अफाट बाबूलाल


 शेतकरी संघटनेच्या पहिल्या पिढीच्या कार्यकर्त्यांना बाबूलाल परदेशी यांची ओळख होती. त्यांच्याविषयी अनेक आख्यायिका ऐकून माहीत होत्या. संघटनेतील दुसऱ्या आणि अगदी अलीकडच्या तिसऱ्या पिढीला बाबूलाल ही व्यक्ती म्हणा, प्रकरण म्हणा फारसे माहीत नाही. बाबूलाल परदेशी २३ मे २००४ रोजी पहाटे त्यांच्या चिमुकल्या परिवाराला आणि संघटनेच्या मोठ्या कुटुंबाला सोडून गेला.

 गेली कित्येक वर्षे बाबुलालची भेट व्हायची ती कोणत्या ना कोणत्या इस्पितळात. तो अगदी जिवावरच्या दुखण्याने आजारी असायचा आणि आता जगतो का नाही या चिंतेने त्याची बायको, भाऊ आणखी एखादा कुटुंबीय डोळ्यातील पाणी आवरत दरवाजापाशी उभे असायचे.

 हा माणूसच तसा अफाट. अफाट माणसांचा आजार मधुमेह त्याला लहान वयातच जडला. अफाट माणसे जेवण्याखाण्याची शिस्त थोडीच बाळगणार! 'हल्ली लघवीतून मुंगळे जातात हो', हा नंतर अनेकवेळा ऐकलेला विनोद, मी पहिल्यांदा बाबूलालच्या तोंडी ऐकला. काही वर्षांपूर्वी काही जखमेचे निमित्त झाले आणि मोठ्या आतड्याच्या टोकाचा भाग शस्त्रकिया करून काढून टाकावा लागला. जिवावरचे दुखणे. डॉक्टरांनी आशा सोडलेली; पण मी भेटायला गेलो तरी एवढ्या सगळ्या दुखण्यातून डोळ्यातून लकाकणाऱ्या विनोदाचा झोत सोडत, त्याचे हसणे आणि विनोद करणे चालूच असायचे. मी एकदा त्याला म्हटले, "तुझे वागणे पाहून स्वित्झर्लंडमध्ये ऐकलेल्या एका लोककथेची आठवण येते. तिथल्या एक कँटनचे लोक मोठे-विनोदी आणि सतत हसणारे म्हणन काहीसे कुप्रसिद्धच आहेत. या कँटनमधला एक सैनिक जुन्या काळी लढाईवर गेला. धुमश्चक्रीत एक बाण त्याच्या आरपार जाऊन झाडाच्या खोडात रुतला. युद्ध संपले, दोन्ही सैन्ये निघून गेली. हा बहाद्दर आपला झाडाला अडकलेलाच. नंतर दुसऱ्या दिवशी तेथे आलेल्या सेनापतीला हा सापडला. त्याची सुटका केल्यावर सेनापतीने विचारले, "किती वेदना सहन केल्यास. फार दुखत असेल नाही?" सैनिकाने उत्तर दिले, "फारसे नाही, पण हसताना मात्र असह्य वेदना व्हायच्या."

 बाबूलालचे हे असे होते. तो जन्मभर जगाला हसवून गेला; पण त्याचा शेवट मात्र कर्मविपाकाच्या सिद्धांताविषयी जबरदस्त संशय यावा अशा पद्धतीने झाला.

 शेवटी शेवटी संघटनेचे काम सोडून बाबूलालने चाकण जवळच्या एका कारखान्याला मजूर पुरवण्याचे कंत्राट घेतले. व्यवसाय फायद्याचा, बाबूलालच्या घरची व्यवसायाची परिस्थिती झपाट्याने सुधारली. संघटनेच्या कामाच्या काळात पार टोकाला गेलेली ओढग्रस्त त्याने संपवून टाकली. स्वत:चे घर बांधले. भाड्याने देण्याकरिता काही खोल्या बांधल्या. एक मंगल कार्यालयही बांधायला सुरवात केली आणि त्याच्या भाग्याला दृष्ट लागली. कारखान्यातील वादावादीमुळे बहुधा असावे, कोणीतरी त्याच्यावर राग काढला. एक दिवस त्याच्या स्कूटरजवळ बाबूलाल जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत सापडला. लोकांनी त्याला आणून कॅंपातील रुबी हॉलमध्ये दाखल केले.  या काळात मीही एका इस्पितळातून दुसऱ्या इस्पितळात जात होतो. शेजारच्या इस्पितळात मी होतो. बाबूलालला अत्यवस्थ अवस्थेत इस्पितळात ठेवले आहे, तो बेशुद्धीत आहे, मेंदूला मार लागला आहे असे कळले होते. इस्पितळातून सुटल्यावर मी त्याला भेटायला गेलो. अजूनही तो शुद्धीवर आलाच नव्हता; पण क्वचित हातपाय हलवू लागला होता. आता या जुन्या सहकाऱ्याची ही शेवटचीच भेट असे मनोमन म्हणून बाबूलालला नमस्कार करून मी निघालो. दिल्लीला परतलो. परत आंबेठाणला आलो तेव्हा कळले की, आता बाबूलाल पुष्कळसा ठीक झाला आहे. नीट बोलता येत नाही. स्मरणशक्ती घटली; पण निदान चालतो, बोलतो.

