'भारता'साठी/मुर्दांडाचा देश, कचखाऊ शासन



मुर्दाडांचा देश, कचखाऊ शासन, बुळी प्रजा


 बिजिंगच्या ऑलिंपिक खेळांत अखेर भारताचे घोडे गंगेत न्हाले. एका बिंद्राला एका विशिष्ट प्रकारच्या नेमबाजीच्या स्पर्धेत अखेर सुवर्णपदक मिळाले. हा खेळ काही जलतरणासारखा लक्ष वेधून घेणारा नाही. नेमबाजी अचूक लागण्यात काही नशिबाचा आणि योगायोगाचाही भाग असू शकतो; पण, आधुनिक ऑलिंपिकच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय खेळाडू सुवर्णपदक विजेता झाला. साहजिकच, आनंदीआनंद जाहला. वेगवेगळ्या राज्यांनी बिंद्रावर पैशाचा आणि देणग्यांचा वर्षाव केला. दोन दिवस भारतातील सगळ्या वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर हे कौतुक झळकले.

 योगायोगाची गोष्ट अशी की, या स्पर्धेत १९७२ च्या म्युनिच येथील स्पर्धेतील अमेरिकन तरुणपटु मार्क स्पिट्झचा सात सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम तोडण्याकरिता अहमहमिका चालू होती. अमेरिकच्याच २३ वर्षीय मायकेल फेल्प्सने ७ नवीन उच्चांक प्रस्थापित करीत या स्पर्धेत ८ सुवर्णपदके जिंकून हा विक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याने गेल्या अथेन्सच्या स्पर्धेत ६ सुवर्णपदके व २ कांस्यपदकांची कमाई केली होती. त्यामुळे त्याची सुवर्णपदकांची एकूण संख्या १४ झाली आहे.

 अगदी किरकोळ छोट्याशा देशातही सुवर्णपदक विजेते अनेक आहे. एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या भारत देशात एक सुवर्णपदक मिळवण्याचे एवढे अप्रूप का असावे?

 बिंद्रावरील पारितोषकांच्या वर्षावामुळे कदाचित, यापुढील खेळात आणखी एखादे सुवर्णपदक जिंकणाराही भारतीय निघण्याची शक्यता आहे. क्रिकेट खेळामध्ये पैसा खेळू लागला तशी काही खेळाडूंच्या कामगिरीत चांगल्यापैकी सुधारणा दिसून आली त्याचप्रमाणे.

 एरवी २१ वे शतक चीन आणि भारत या दोन देशांचे आहे असे दिवसरात्र ओरडून सांगणाऱ्या मंडळींना चीन अमेरिकेशी स्पर्धा करीत सुवर्णपदके मिळवतो आणि भारताला एकाच सुवर्णपदकावर समाधान मानावे लागते याची खंत वाटत नाही. भारतीय तसे समाधान मानतात. कोणत्याही क्षेत्रात तेजस्वीपणे आणि आक्रमकतेने जग पादाक्रांत करण्याची प्रवृत्ती भारतीयांना फारशी सोसत नाही असे दिसते.

 इतिहासकाळात राजपूत वीरांची सारी मर्दुमकी परकीयांचा हल्ला झाला, आता तो हल्ला परतवण्याची काहीही शक्यता नाही असे स्पष्ट झाल्यानंतर सर्व स्त्रियांना जोहारासाठी पाठवून देऊन त्यानंतर 'जय एकलिंग जी' अशा घोषात शत्रूवर तुटून पडून अतुल पराक्रम दाखवणे इतपतच मर्यादित होती. असे प्रसंग सर्व इतिहासात भरून राहिले आहेत. या शौर्याचा उपयोग दिल्लीश्वरांवर स्वारी करण्यापर्यंत कधी फारसा पोहोचला नाही. विजिगिषुपणाच्या या अभावाला सामाजिक, आर्थिक आणि इतरही कारणे असतील. कदाचित, या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून भारतीयांच्या मनात मरण स्वीकारून हौतात्म्याची तयारी होते, पण 'मारू आणि जिंकू' अशी आक्रमकता भारतीयांना पेलत नाही, पचत नाही; किंबहुना, अशी आक्रमकता ही अनैतिक आहे अशी सर्वदूर भावना या भारतात पसरली आहे.

 ढक्रकेटच्या खेळातसुद्धा जागतिक विक्रम करणारे वीर भारतात अनेक झाले; पण, भारतीय संघाची सगळ्यात चांगली कामगिरी अनेक वेळा 'फॉलो ऑन' मिळाल्यानंतर डावाचा पराभव वाचवण्याकरिता दिसून आली आहे. या उलट, श्रीलंकेसारख्या छोट्या देशानेसुद्धा अलीकडच्या कसोटी सामन्यात भारतातील रथीमहारथी खेळाडूंची कशी त्रेधातिरपीट करून टाकली हे सर्वांनी पाहिले आहे.

