अन्वयार्थ – २/अनिवासींना गगन ठेंगणे




अनिवासींना गगन ठेंगणे


 मेरिकेतील अनिवासी भारतीय मनोज शामलन यांच्या कथेवर आधारित आणि त्यानेच दिग्दर्शित केलेला चित्रपट The Sixth Sense हा ऑस्कर पारितोषकांच्या यादीत आहे. या चित्रपटाने अनेक उच्चांक पार केले आहेत. पटकथेसाठी डिस्ने कंपनीने शामलन याला २५ लाख डॉलर्स (रुपये १० कोटींच्या वर) दिले. एवढेच नव्हे तर त्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही त्याच्यावर सोपविली. प्रकाशित होताच चित्रपटाने एक हजार कोटी रुपयांचा गल्ला कमविला. मनोज शामलन, वय वर्षे २९, भारतातून अमेरिकेत जाऊन राहिलेल्या डॉक्टर जोडप्याचा मुलगा; शाळाकॉलेजांत सतत पहिल्या क्रमांकावर राहिलेला. त्याने यशस्वी डॉक्टर व्हावे असे त्याच्या आईवडिलांचे स्वप्न. पारंपरिक शिक्षणक्रम सोडून त्याने एकदम सिनेमा या विषयावरील अभ्यासक्रमच निवडला तेव्हा आईवडील दुःखी झाले, चिंताग्रस्त झाले आणि आज, आपण स्वप्न तर पहात नाही ना असा त्यांना प्रश्न पडत आहे. अमेरिकेतील प्रत्येक अनिवासी भारतीय मनोजच्या चित्रपटास ऑस्कर पारितोषिक मिळावे यासाठी मनोमन प्रार्थना करीत आहे.
 अमेरिकेतील प्रत्येक भारतीयाच्या मनात आपल्या बुद्धीने, कर्तृत्वाने वा प्रतिभेने सर्व अमेरिका जिंकावी असे एक स्वप्न उराशी बाळगून जतन केलेले असते. त्या स्वप्नाचे मनोज शामलन एक प्रतीक बनला आहे.
 हे काही एकमेव उदाहरण नाही. माझा स्वतःचा पुतण्या अमोल जोशी याने इंटरनेटला बोलते केले आहे. (अधिक माहितीसाठी पाहाwww.BVocal.com). गणकयंत्राच्या क्षेत्रात बिल गेट्स् नंतरची ही सर्वात मोठी भरारी मानली जाते. आपला प्रकल्प त्याने पुढे मांडला तेव्हा जागच्या जागी त्याला ४.५० कोटी डॉलर्सचे भांडवल लोकांनी उभे करून दिले. कालच या वेबसाइटवरून मी पाहिले, की त्याला आणखी ४.५० कोटी डॉलर्सचे भांडवल मिळाले आहे. माझा अमेरिकेतील भाऊ हिंदुस्थानात वस्त्रोद्योग क्षेत्रातील इंजिनीअर होता. मी संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्वित्झर्लण्डमधील नोकरीला रामराम ठोकून हिंदुस्थानात परत आलो त्याच सुमारास तो अमेरिकेत गेला. तेथे गेल्यानंतर त्याला अनेक आपत्तींना आणि व्याधींना तोंड द्यावे लागले. त्याची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे ठरले. दहा वर्षे तो डायलिसिसवर राहिला. त्यानंतर, म्हणजे दहा वर्षांपूर्वी एका मृत व्यक्तीच्या मूत्रपिंडांचे आरोपण करण्यात आले. औषधांचा प्रचंड मारा झाल्यामुळे कदाचित्, इतर व्याधी उपटल्या. हृदयावरही शस्त्रक्रिया झाली. इतक्या व्याधींच्या आपत्तींनी हिंदुस्थानात कोणीही पार हतबल, निराश झाला असता. त्याची नियमित आणि कसोशीने देखभाल करण्यात माझ्या धाकट्या वहिनीने जे काम केले त्याबद्दल तिची गणना प्रातःस्मरणीय सतींमध्येच करायला पाहिजे. एवढ्या धामधुमीत, अमेरिकेमध्ये वस्त्रोद्योग अभियांत्रिकीला फारसा वाव नाही हे लक्षात येताच माझ्या भावाने गणकयंत्राचा अभ्यास केला. त्या क्षेत्रातही तो झपाट्याने वर चढला. आज तो IBM या विश्वविख्यात कंपनीच्या आशिया खंडातील विकास प्रकल्प विभागाचा प्रमुख आहे. आठवडाभर आज हाँगकाँग, उद्या चीन अशी त्याची भ्रमंती चालू असते. आठवड्यातून एकदोन दिवस, आताकांतारापेक्षा भयाण झालेल्या घरी परतल्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बागकाम, घरातील दुरुस्त्या, भारतीय संगीताच्या मैफली, नाटकांचे प्रयोग यांत तो गढून गेलेला असतो. स्थानिक समाजातील तरुण मुलांकरिता तो फूटबॉलचा एक संघही चालवितो.