 पुन्हा त्याला घरी भेटायला गेलो. चारचौघांच्या नजरेत त्याच्यात काहीच दोष दिसला नसता. तो बोलण्याचा मोठ्या आकांताने प्रयत्न करी आणि एकेकाळचा हा शब्दांचा राजा, त्याला नेमका शब्दच आठवत नसे. शेवटी शब्द सापडला नाही तर कोणत्याही शब्दाऐवजी तो 'बॉल' म्हणे. जन्मात कधी बॉलने न खेळलेल्या बाबूलालच्या मनाच्या आतल्या कप्प्यात कोणती खिडकी खोलून हा बॉल घुसला होता कोण जाणे!

 आजारपणाच्या आधी विनोदी आणि कोटीबाज भाषणांच्या खळखळाटात सगळ्यांना डुबवणारा असा शब्दांनीच पाठीत सुरा खुपसून बेजार केलेला माझा एक मित्र मी पूर्वी पाहिला होता. अशा प्रसंगाशी ही दुसरी गाठभेट. पहिला मित्र विद्वान, जुना प्राध्यापक, महाराष्ट्राच्या अर्थकारणावरचा मान्यवर अधिकारी. वाचा साथ देत नाही तरी त्याच्या मनाचा तोल सुटलेला नव्हता. पक्षाघातामुळे ओठ साथ देत नाहीत, जीभ वळत नाही अशाही अवस्थेत तो मित्र मोठ्या संयतपणे निरर्थक आवाज काढे. ते पाहून मी हादरलो होतो. बाबूलालचे तसे नव्हते. जीभ चालायची तेव्हा तो सारा जीव ओतून बोले आणि बोलत राही. वाचा खचल्यावर पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे तो जीवाच्याआकांताने

बोलण्याचा प्रयत्न करी. हे असे दोनतीन वर्षे चालले.

 मग अलीकडे कळले, की बाबूलाल पुन्हा इस्पितळात आहे. त्याची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली आहेत. डायलिसीसवर आहे. पिंपरी-चिंचवडच्या इस्पितळातून त्याला घरी परत आणले. एव्हाना पुन्हा घरी पैशाची ओढग्रस्त चालू झालेली. डॉक्टरांनी सल्ला दिला, की 'इस्पितळात राहण्यात काही अर्थ नाही. खर्च मोठा होईल. घरी घेऊन जा. आठवड्यातून दोनदा इस्पितळात डायलिसीससाठी घेऊन या.'

 पुन्हा एकदा घरी भेटायला गेलो. आता बाबूलालला धड चालताही येत नव्हते. त्याची बायको सुषमा त्याला सांभाळत सांभाळत रस्त्यापर्यंत पायी, मग रिक्षाने बसपर्यंत, बसने चिंचवड आणि तेथून इस्पितळात पायी घेऊन जाई. डायलिसीस करून घेई आणि त्याच मार्गाने परत-ज्याच्या बऱ्या होण्याची फारशी आशा नाही अशा नवऱ्याला सांभाळत- घरी घेऊन जाई. मला आलेले पाहिल्यावर सुषमा कोसळलीच. आवरून धरलेले सारे आसू पाटाने वाहू लागले. मोठी धीरोदात्त बाई! आधुनिक युगातील सावित्रीच म्हणावी; पण कलियुगातील सावित्रीलादेखील पतीचे प्राण परत मिळत नाहीत.

 बाबूलालइतकेच सुषमाविषयीदेखील लिहिण्यासारखे आहे. बाबूलालच्या आणि माझ्या सहवासाच्या त्रोटक इतिहासात तिचा वारंवार उल्लेख येणार आहे. आता बाबूलालला भान नव्हते. तो चिडचिड करी. जो दिसे त्याच्यावर ओरडे, शिव्या घाली. सगळ्या रागाचा सगळ्यात मोठा बळी म्हणजे सुषमाच. ती वैतागून गेली होती. "साहेब, आता माझ्याच्याने नाही सोसवत. असे वाटते जीव द्यावा; पण दोन मुले आहेत. त्यांत एक मुलगी. म्हणून तोही धीर होत नाही."

 शेतकरी संघटनेच्या अनेक संबंधितांनी प्रयत्न केले. अगदी आरोग्यमंत्र्यांपर्यंत जाऊन डायलिसीसच्या खर्चात सूट मिळवली. अपुऱ्या राहिलेल्या मंगल कार्यालयाच्या बांधकामाकरिता घेतलेल्या कर्जाचे भाकड ओझे झाले होते. त्याची थोडीफार सोय कोणी मिळवून दिली. पण, ज्याचे त्याचे दु:ख ज्याने त्यानेच झेलायचे असते.

 काही दिवसांपूर्वी कळले, की आता डायलिसीसमध्येही काही अर्थ नसल्याने तो उपचारही बंद पडला आहे. बाबूलालला घरी ठेवले आहे, पण उपचार सगळे संपलेच आहेत.

 शेवटच्या अंकाला सुरवात झाली. बाबूलालचे खाणेपिणेच बंद झाले. काहीही पोटात गेले, की पोट ढळे किंवा उलटी होई. निव्वळ निपचित पडून होता तरी त्याला भेटायला गेलो तेव्हा त्याने मला ओळखले. "साहेबांना ओळखले का?" असे विचारल्याबद्दल

बायकोवर खेकसला. गेल्या पाचसहा वर्षात तिसऱ्यांदा 'ही गाठभेट अखेरचीच' अशी मनाशी खूणगाठ बांधत मी निरोप घेतला. वर्धा मुक्कामी २३ मे २००४ रोजी म्हात्रे सरांचा फोन आला - 'आज पहाटे चार वाजता बाबूलाल गेला.'