 अगदी अलीकडे, बंगलोर आणि अहमदाबाद शहरात आतंकवाद्यांनी लागोपाठ बॉम्बस्फोट घडवले. अहमदाबादमध्ये पन्नासावर माणसे मेली, शंभरावर जखमी झाली. ज्या कुटुंबांतील माणसे गेली, अपंग झाली त्या कुटुंबातील लोकांना प्रचंड संताप येऊन अंगाची लाहीलाही झाली असेल; पण, ती चीड आणि संताप क्षणभरच टिकला. गुजरातमध्ये भेट देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आले, स्वतः प्रधानमंत्री आले. त्यांनी गुजराथी जनतेची पाठ थोपटली आणि आतंकवाद्यांच्या प्रक्षोभक कृत्यांनंतरही मनाची शांती ढळू न देता संयम ठेवल्याबद्दल प्रशंसा केली. गुजरातचे मुख्यमंत्री स्वतः नरेंद्र मोदी यांनीही अशीच शाबासकी दिली. आपल्या घरची माणसे मारली गेली तर त्याबद्दल दुःख ठीक आहे; पण, संताप

येऊ देणे ही काही फारशी चांगली गोष्ट नाही हे आता सर्वमान्य झाले आहे. आतंकवादी कोण आहेत, त्यांचे करविते कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. हे सारे कोठे रहातात, कोठे लपतात, स्फोटके कोठे जमवतात हेही सर्वांना माहीत आहे; पण, त्याबद्दल बोलणे सभ्यतेचे मानले जात नाही. पोलिसांच्या चौकशीत एखाद्या संशयितावर पोलिसांनी काही बळाचा वापर केला तर पोलिसांचा निषेध करण्याकरिता छऋज (गैरसरकारी स्वयंसेवी संस्थां) चे मोठे जाळे तयार झाले आहे. आतंकवाद्यांच्या कृत्यांना बळी पडलेल्या निरपराध नागरिकांकरिता आसवांची दोन टिपे गाळणारेसुद्धा दुर्मिळ. आतंकवाद्यांच्या मानवी हक्कांची जपणूक झाली पाहिजे, याबद्दल आग्रह धरणाऱ्या संस्था अनेक आहेत; पण, प्रस्थापित शासनाविरुद्ध हत्यार घेऊन उठणाऱ्या आतंकवाद्यांना जास्तीत जास्त युद्धकैदी म्हणूनच वागणूक दिली जाऊ शकते असे छातीठोकपणे म्हणण्याची कोणी हिम्मत करीत नाही. आतंकवाद्यांमार्फत त्यांचे करविते धनी भारतावर अप्रत्यक्ष युद्ध (इ) चालवीत आहेत असे अनेकांनी म्हटले, तर त्याचे तर्कशुद्ध उत्तर द्यायला कोणी धजावत नाही. भारतीयांतील तेजस्विता कोठे गेली? प्रतिकार न करता मार खाऊन घेऊन आत्मपीडनातच महात्मेपण मानण्याची ही प्रवृत्ती का बळावली? या पलीकडे जाऊन, आपला छळ करणाऱ्यासमोरच नाकदुऱ्या काढाव्या, त्याचेच कौतुक करावे हे का घडते आहे?

 ही लाचारीची मनोवृत्ती इतरत्र कोठे दिसत नाही असे नाही. विमानांच्या अपहरणातून सुखरूप वाचलेले प्रवासी अपहरणाच्या काळात अपहरणकर्त्यांनी त्यांना कसे धाकात ठेवले आणि प्रवाशांपैकी काहींना कसे मारुन टाकले याचाही विसर पडन. बाहेर आल्यावर आतंकवादी व्यक्तिशः किती भली माणसे होती ज्यांनी काही प्रतिकार केला नाही त्या सगळ्या प्रवाशांना त्यांनी किती चांगले वागवले याचे गुणगान गातात; पण, भारताच्या या साऱ्या राष्ट्राचे अपहरण कधी झाले, कसे झाले, अपहरणकर्ते कोण होते आणि साऱ्या देशाला पक्षाघात घडवणारा हा षंढपणा सर्व भारतीयांना कसा काय ग्रासू शकला?