 अनिवासी भारतीयांनी अमेरिकेत केलेल्या दिग्विजयाच्या कथा घरोघर ऐकायला मिळतात. गेल्या वर्षभरात अमेरिकेतील TIME साप्ताहिकाने या विषयावर दोन खास अंक काढले आणि शेकडो कर्तबगार भारतीयांची नावे जगासमोर आणली. मातृभूमीत बुद्धीला वाव मिळत नाही म्हणून अमेरिकेत निर्वासित झालेल्या भारतीय शास्त्रज्ञांनी नोबेल पारितोषक जिंकण्याचा विक्रम वारंवार केला आहे. हर गोविंद खुराणा हे एक उदाहरण; अर्थशास्त्रात अमर्त्य सेन हे अगदी अलीकडचे उदाहरण.
 निराद चौधरी इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले बंगाली; जागतिक कीर्तीचे लेखक. त्यांना अनेकजण शेवटचा खराखुरा इंग्रज म्हणतात. भारतातील परिस्थितीबद्दल त्यांनी विपुल लिखाण केले आहे. भारतवर्षाला त्यांनी ग्रीक पुराणातील Continent of Circ सिर्क खंड ची उपमा दिली आहे. या खंडात जो जो प्रवेश करेल त्याचे असत. त्याचे शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, नैतिक अध:पतन होत जाते आणि अंततोगत्वा विनाश होतो, अशी ग्रीक पुराणातील कथा आहे. भारतवर्ष असाच पछाडलेला भूप्रदेश आहे. दक्षिणेतून द्रविड आले, लय पावले. उत्तरेतून आर्य आले ते संपले. मुसलमानांचा दिग्विजय येथेच थांबला. समुद्रमार्गाने इंग्रज येथे आले आणि त्यांच्या साम्राज्यावर कधीही न मावळणारा सूर्य ढळला.
 ऐतिहासिक उदाहरणे सोडून दिली तरी अगदी सर्वसामान्यांच्या आयुष्यातही हा परिणाम दिसून येतो. अद्ययावत् ऐवजी श्रुतिस्मृतिपुराणोक्ताची निष्ठा सर्वदूर तयार होते. चांगले चांगले विद्वान पदवीधरही बाबामहाराजांसमोर अंगारेधुपारे करू लागतात. कोणताही नवा प्रकल्प पुढे आला की त्याची अंमलबजावणी करणे किती दुष्कर आहे, किंबहुना, अशक्य आहे हे तावातावाने सांगणाऱ्या मंडळींचे पीक येथे उदंड. आपण फार कर्तबगार, बुद्धिमान पण भोवतालची परिस्थितीच अशी की आपले काही चालत नाही असे रडगाणे जागोजाग विव्हळत असते.
