अनसूयेची आरती
जयजय आदिमाये, अनुसूये ! दत्तात्रय जननीये,
ओवाळूं आरती, पंचार्ती मृगराजाचल निलये ॥जय० ॥धृ॥
श्रीशुभसौभाग्य, सुवासिणी । मंडित कंकणपाणी ।
प्रसन्न वरद सदा, द्विजवाणी । लावण्याची खाणी ।
सद्गुण सत्वाची, शिराणी । अत्रिऋषीची राणी ।
तुजपुढें पतिव्रतेची कहाणी । न वदे व्यास पुराणीं ।
न करी प्रसादाची वाणी । धांव पाव निरवाणीं ।
जयजय देवहुतीचे तनये । तुजविण जगीं चेत नये ॥जय० १॥
शुभगुण शुभांगे शुभगात्रे । पावन परमपवित्रे ।
कुंकुम मळवट तांबुल वक्त्रें । कज्जल कुरंग नेत्रे ।
बाळ्या बुगडया मंगळसूत्रें । मुद राखडी फुलपत्रें ।
भौक्तिक रत्नमणी नक्षत्रें । हार कनकांबर छत्रें
अनंत खेळविसी स्वतंत्रे । ब्रह्मांडाचीं चित्रें ।
करुणा करि करुणाघनहृदये । श्रुत हृदयांबरिं उदये ॥जय० २॥
सिंहासन सिंहाद्रीवरती । शोभे सुंदरमूर्ती ।
श्रीहरिहर ब्रह्मादिक स्तविती । नारद तुंबर गाती ।
सन्मुनी नर नारी जन करिती । त्रिकाळ मंगळ आरती ।
चौघडे वाजंत्री वाजती । वेदध्वनी गर्जती ।
उदयाचळिं तुझिया अभ्युदये । प्रभु दिनकर उदया ये ॥जय० ३॥
पुरविसी अतीतांची अपेक्षा । किमपि न करिसी उपेक्षा ।
म्हणउनि पात्र करी अपेक्षा । श्रीशिवजीव परीक्षा ।
दुर्जय षड्रिपुसी करि शिक्षा । च्छेदुनि भव-भय-वृक्षा ।
प्रेमानंदाची दे भिक्षा । यतिची न पाहे परीक्षा ।
देशील पदकमळीं जरि साक्षा । तरि मग मागुं न मोक्षा ।
विष्णुस्वामी म्हणे, चातुर्ये । आत्मसाक्षिणी तुर्ये ॥जय० ४॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |