती घेणारा गांधीपरिवारही जबाबदार नाही काय?
 गांधी परिवाराने सेवाग्राममधून गांधीजींचा कार्यक्रम पुढे आणण्याचे आंदोलन उभे केले नाही कारण ते गांधीजींच्या सावलीत अडकून पडले, त्यांची केवळ पूजाअर्चा करीत राहिले. गांधीजींनी निर्माण केलेल्या सावलीत काही काळ विसावून पुढच्या मार्गक्रमणेस सुरुवात करण्याऐवजी ते या मठात तळ ठोकून बसले आणि माझं स्पष्ट मत आहे की, एका मठातून दोन महात्मे कधीच निर्माण होऊ शकत नाहीत. एका मठातून एकच महात्मा बनतो, त्यातील बाकी सर्वजण त्या मठाच्या सावलीतच अडकून बसतात, त्यांच्याकडून दुसरी क्रांती घडल्याचे ऐकिवात नाही.
 मला असं वाटतं आहे की मोठा बदल, केवळ देशातच नव्हे तर साऱ्या जगात घडू लागला आहे. आजपर्यंत एखाद्या व्यक्तीचे किंवा समाजव्यवस्थेचे मोठेपण ती व्यक्ती किंवा व्यवस्था दुसऱ्यांसाठी किती काम करते आहे, "दुःखतप्तानाम् प्राणिनाम् आर्तिनाशनम्'साठी ती किती काम करते आहे यावर ठरत असे; पण दुसऱ्यांसाठी जगणाऱ्यांनी शेवटी काय साध्य केले हे तपासायला गेलो तर लक्षात येते की, जाहीररित्या स्वार्थ साधणाऱ्या लोकांनी जगाचं फारच कमी नुकसान केलं आहे; उलट, परमार्थाच्या गोष्टी करणारांनी जगाचं फार मोठं नुकसान केलं आहे. एकूण परिस्थितीवर प्रामाणिकपणे चिंतन करावयाचे असेल तर या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे की स्वार्थ आणि परमार्थ यापैकी कोणत्या प्रवृत्तीने जगाचे जास्त नुकसान केले.
 जेथे जेथे संपत्ती गोळा होते, जेथे जेथे सत्ता असते तेथे भ्रष्टाचार येतो आणि समाजात सत्ताकेंद्र असल्याशिवाय चालत नाही. समाजवादाने मांडणी केली की, समाजातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षमतेनुसार समाजाला काही देत राहाते आणि आपापल्या आवश्यकतेइतकंच समाजाकडून घेत राहाते असं झालं तरच माणूस 'समाजवादी व्यक्ती' बनेल आणि त्यातून भ्रष्टाचाराचा प्रश्न मिटून जाईल. कितीतरी वर्षे निघून गेली. मार्क्सचाही पाडाव झाला; पण अशी 'समाजवादी व्यक्ती' काही तयार झाली नाही. मोठमोठ्या संस्थांमध्ये महात्मा गांधींच्या कल्पनेनुसार 'विश्वस्त' भावनेने काम करणारी माणसेही सापडणे दुर्मिळ, असतीलच तर ती नियम सिद्ध करायला लागणाऱ्या अपवादाइतकीच सापडतील. समाजवादाची मांडणी होऊन शंभर वर्षे होऊन गेली; पण अशी उन्नत 'समाजवादी व्यक्ती' तयार होऊ शकली नाही. तेव्हा आता समाजाला समजून चुकले आहे की असा कुणी उन्नत महात्मा वरून येणार नाही जो आपल्याला आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवील. आर्थिक उन्नतीसाठी आजवर अनेक महात्म्यांनी परमार्थाचा, समाजकल्याणाचा मार्ग सांगितला; पण त्या मार्गाने सर्वसामान्यांची काही आर्थिक उन्नती झालेली दिसत नाही; उलट, समाज आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक खोल गर्तेत चाललेला दिसत आहे.
 आता हे सिद्ध झाले आहे की कुठे मॉस्कोमध्ये बसून किंवा दिल्लीमध्ये बसून कोणी किती धान्य पिकवावे, कोणी किती उत्पादन करावे हे ठरवून समाजाची प्रगती होऊ शकत नाही. लोकांना हेही समजते आहे की याला चांगली पर्यायी व्यवस्था समोर दिसत नाही. आज नाही. उद्यापरवाही असेल किंवा कसे सांगता येत नाही; पण त्यांना एक गोष्ट निश्चित समजते की, माणसाला आपापल्या कुवतीनुसार एका विशिष्ट व्याप्तीच्या क्षेत्राची जाण होण्याची नैसर्गिक देणगी मिळालेली आहे. ज्यांनी आपल्याला त्या पलीकडचेही दिसते असे आजवर म्हटले. त्यांचा दांभिकपणा समाजाच्या खालावत जाणाऱ्या परिस्थितीने उघड केला आहे.
 आपापल्या दृष्टीने आकलन करून आपले सुखसमाधान, आपल्या परिवाराचे सुखसमाधान वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न करणारे लोक, दूरदृष्टी ठेवून निश्चित स्वार्थाचा विचार करणारे लोक तो स्वार्थ साधताना एकमेकांबरोबर स्पर्धा करणारे, एकमेकांशी झगडणारे, प्रयत्न करीत असताना चुका करणारे, धडपडणारे लोकच पुढे उभे राहू लागले आहेत. जगामध्ये जर काही विकास झाला असेल तर तो केवळ, स्वार्थाने प्रेरित होऊन एकमेकांशी स्पर्धा करीत पुढे चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वसामान्यांमुळे झालेला आहे; महात्म्यांच्या आधाराशिवाय झाला आहे. हे दर्शन पुढे येणार असेल तर आपल्या सर्वांवर जबाबदारी येऊन पडते की, या विषयावर प्रकाश पाडला पाहिजे. समाजात मोठा बदल घडत आहे. दुसऱ्यांसाठी जगणारांचा नाही, तर स्वतःवर निष्ठा ठेवणाऱ्या व्यक्तींचा जमाना येत आहे. व्यक्तींचा विकास म्हणजेच समाजाचा विकास हा सिद्धांत पुढे येत आहे आणि या सिद्धांताच्या सिद्धतेसाठी कोण्या महात्म्याच्या दलालांची आवश्यकता नाही.

(२१ मार्च १९९५)

♦♦