 नागरिकांनी आतंकवाद्यांबद्दलची आपली चीड दाखवण्याकरता सूडबुद्धीने काही करू नये असे राज्यकर्ते बजावून सांगतात ते समजण्यासारखे आहे. राज्यकर्ते व पोलीस अधिकारी यांच्या मनात अशा घटनांच्या वेळी एकच विचार असतो - प्रथम सारे शांत शांत होऊ द्या, मग बाकीच्या साऱ्या गोष्टींचा विचार करता येईल. ज्या राज्यकर्त्यांनी इंदिरा गांधींच्या वधानंतर दिल्ली शहरभर शिखांचे शिरकाण घडवून आणले, एवढेच नव्हे तर त्यावर, 'एखादा मोठा वृक्ष कोसळला,

तर धरणी हादरायचीच' असे समर्थन केले त्यांच्याच पक्षाची मंडळी आता 'चिडू नका, रागवू नका, आहे ते सोसून घ्या' असा उपदेश करतात आणि हाच या देशातील सभ्याचार आहे, शिष्टाचार आहे असे स्वीकारून लोकही पुढच्या आतंकवादी घटनांची वाट पहात बसून रहातात; पण, निवडून गेलेल्या सरकारला आणि त्यातील जबाबदारी व्यक्तींना अशी भूमिका घेता येणार नाही. लोक शांत राहिले, त्यांनी नागरिकांचे कर्तव्य बजावले; पण, यानंतर जबाबदारी चालू होते ती शासनाची. दोषी लोकांना शोधून काढणे, त्यांना मदत, आसरा आणि शस्त्रपुरवठा करणारांनाही वेचून काढून, त्यांना प्रस्थापित कायद्याप्रमाणे तत्परतेने शिक्षा देणे ही सरकारची जबाबदारी आहे. षंढपणा अंगी बाणवणारा पक्षाघात सर्वसामान्य भारतीयांनाच झाला आहे असे नाही तर त्यांच्या शासनालाही झाला आहे.

 शासनकर्त्यांनी दयाळू असावे, कष्टाळू असावे अशा बुद्धीचे सम्राट अशोकाचे भूत भारतीय शासकांच्या डोक्यावर बसते. कोणाही पंतप्रधानाची आपल्या एका निर्णयामुळे कोणालाही धक्का पोहोचू नये, कोणाचाही जीव जाऊ नये अशी आत्यंतिक इच्छा असते. आतंकवाद्यांपुढे शरणागती पत्करल्यामुळे ते अधिक शेफारतात. आतंकवादाला सर्वंकष विरोध झाला पाहिजे ही गोष्ट नुसती बोलायची. राज्यकर्त्यांना जो कठोरपणा अपरिहार्यपणे दाखवावा लागतो तो दाखविण्याची हिम्मत असलेले राज्यकर्ते स्वातंत्र्यानंतर देशाला मिळालेच नाहीत.

 "गांधी आणि त्यांचे अनुयायी ही सारी काड्यामोड्याची माणसे आहेत, त्यांना देशावर शासन करणे जमणार नाही" ही चर्चिलची भविष्यवाणी खरी ठरली. कोणताही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली की ऐनवेळी कच खाणे याला इंग्रजीत 'पिवळेपणा' असा शब्द आहे. मराठीतला शब्दमात्र अर्वाच्य आहे. गांधींच्या स्वातंत्र्यआंदोलनातून तयार झालेले सर्व नेतृत्व पिवळे निघाले. गांधीजींनी भ्याडपणाला अहिंसेचा मुलामा कधी दिला नाही; पण, त्यांचे सारे शिष्य आपला भ्याडपणाच अहिंसा शब्दाच्या आड लपवून राहिले आहे.

 मुफ्ती सईद यांच्या मुलीचे आतंकवाद्यांनी अपहरण केले त्या वेळी मी विश्वनाथ प्रताप सिंगांच्या जवळ होतो. त्यांनी माझे मत विचारल्यानंतर मी स्पष्टपणे आतंकवाद्यांची मागणी फेटाळून लावण्याचा सल्ला दिला होता. विश्वनाथ प्रताप सिंग हा भारतातील सर्वाधिक लेचापेचा पंतप्रधान. त्यांना ते झेपले नाही. आतंकवाद्यांची भूक वाढली.