 आयुष्यात काही माणसांची जवळीक अशी साधली जाते, की तिची सुरवात कोठून झाली हे लक्षातच राहत नाही. अगदी पहिल्यापासून ही ओळख आहेच अशी भावना राहते. नंतर कालमानाप्रमाणे भेटीगाठी विरळ होत चालल्या तरी जवळिकीची भावना अबाधितच राहते.

 बाबूलालची आणि माझी ओळख पहिल्यापासूनची नाही हे उघडच आहे. मी आंबेठाणला येऊन शेतकरी बनलो, चाकणला जाऊयेऊ लागलो. त्याच्या आधीचा काही परिचय असण्याची शक्यता नाही. १९७७ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना चाकणचे मामा शिंदे आमदारकीसाठी उभे होते. मामा शिंदे ही चाकणमधील एक संस्थाच आहे. 'चाकणचे सानेगुरुजी' म्हटले तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची पर्याप्त कल्पना येऊन जाते. त्यांनी खरे म्हणजे निवडणुकीच्या फंदात पडायलाच नको होते; पण निवडणुकीच्या या भोवऱ्यात नि:शंकपणे पाण्यात पाहेणारे किती जीव खेचले जातात! त्यांतलेच एक मामा. तसा त्या वेळी मामांचा आणि माझा परिचय चुटपुटताच होता. मी जुना सेवादलाचा आणि मामाही सेवादलाचे. एवढाच काय तो बादरायणी संबंध. पण, मामांनी फॉर्म भरला आणि पहिल्याच दिवसापासून मी त्यांना सांगितले, "माझी जीप, तिचे डिझेल आणि मी ड्रायव्हर तुमच्या कामासाठी हजर आहोत.' प्रचाराचा सगळा काळ पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत मी मामांबरोबर फिरलो. पुष्कळ अनुभव गाठीस जमला.

 हा काळ असा, की माझे नावही कुणाला माहीत नव्हते. निवडणुकीच्या सभांमध्ये चाकणच्या गोपाळ जगनाडेंच्या १२-१४ वर्षांच्या मुलाचेही भाषण होई; पण मी सहसा स्टेजवरही नसे. या निवडणुकीच्या मोहिमेतच बाबूलाल परदेशी, शंकरराव वाघ, गोपाळ जगनाडे हे सारे मावळे भेटले. दिवसभर गाडीच्या स्टिअरिंगवर मी आणि मागेपुढे बसलेले हे मावळे. त्यांच्याकडून साऱ्या परिसरातील नेत्यांच्या कथाकहाण्या ऐकायला मिळत. शेतीतले काटे तोपर्यंत मला खुपू लागले होते; पण दु:खांची पुरी समज काही आली नव्हती. जेवढी आली होती तेवढे मी बोले; शास्त्र कमी, अभिनिवेश जास्त असेच असणार.

 पण, नुकताच परिसरात आलेला शरद जोशी या मावळ्यांना खूप भावला. माझे शेतीविषयीचे बोलणे हे त्याचे कारण नसावे. मी त्या वेळी नुकताच परदेशातून आलेलो. स्वित्झर्लंडची 'शायनिंग' अजून शिल्लक होती. माझ्या गतवैभवाच्या पुष्कळ कंड्या चाकणच्या परिसरात षट्कर्णी झाल्या होत्या. त्या काळाचे बाबूलाल पुढे वर्णन करी, "साहेब म्हणजे काय थाट होता! सिगरेट घ्यायलासुद्धा गाडीतून उतरायचे नाहीत. खिशातून हात काढून पैसे द्यायचे आणि पाकिट घ्यायचे." सुरवातीला तरी हा 'फॉरेन रिटर्ड'चा दबदबा असावा. निवडणुकीच्या काळात चांगली ओळख झाली. मामा निवडून येणार अशी आमची खात्री होतीच. ते निवडून आले, की इतर आमदारासारखे होऊ द्यायचे नाही. सगळ्या खेड तालुक्याची परिपूर्ण विकासाची योजना तयार करून त्याच्या अंमजबजावणींची जबाबदारी आम्ही तिघांनी घ्यायची. त्यात चाकणचे अप्पा देशमुखही सामील झाले.

 माझ्या शेतीवर त्या वेळी विहिरीचे काम चालू होते. आंबेठाणला त्या वेळी वीज नव्हती. त्यामुळे डिझेल इंजिन व पंप वापरावे लागत. अप्पांचे चाकणला इंजिन दुरुस्तीचे छोटेसे वर्कशॉप होते. सायकलचे पंक्चर काढण्याच्या दुकानापासून सुरवात केलेले चाकणमधील एक अप्पा देशमुख आणि बाबूभाई शहा. तोपर्यंत बाबूभाई गडगंज श्रीमंत झाले होते. पुढारी झाले होते. अप्पांची प्रगती सुखवस्तू पण अंगमेहनत करणाऱ्या दुकानदारापर्यंतच झाली होती. अप्पांनाही वाचा सरस्वतीचे वरदान होते. खरे म्हटले तर पाचजणांत समानता काही नव्हती. मी उच्चविद्याविभूषित, परदेशात जाऊन आलेला, सुखवस्तू. बाकीच्यांतला बाबूलाल बी.ए. पास, एलएल.बी.ची एखादी टर्म भरलेला, बाकीचे शाळेचा डाग लागलेले. गोपाळ तुकारामांचा लेखकू जगनाडे यांचा वंशज.शंकरराव भाजीची विक्री, अडत, ट्रक क्लिनर, ट्रक ड्रायव्हर अशा अनेक व्यवसायांतून निघालेले. मामांमुळे समाजवादी चळवळीतही आलेले.