 हा काय प्रकार आहे? मायदेशी कर्तबगारीशून्य म्हणून हिणवली गेलेली ही मंडळी अमेरिकेच्या किनाऱ्याचा स्पर्श होताच कायापालट झाल्यासारखी कर्तबगार, बुद्धिमान, धडाडीची म्हणून गाजू कशी लागतात? अगदी अलीकडे अलीकडेपर्यंत इंग्लंड-अमेरिकेत भारतीयांची गणना पाकिस्तानी नागरिकांबरोबर पाकी म्हणून होत असे; त्यांचे स्वतंत्र अस्तित्वही जाणवत नव्हते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या ज्यू समाजाचा तेथे मोठा दबदबा आहे. तेथील आर्थिक आणि राजकीय जीवनावर ज्यूंचा मोठा प्रभाव आहे. इटलीतून येऊन अमेरिकेत स्थायिक झालेली मंडळी माफिया क्षेत्राततरी मोठा दरारा ठेवून आहेत. अरब नागरिकांच्या हाती तेलाचा काही पैसा असला तर त्यांनाही काही मान मिळतो. बाकी सटरफटर समाज नगण्यच मानले जातात. परवापरवापर्यन्त भारतीयांची गणना या सटरफटर वर्गातच होती. आता त्यांचे स्थान ज्यूंच्या आसपासचेतरी झाले आहे.
 भारताची ऐतिहासिक परंपरा शतकानुशतके जगज्जेत्यांची अवनती घडवून आणण्याची. अमेरिकेची परंपरा न्यूयार्क येथील, हातात मशाल धरून उभ्या असलेल्या स्वतंत्रतादेवीच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरच लिहिलेली आहे - हे, जगातील श्रांत, दुःखी मानवांनो, माझ्या आश्रयाला या. सिर्क खंडाच्या रहिवाशांना एकदम जगज्जेते बनविण्याचा हा चमत्कार उद्भवतो कोठून?
 फरक काही भूगोलाचा नाही, हवापाण्याचाही नाही. १९९१ मध्ये समाजवादापासून वेगळे होण्याची प्रक्रिया सुरू झाली त्या वेळी मान्टेकसिंग अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने अहवाल सादर केला होता. मायदेशी कर्तव्यशून्य दिसणारे परदेशांतील अनिवासी भारतीय धडाडीने आणि कर्तृत्वाने गाजतात याचे कारण साधे आणि सोपे आहे. येथे पूर्वकाळी धार्मिक, सामाजिक बंधनांनी आणि वर्तमानकाळात लायसन्स-परमिट बंधनांनी माणसाला जेरबंद करून टाकलेले आहे. परदेशात येथला माणूस गेला, की त्याला पटकन् फरक जाणवतो तो असा - या नव्या देशात पैसा कमावणे, कर्तबगारी दाखविणे आणि चांगले राहणे हे पाप समजले जात नाही आणि दुसरी गोष्ट, तुमच्या अंगी हिंमत आणि कर्तृत्व असेल तर तुम्हाला कोणीही अटकाव करू शकत नाही. भाकड नैतिकता आणि लायसन्स-परमिट राज यांनी जखडलेला माणूस भारतात निकामी ठरतो. या दोन बंधनांतून मुक्तता झाली म्हणजे पौरुषास अटक राहिली नाही, की त्याला साहजिकच त्याच्या आकांक्षांपुढे गगन ठेंगणे वाटू लागते.
 महात्मा गांधींचे एक प्रख्यात वाक्य आहे, त्याचा मथितार्थ असा – गरिबांना मदत करायच्या गप्पा कशाला? त्यांच्या छातीवरून उठा म्हणजे गरिबी आपोआप दूर होते. भारतीयांची कीर्ती उजळून निघावी आणि जगभर पसरावी अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी प्रोत्साहनाचे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही, हिरमोड करणारी बंधने संपवावीत म्हणजे मग निवासी भारतीयसुद्धा जगभर कर्तबगार म्हणून स्थान मिळवील.

दि. ७/६/२०००
■ ■