 कंदाहार विमान अपहरण प्रकरणाच्या वेळीसुद्धा जे व्हायचे असेल ते होऊ द्या, आम्ही आतंकवाद्यांच्या मागण्या मान्य करणार नाही अशी भूमिका अटल

बिहारी वाजपेयी यांच्या शासनालासुद्धा घेण्याची हिम्मत झाली नाही. भाजपाची मंडळी नेहमी उत्तुंग ध्येयवादाच्या गप्पा ठोकतात, पण ऐनवेळी त्यांनीही कच खाल्ली. त्याची किंमत त्यांना २००४च्या निवडणुकीत मोजावी लागली. खरे म्हटले तर, 'तेजस्वी भारत' ही घोषणा मोठी क्रांतीकारी होती. त्याचे इंग्रजी भाषांतर कोणा गळबटाने केले. 'खपवळर डहळपळपस' याचा अर्थ 'वरवर चमकणारा भारत' किंवा 'चकाकणारा भारत' असा होतो; 'तेजस्वी भारत' असा नाही. निवडणुकीच्या वेळी भारताला एकदम जागतिक महासत्ता बनवण्याचे आश्वासन लोकांना पटले नाही. कंदाहारच्या विमान अपहरणप्रकरणी भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने कच खाल्ली नसती आणि खुद्द सुरक्षामंत्र्यांनाच आतंकवाद्यांपुढे नाकदुऱ्या काढायला पाठवले नसते तर मतदारांना 'तेजस्वी भारत' ही घोषणा भावली असती. कथनी आणि करणी यातील हा फरक राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भोवला.

 खेळाचे मैदान असो का दैनंदिन नागरी जीवन असो, भारतीय समाजाला षंढपणाने ग्रासले आहे. त्यांचे नेतृत्वही पिवळ्यांच्या हाती गेले आहे हे ऐतिहासिक सत्य आहे. सर्व भारतखंड ही एक शापित भूमी आहे, ग्रीक परंपरेतील 'डेपीळपशपीं ष उळील' प्रमाणे या भूमीला जो जो स्पर्श करतो त्याचे वीरत्व संपते हा सिद्धांत एका प्रख्यात बंगाली विचारवंताने यापूर्वीच मांडला आहे. येथे आर्य आले, निस्तेज झाले. मुसलमानी आक्रमणाचा वेगही येथेच संथावला. साम्राज्यशाहीसुद्धा येथे नबळ झाली.

 'जनता वीर्यहीन आणि नेतृत्व पिवळे' या निष्कर्षात एक मोठा विचित्र भाग आहे. पराक्रमहीन लोक आपल्यापेक्षा कमजोर कोणी दिसला तर त्याच्यापुढे शौर्य गाजवण्यात धन्यता मानतात. भारतीय समाजाचे असेच आहे. शंभरेक माणसे विमानात नष्ट होतील म्हणून आतंकवद्यांपुढे शेपूट घालणारे, खुद्द भारतीय संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला फाशी देण्यची हिम्मत न करणारे शासन पंधरा वर्षांत दीड लाखावर शेतकरी दारिद्र्यामुळे, कर्जबाजारीपणामुळे हताश होऊन आत्महत्या करतात तरी शेतकऱ्यांना जीव देण्यास भाग पाडणारीच धोरणे क्रूरपणे अमलात आणणारे सरकार इतक्या आत्महत्या झाल्यानंतरही अजून शेतीमालाचे भाव पाडण्याचेच कारस्थान पुढे चालवते. याचा अर्थ असा की, संयमाबद्दल गुजराथी जनतेची पाठ थोपटणारे डॉ. मनमोहन सिंग यांचा संयम सशक्तापुढे नमण्याचा आणि दुबळ्यांवर लाथा झाडण्याच्या मानसिकतेचा आहे. 'वरच्या लत्ता झेलित माथां, सवे झाडिती खाली लाथा' अशांना कवीने 'न

ती निवारी, न ही आवरी बेशरमी हैवान' अशी बिरुदावली देऊनच ठेवली आहे.

 एकेकाळच्या तेजस्वी भारतात हे षंढत्व कोढून आले? इतिहासाचार्य राजवाडे यांच्या शब्दात, 'अन्न सौलभ्य आणि अन्न सौकर्य' यांचा त्यात भाग किती? हे षंढत्व आणण्यात बौद्ध मताची भूमिका केवढी महत्त्वाची? अध्यात्मवादी संतपरंपरेने देशावर ही मरगळ आणली काय? भारतीयांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा या घसरगुंडीत भाग केवढा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे विश्लेषण करून द्यावी लागतील. त्याहीपलीकडे जाऊन पुन्हा एकदा भारत 'पराजित' रहाण्यापेक्षा 'आक्रमक' झालेला जास्त चांगला असा आणि राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी तेजस्वितेचा विचार या षंढ समाजात रूजू शकेल काय, रुजवायचा झाला तर तो कसा याचाही विचार आवश्यक आहे.

(२१ ऑगस्ट २००८)

◆◆