 बाबूलालचा चाकणमध्ये छापखाना होता. आमची बैठक त्या छापखान्यात किंवा अप्पा देशमुखच्या दुकानात. साधा ट्रेडलचा छापखाना, छपाईचे काम यायचे ते हँडबिलांचे किंवा लग्नपत्रिकांचे. बाबूलालचा कारभार तसा गबाळग्रंथी आणि अस्ताव्यस्त. छपाईच्या कामात मजकुराची दुरुस्ती गिऱ्हाईक कधी करून देत नसे. खिळे जुळाऱ्याचे शुद्धलेखन मग मुद्राराक्षसाचे थैमान घाली. आम्ही छापखान्यात गप्पा छाटत बसलो असताना अनेकवेळा गिऱ्हाईक यायचे, छपाईच्या किंवा ठरलेल्या वेळी पत्रिका छापून तयार न झाल्याबद्दल तक्रारी घेऊन. बाबूलालचे उत्तर ठरलेले, "झाल्या दोनचार चुका म्हणून काय बिघडले? लग्न कुणाचे आहे, कुठे आहे, वधूवरांचे नाव ठीक आहे ना?" उशिराने त्रस्त झालेल्या गिऱ्हाइकाला बाबूलालचे उत्तर, 'पुष्कळ छापखान्यात तर पत्रिका मुलाच्या बारशाच्या वेळीच आईबापांच्या हाती पडतात.' गिऱ्हाईक फारच तंडायला लागले तर

बाबूलालच त्यांच्यावर ओरडणार, दिसत नाही का साहेब बसले आहेत?' बिचारे गिऱ्हाईक माझ्या धाकाने निघून जायचे. पण, शेवटी व्हायचे तेच झाले. छापखाना बुडायला आला.

 बाबूलालचे त्या वेळी थोड्या वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या लग्नाची आख्यायिका तो सांगे, 'माझी शेती आहे, छापखाना आहे, मी ग्रॅज्युएट आहे; पण कोणी मुलगी देईना. मग मी देहूच्या एका शाळेत शिक्षकाची तात्पुरती नोकरी मिळवली. मुलगा नोकरदार आहे म्हटल्यावर मुलींच्या बापांच्या ह्या रांगा लागल्या. शेवटी, पार दूरच्या नागपूरच्या सुखवस्तु कुटुंबातल्या सुषमाचा बाप आला. लग्न ठरले. इष्ट हेतू साध्य झाल्याबरोबर मी नोकरी सोडून दिली.'

 बाबूलालचे पूर्ण नाव मोहनलाल बिहारीलाल परदेशी. चाकणात परदेशींचा गोतावळा मोठा आहे. देहूआळंदी क्षेत्रांशी येऊनजाऊन संबंध दाट. बाबूलाल लहान वयातच कीर्तन करू लागला; अगदी धोतरकुडता, उपरणेपागोटे घालून. कीर्तनकारीच्या या कालखंडातच बाबूलालने पुराण -भागवतातील अनेक कथा- अख्यायिका आणि चुटके यांचे संपन्न भांडार जमा केले. तुकारामाचे पाठांतर कोणाताही संदर्भ विनासायास देण्याइतके चांगले होते. तुकारामात xxx घालून वाचावेत असे अभंग अनेक. ते बाबूलालला अगदी मुखोद्गत. बहुतेक कीर्तनकारांच्या शैलीतच एक चावटपणा असतो. समोरच्या श्रोतृवृंदात कोणी लक्षणीय दिसल्यास, मग त्याची सरस्वती अधिकच पाल्हाळू लागते. हा कीर्तनकारांचा परंपरागत गुण बाबूलालने आपल्या बी.ए. पर्यंतच्या शिक्षणाचा आणि संस्कारांचा मसाला घालून चांगलाच अंगी बाणवला होता. कीर्तन पुराणभागवतातील कथांचे आणि पाचकळपणा आधुनिक पुणेरी कॉलेजातील टवाळखोरीचा असे हे मोठे स्फोटक मिश्रण होते.

 आंबेठाणच्या शेतीच्या अनुभवाने जसजसा पोळत गेलो तसतसे माझे विचार अधिक स्पष्ट होऊ लागले. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधल्या वाचनाचा पुरेपूर उपयोग करून माझ्या अनुभवाला प्रस्थापित अर्थशास्त्राची जोड मिळाली होती. १९७८-७९ मध्ये मोहन धारियांनी कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली; भाव पडले. इतरांबरोबर आम्हीही कलेक्टर साहेबांच्या कार्यालयात तक्रार घेऊन गेलो. कार्यालयातल्या साऱ्या खुर्च्या चाकणच्या भारदस्त पुढाऱ्यांनी आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अडवलेल्या. सगळ्यांची बोलणी झाल्यावर मला शंकररावांनी आग्रह करून बोलायला लावले. 'माल शेतकऱ्याच्या हाती असताना निर्यातबंदी, माल व्यापाऱ्याकडे गेला म्हणजे निर्यात खुली' या मुद्द्यावर मी बऱ्याच धारेचे बोललो. 'दुष्काळाच्या काळात सक्तीने लेव्ही घेणारे

सरकार आता शेतकऱ्यांच्या मदतीस का येत नाही?' हा संघटनेतील पायाचा विचार त्या वेळी मी पहिल्यांदा मांडला. ४० पैसे किलोने खरेदी करण्याचे ठरले. आंदोलन वगैरे करावे लागलेच नाही.

 मग, आमचा ठिय्या चाकण बाजारात. लिलाव योग्य होतात किंवा नाही, ४० पैशाच्या खाली भाव जात नाहीत हे पाहण्याकरिता कांद्याच्या पुरुषपुरुष उंचीच्या ढिगांना तुडवत आम्ही फिरायचो. एखादे वेळी भाव घसरला तर शेतकरी आम्हांला शोधत येऊ लागले. हळूहळू शेतकऱ्यांच्या दु:खांना वाचा फोडणारी एक संघटना हवी, शेतीमालाला रास्त भाव मिळवून देणे हे तिचे प्रमुख काम असले पाहिजे हेही ठरले.

 त्याचवेळी शेतीप्रश्नाचे माप काढण्यासाठी मी 'भूमिपुत्र' म्हणून भूमिहीन शेतकऱ्यांना एकत्र करून आणीबाणीच्या काळात त्यांना मिळालेल्या जमिनीवर किफायतशीर शेती करण्याच्या अंगारमळ्यातील प्रयोगाला समांतर प्रयोग करीत होतो. चाकण-आंबेठाण रस्ता पुढे वांद्ऱ्या पर्यंत जातो; पण रस्ता असा, की पहिला पाऊस झाला की आठ महिने यातायात बंद. भामनेरचा रस्ता पक्का व्हावा याकरिता ४०-४२ कि.मी.च्या सडकेवरील गावागावांत जाऊन मी एक मोर्चा काढण्यासाठी माणसे जमवीत होतो.

 मामा शिंदे कुचेष्टेने म्हणायचे, 'आम्ही पुढारी सारखे चाकणहून मुंबईला जात असतो. शरद जोशी कायम आंबेठाण ते वांद्रे जात असतात.' या सगळ्या प्रवासात बाबूलाल, शंकरराव आणि अप्पा हमखास सोबतीला असायचे.

 शेतकऱ्यांची संघटना कशी असावी. संघटना उभारण्यातल्या अडचणी कोणत्या. मार्ग कोणते याबद्दल चर्चा व्हायची. ती 'वारकरी'च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकात आली आहे. मुळात प्रश्न 'वारकरी' सुरू कसा झाला?

 शेतकरी संघटनेची बांधणी कशी करावी, याचा बारकाईने तपशीलवार आराखडा तयार झाला होता. बाजारपेठेचे गाव शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. बहुतेक शेतकरी आठवड्यातून एकदा तरी बाजाराच्या गावी येतात. बाजाराच्या दिवशी त्यांना एकत्र येण्यासाठी संघटनेचे कार्यालय तयार केले व त्या कार्यालयात प्रत्येक दिवशी काही वेळ आणि बाजाराच्या दिवशी सर्ववेळ संघटनेचा कुणी संपर्क कार्यकर्ता हजर ठेवावा अशी कल्पना होती. चाकणला त्याप्रमाणे त्या वेळी न परवडणाऱ्या भाड्याने एक खोली घेउन तेथे कार्यालयाची पाटी लावली. बाजाराच्या दिवशी आम्ही सारे मावळे सकाळपासून हपापल्या नजरेने कोणी शेतकरी येतील अशा आशेने बसून राहू लागलो. बाजारातील विक्री आणि घरसामानाची खरेदी झाल्यानंतर डोकावून जाण्याकरिता

एकटेदुकटे शेतकरी येत. त्या प्रत्येकाकरिता सर्व प्रशिक्षण करणे शक्य नव्हते. मंडळी एकत्र कोणत्याही वेळी जमा होईनात. मग, पर्वताने महंमदाकडे येण्याची आशा सोडून महंमदाने पर्वताकडे जाण्याचे घाटू लागले.

 भामनेरच्या वाटेवरच्या गावांकडे मी जातच होतो. पुष्कळवेळा बाबूलाल, शंकरराव माझ्याबरोबर असत. गावात जाऊन आम्ही उभे ठाकायचे. गावातला एखादा पाहुणा माझ्या सोबत्यांच्या परिचयाचा असायचा. त्याचा आधार घेऊन आम्ही कोठे पारावर, देवळात, शाळेत किंवा पंचायतीत ठाण मांडायचो. गावकऱ्यांना बोलावण्याकरिता आवतणे द्यायचो. गावचा वतनदार निरोप घेऊन गावात गेला म्हणजे तास दोन तास तरी कोणी न जमण्याची निश्चिंती. ज्या गावात पंचायतीने किंवा तरुण मंडळाने लाऊडस्पीकर बसवलेला असेल त्या गावात घोषणा व्हायची, 'आपल्या गावी सुप्रसिद्ध शेतकरी नेते शरद जोशी आले आहेत. गावकऱ्यांनी या संधीचा अवश्य फायदा घ्यावा. तातडीने अमुकअमुक ठिकाणी जमावे.' सभा संपल्यानंतर गाडीत बसल्यावर बाबुलाल या घोषणांचे व्यंग काढायचा, "गावातील समस्त शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या गावात जागतिक कीर्तीचे शेतकरी नेते आलेले आहेत. त्यांना पाहण्याची, ऐकण्याची संधी गमावू नका. संधी चुकवाल तर पस्तवाल, काही करत असला तर हात न धुता तातडीने हजर रहा." बाबूलालच्या या व्यंगाने आणि आविर्भावाने हसून मुरकुंडी वळे. अशा तऱ्हेने सगळा जन्म गेला तरी हजारभर शेतकऱ्यांपुढे संघटनेची मांडणी होणार नाही हे उघड होते. मग, करावे काय? संघटनेचे एक साप्ताहिक असावे अशी एक कल्पना निघाली. नियतकालिक काढायचे म्हणजे काय याचे मला ज्ञान नाही. पंजीकरण कुठे करायचे, नाव राखून कसे ठेवायचे, टपाल खात्याकडून परवाना कसा मिळवायचा सारेच कसे अगम्य !

 तेवढ्यात बाबूलालने सांगितले, "चिंता नको. कीर्तनकार म्हणून भक्तिमार्गाचे एक साप्ताहिक काढण्याचा माझा बरेच दिवस विचार होता. त्याकरिता मी 'वारकरी' नावाची नोंदणी केली आहे. या नावाखाली आपण साप्ताहिक एकदोन आठवड्यात सुरू करू शकतो." शेतकरी संघटनेचे मुखपत्र आणि नाव 'वारकरी' काही मेळ जमेना; पण दुसरे नाव मिळवायचे म्हणजे पाचसहा महिन्यांचा खटाटोप आणि खोळंबा! १९८० सालच्या कांद्याच्या हंगामात म्हणजे फेब्रुवारी १९८० मध्ये कांद्याचा प्रश्न पुन्हा उग्ररूप धारण करणार असे उघड उघड दिसत होते. २६ जानेवारी १९८० ला भामनेर सडकेसाठी मोर्चा काढायचाही कार्यक्रम ठरला होता. साप्ताहिक तर नोव्हेंबर महिन्यात चालू होणे

आवश्यक होते. मग, आम्ही 'वारकरी' या नावानेच सुरवात करायचे ठरवले. नाव मिळाले. बाबूलालचा छापखाना तयारच होता. कोणाच्या तरी ओळखीने पुण्याच्याच एका दैनिकाकडे असणारा जादा न्यूजप्रिंट आम्ही मिळवला. मोठी बाजी मारली असे वाटले.

 पहिल्याच अंकात (३ नोव्हेंबर १९७९) वारकरीच्या पहिल्या पानावर उजव्या बाजूस संत ज्ञानेश्वर व उजव्या बाजूस तुकोबांचे चित्र छापले. कारण, त्यांचे ब्लॉक छापखान्यात तयार होते. 'ॐ नमोजी आद्या' या ज्ञानेश्वरीतील पहिल्या ओवीच्या पूर्वार्धाने मी संपादकीय लिहिले. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संस्थापनेच्या काळी आणि त्याआधी महाराष्ट्राची परिस्थिती आणि वर्तमान परिस्थितीची समांतरता दाखवून दिली. बाबूलाल मोठा खूष झाला.

 त्यानंतर दर आठ दिवसांनी 'वारकरी'चा एक अंक काढणे म्हणजे मोठे दिव्य होऊन बसले. महाराष्ट्रातील माझ्या दौऱ्यांना त्या वेळी सुरवात झाली होती. ते सांभाळून गुरुवार किंवा शुक्रवारी चाकणला पोहोचायचे.

 चाकणच्या बाजारात ११-१२ वाजेपर्यंत तरी अंकाच्या प्रती पोहोचाव्यात म्हणून लेख घेऊन मी बाबूलालच्या घरी अंधारात पोहोचे. सगळीकडे सामसूम. पाच पन्नास हाका मारल्यानंतर बाबूलालची बायको उठायची, मला ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात नवऱ्याला हलवून जागे करीत म्हणायची, 'अहो, तुमचे सासरे आलेत, उठा लवकर.' काही वेळाने बाबूलाल खाली उतरायचा. जवळच्या छापखान्यात जायचो. खिळे जुळवायला कुणी असेल तर बरे, नाही तर कोणाला तरी आणून वेठीला धरायचे. माझा लेख जुळवून होईपर्यंत बाबुलाल आणि मी अंक भरण्यासाठी मजकूर तयार करण्याच्या खटाटोपाला लागायचो. माझे लेख आताच्या प्रमाणात थोडे कमी लांबीचे असत. बाबूलाल चतुरस्र सामग्री तयार करणारा. कधी विनोद, कधी-चुटके, कधी वात्रटिका, किस्से, पण या सगळ्या चुरचुरीत मामल्यात त्याने लिहिलेला जनावरांच्या बाजारातील अडत्यांच्या भाषेसंबंधीचा लेख सर्वत्र गाजून गेला. (जोड असर - शेतकरी संघटक : ग्रामीण अनुभूति विशेषांक : २६ जुलै १९८५) खरे म्हटले तर या लेखाला मराठी भाषेतील काही पुरस्कार मिळायला पाहिजे होता.

 १९८० चा फेब्रुवारी महिना आला. चाकणच्या आंदोलनास तोंड फुटले. कांद्याचा बाजार १३ पैशांपर्यंत पडलेला; पण शेतकऱ्यांमध्ये काही धाडसाची ठिणगी पडेना. आज शेतकरी संघटना दांडगी शक्ती आहे, तरी जागोजागी शेतकरी कच खातात. त्या वेळी तर शेतकरी संघटित होणे म्हणजे कुत्र्याचे शेपूट सरळ होण्याइतके कठीण अशी

भावना होती. आमच्याकडे सर्वसाधारण शेतकरी दुर्लक्ष करी आणि पुढारी तुच्छतेने बघत.

 शेतकरी संघटनेची ताकद ती काय, मूठभर. कांद्याला भाव मिळवायचा, त्याबद्दलचा हुकूम निघतो तो दिल्लीहून. मग बाजारात उभे राहून शेतकऱ्यांनी कांदा विकणे बंद करावे आणि बाजारपेठेला लगत असलेला पुणे-नाशिक हमरस्ता बंद करावा अशी घोषणा आम्ही करायचो आणि मोठ्या थाटाने मी पुढे होऊन कूच करायचो. बाजारातून निघताना माझ्यामागे बऱ्यापैकी लोंढा असायचा. रस्त्यावर पोचेपर्यंत तो पातळ होत जायचा. पुष्कळदा, उन्हात तापणाऱ्या डांबरी रस्त्यावर बसायला पाचपन्नास शेतकरीच असायचे. सगळ्यांनी मध्यभागी बसावे तर बाजूच्या कच्च्या सडकेवरून वाहने निघून जायची. सगळ्या रस्त्याची रुंदी अडवावी इतकी माणसे आमच्याकडे नसायची. असतील तितक्या माणसांना बसवून आम्ही भाषणे सुरू करायचो. पहिला वक्ता हरहमेशा मोहन बिहारीलाल परदेशी. कधी लाऊड स्पीकर असायचा; बहुधा नाहीच. कधी बॅटरीवर चाललेला कर्णा. त्याची फिकीर बाबूलालला फारशी नसे. बोलायला सुरवात करून पाचदहा मिनिटांत तो लोकांचे कान आणि मने ओढून घेत असे. कथा, संतांची वचने, भरपूर पाचकळ विनोद आणि पुढाऱ्यांवर सडकून ओढायचे आसूड अशा सामग्रीवर बाबूलाल वाटेल तितका वेळ बोलू शकत असे. शेवटपर्यंत लोकांचे आकर्षण कायम टिकवून २००-५०० चा जमाव जमला, की मी बाबूलालला मागून खूण करायचो, 'आता तुझे भाषण थांबव, आता मी बोलतो.' बाबूलाल कसला खट्याळ! तो लोकांपुढेच कैफियत मांडायचा, "बघा, मी गेले तासभर उन्हातान्हात बोलतो आहे, आता माणसं जमली तर साहेब म्हणतात बसा. तुम्हीच सांगा, मी थांबवू का?" यावर लोक हलकल्लोळाने, 'तुमचेच भाषण चालू द्या' असे एकमुखाने सांगायचे. तशातही मी उठायचो आणि बाबूलालच्या साऱ्या खमंग चुरचुरीत भाषणानंतर 'शेतीमालाचा भाव', 'शेतकऱ्याचे मरण, सरकारचे धोरण' असला अर्थशास्त्रीय विषय मांडायला लागायचो. चमत्कार हा, की लोकांनी माझे बोलणे ऐकून घेतले.

 बाबूलालच्या खट्याळपणाबद्दल एकदा अद्दल घडली. चाकणजवळच्या गावाच्या एका काँग्रेस पुढाऱ्याने शेतकरी संघटनेचे नेते म्हणून आम्हाला सत्कार समारंभाला बोलावले, गावाच्या जत्रेच्या दिवशी. जत्रेत तमाशाचा फड रंगला होता. गणगौळण झाल्यानंतर चहापानाच्या सुटीत आमच्या सत्काराचा कार्यक्रम करण्याची योजना होती. गौळणच खूप रंगली. मग सत्काराच्या कार्यक्रमाची घोषणा झाली. पहिला वक्ता बाबूलाल.

त्या दिवशी भाषण झाल्यानंतर त्याने कबूल केले व तो म्हणाला, "दर वेळी तुम्हाला मी कोणत्या संकटात टाकतो ते मला आज कळले."

 बाबूलालचा छापखाना जुन्या पद्धतीचा. त्यात कधी मोडतोड व्हायची, कधी जुळारी नसायचा तर कधी वीजच जायची. अशाप्रसंगी तयार झालेला मजकूर घेऊन मी पुण्यात जायचो, पुण्याच्या जुन्या भागात एका छापखान्यात ते घेऊन जायचो, दादापुता करून रात्रीत खिळ्यांची जुळणी करून द्यायला सांगायचो. तिथेच बसून राहायचो आणि जुळणी होईल तसे मुद्रिते तपासून द्यायचो.

 'वारकरी'च्या प्रकाशनाचा कार्यक्रम ठरला त्याच वेळी छातीला बिल्ले लावण्याचीही कल्पना निघाली. लाल रंग असावा, पांढरी अक्षरे असावीत हेही ठरले; पण कागदी बिल्ले करणे हे कुणाला पटेना. बाबूलालचाच कोणी शहा म्हणून मित्र पुण्यात होता. त्याच्याकडे जाऊन त्याला आम्ही गळ घातली. त्याने २४ तासांत प्लॅस्टिकचे बिल्ले तयार करून द्यायचे अंगावर घेतले. या पहिल्या बिल्ल्याचा नमुना आजही काही जणांकडे असेल ! नंतर, परभणी अधिवेशनापासून बिल्ले पत्र्याचे निघाले. एवढेच नव्हे तर, हा बिल्ला संघटनेच्या झेंड्यावरही अवतरला. आज शेतकरी संघटनेचा हा बिल्ला कुठेही दिसला तर लोकांना खूण पटते. त्या प्रतीकाचे श्रेय बाबूलालकडे जाते.

 आंदोलन सुरू झाले. कांद्याची बाजारपेठ बंद पडली. त्याच वेळी भामनेर सडकेचे आंदोलनही पेटू लागले. भामनेरचे बार्डोली बनले. करबंदीची चळवळ सुरू झाली. एस.आर.पी.च्या गाड्या भरभरून भामनेर रस्त्याला जाऊ लागल्या. रस्ता कसला खाचखळग्यांनी, दगडगोट्यांनी भरलेला व जवळजवळ सर्व अंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूस टेकड्यांचे उंचवटे. गावकऱ्यांनी गोफणीच्या हत्याराने एस.आर.पी.ना अडवण्याची तयारी चालवली. तेवढ्यात निवडणूक आली आणि साऱ्या भामनेरच्या २४ गावांनी मतदान केंद्रे उघडूच द्यायची नाहीत आणि मतदानही करायचे नाही असे जाहीर केले. मग, सरकारनेही पावले उचलायला सुरवात केली. आम्हा दहा जणांना चाकण बाजारात पकडले. खेडच्या कोर्टात नेऊन उभे केले. कोर्टाने दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. आम्हाला सगळ्यांना पोलिसांनी निळ्या गाडीत बसवले. त्यांत बाबुलालही आला. गाडी पुण्याकडे निघाली. आमची चर्चा सुरू झाली. 'येरवड्याला नेतात वाटतं?' गाडी येरवडा ओलांडून नगर रस्त्याला लागली. 'नगरच्या तुरुंगात नेतात असे दिसते.' पहाऱ्यावरच्या पोलिसाला बाबूलालने विचारले, 'गाडीत पेट्रोल भरपूर आहे ना? नाही तर मध्येच कुठेतरी थांबवाल.' बाबूलालने विचारायचा अवकाश, गाडी गचकन् थांबली. 'पेट्रोल नसावे.'

ड्रायव्हरचा अंदाज. 'असे कसे होईल ! बघा बघू.' एका पोलिसाने पेट्रोल टाकीचे झाकण उघडून अंधरात आत बघायचा प्रयत्न केला, भोवती आमचे कोंडाळे, "अहो, हवालदारसाहेब, असं कसं दिसेल? टॉर्च नाही का? मग ही काडीपेटी घ्या, काडी शिलगवा आणि टाकीच्या तोंडाशी धरून बघा." आम्ही हसून हसून बेजार. नगरहून गाडी पुढे औरंगाबादकडे गेली. हर्सूल तुरुंगाच्या प्रांगणात जाऊन थांबली. तोपर्यंत सकाळ झाली होती. तुरुंग अधिकारी आम्हाला घ्यायला तयार नाही. वरून सूचना नाही म्हणे. मग आम्ही तेथील पारावर मुक्काम ठोकला. कैद्यांना भेटायला आलेली त्यांची नातलग मंडळी भोवताली होती. आम्ही पँट मनिलावाले दिसलो. त्यांना वाटे आमचा काही उपयोग होईल. नातलग कैद्याला कसे सोडवावे याची विचारणा ते करत. बाबूलाल आणि शंकरराव अगदी गंभीर चेहऱ्याने त्यांना सांगू लागले, ते नाही जमत बाबा, ते लई खर्चाचे काम. दोनपाच हजार रुपये तर वरच्या अधिकाऱ्यांनाच द्यावे लागतील. आमच्या सारख्या मधल्याचे आणखी दोनपाच हजार.'एका पाहुण्याने खरंच हजारभर रुपये बाबूलालच्या हातावर ठेवले आणि म्हणाला, 'गरिबाचे काम एवढ्यात भागवा.' आमची हसून हसून मुरकुंडी. तेथून जी हसायला सुरवात झाली ते कोठडीचे दहा दिवस आम्ही हसतच होतो.

 हर्सूल येथील तुरुंगाचे खाणे अगदीच भिकार. आम्ही कांदा मागवून घेतला. अधिकाऱ्याने सांगितले कांदा विकत घ्यावा लागेल. "काय भाव?" "एक रुपया किलो." यावर बाबूलालची तंबी, “काय साहेब, ६० पैसे भाव मिळावा म्हणून आम्ही तुरुंगात आलो आणि तुम्ही आमच्याकडून रुपया भाव घेता? हे फार गंभीर प्रकरण आहे. आम्हाला तक्रार करावी लागेल.' बिचारा तुरुंग अधिकारी! त्याने मान्य केले, "तुम्ही असेपर्यंत तुम्हाला कांदा फुकट."

 बाबूलाल आपल्या घरच्या कहाण्या सांगायचा. आईची नक्कल करायचा. आई म्हणते, "एवढा नऊ महिने मी तुला पोटात वाढविला आणि लग्नानंतर ८ दिवसांत तू बायकोच्या तालावर नाचू लागलास?"आता आईला सोडून नवे नवरे बायकोचे का ऐकू लागतात काय सांगावे? बाबूलाल कथा सांगत होता, "मी उत्तर दिले, तू मला पोटात वाढवलेस खरे, पण त्यावेळी माझे वजन ते काय? अगदी शेवटीसुद्धा सातआठ पौंड. उलट, सुषमाचे बघ." या अफाट विनोदावर आम्ही सर्व सत्याग्रही कैदी अक्षरश: गडबडा लोळू लागलो.

 असा हा बाबूलाल २३ मे २००४ रोजी आम्हांला सोडून गेला.

 शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात संघटनेचे नाव माहीत नाही, कोणी नेता नाही, साधने नाहीत अशा परिस्थितीत शिवाजीच्या या मावळखोऱ्याच्या परिसरात ही
अद्भुत माणसे भेटावी त्यातले शंकरराव पूर्वीच गेले. आता बाबूलालही गेला. आजही बाबूलाल शेतकरी संघटकचा कागदोपत्री मालक आहे. फक्त सा. वारकरीचा वेलू गगनावरी गेला आहे. संघटनेचे 'बीज एकले' रोवण्यास ज्यांची मदत झाली, त्यांची रोप वाढल्यानंतर आणि संघटनेचा वृक्ष झाल्यानंतर भरल्या अंत:करणाने आठवण करून, त्यांना श्रद्धांजली देणे एवढेच आजच्या पाइकांच्या हाती राहते.


 

(शेतकरी संघटक, ६ जून २००४)

■ ■