जित्याची खोड…


 हिले महायुद्ध संपलेय देशात परतलेल्या वैफल्यग्रस्त रशियन सैनिकांनी बंड केले. आपले पगार मिळावे यापलीकडे त्यांची काही फारशी मागणी नव्हती; पण त्यांच्या उठावाची परिणती झारशाही उखडून टाकण्यात झाली. बोल्शेविकांनी कामगार क्रांतीची घोषणा केली तेथपासून ते बर्लिनची भिंत कोसळेपर्यंत जगावर समाजवादी साम्यवादी विचारांचे प्रभुत्व होते.
 'फायद्याच्या बुद्धीतून व्यक्तीव्यक्तींनी केलेले निर्णय देशाच्या हिताचे असू शकत नाहीत. खुल्या व्यवस्थेत प्रगती होईल; पण ती फार काळ टिकू शकणार नाही. समाजाच्या सर्वंकष आणि टिकावू विकासासाठी सर्वंकष नियोजनच हवे. खासगी मालमत्ता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि देशातील प्रत्येक नागरिक सरकारी यंत्राणेचा पगारी किंवा रोजीचा नोकर राहील अशी ही मांडणी.
 आज थोडक्यात तिचा सारांश सांगायचा म्हटले तरी इतक्या पागल विचारांच्या पिशाच्च्यांनी साऱ्या जगाला ७० वर्षे पछाडले होते. यावर विश्वाससुध्दा बसत नाही. इतक्या तुटपुंज्या अर्थशास्त्राच्या पायावर एका सम्यक तत्त्वज्ञानाचा डोलारा उभारला गेला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात - प्रश्न स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा असो, शेतकऱ्यांचा असो, दलितांचा असो - मार्क्सप्रणीत सिद्धांताचेच अधिराज्य चालू झाले. बुद्धिमंतांत तर एक बलदंड माफिया तयार झाला. मार्क्सच्या सिद्धांतापलीकडे जो कोणी काही बोलेल किंवा काही मांडेल तो अशास्त्रीय खोटा, कामगारविरोधी, अमेरिकन साम्राज्यशाहीचा कुत्रा असल्या निवडक नामाभिधानांनी त्याची संभावना होऊ लागली.
 इतिहास आणि विज्ञान असल्या बाष्कळपणाला थोडीच दाद देणार आहेत? त्यांचा प्रवाह अव्याहतपणे चालूच राहिला. साम्यवाद्यांचा बौद्धिक अहंकार इतका बलदंड, की त्यांनी इतिहासच काय विज्ञानही वाकवायला सुरुवात
केली. इतिहासातील सर्व घटनांनी मार्क्सच्या आज्ञेप्रमाणे कवायतीसाठी उभे राहिले पाहिजे असा त्यांचा आग्रह. काही घटनाप्रसंग कवायतीत बसत नसतील तर मार्क्सवादी शब्दांचे अवडंबर माजवून काही वेगळाच घटनाक्रम ते मांडीत किंवा काही वेगळाच अन्वयार्थ सांगत. स्टॅलिनने स्वतःच जीवशास्त्र आणि उत्क्रांती यासंबंधी खोटा पुरावा उभा करून एक नव्या सिद्धांतांचे कुभांड रचले. समाजवादी नियोजनाने आपला अभ्युदय होईल ही भावना प्रत्येक देशातील प्रतिभाहीन धडाडीशून्य पराजितांना मोठी सोयीस्कर होती. एकामागून एका देशातील सत्ता कोसळत गेल्या आणि तेथे लोकांच्या लोकशाही राज्याची Peoples Democracy सरकारांची स्थापना झाली. लोकांचे सरकार म्हणजे कम्युनिस्ट पक्षाची निरंकुश हुकूमशाही. लोकांचे सैन्य म्हणजे देशातील विरोधकांना मोडून काढणारे लष्कर. जे लोकांच्या लोकशाहीत नाही तेवढे सारे भांडवलशाही, साम्राज्यवादी रक्तपिपासू राक्षस असे व्याकरण चालू झाले.
 या सगळ्या डोलाऱ्याची आर्थिक पायाभरणीच इतकी कच्ची होती, की एक दिवस सारे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून सपाट झाले.सोवियट युनियनचे विसर्जन झाले. संघराज्यातील राज्ये स्वतंत्र झाली. प्रत्येक राष्ट्र नियोजनाचा रस्ता सोडून खुलेपणाच्या रस्त्याने चालू लागले.
 जगाच्या इतिहासात समाजवादी साम्राज्याच्या पतनाला दुसरी तोड नाही रोमन साम्राज्य कोसळले त्याला निदान रानटी टोळ्यांच्या हल्ल्याचे निमित्त झाले. ब्रिटिश साम्राज्य कोसळले त्याला दुसरे महायुद्ध आणि वसाहतींतील उठाव कारणीभूत ठरले. रशियन साम्राज्य आपणहूनच कोसळले. एवढेच नव्हे तर सामूहिक नियोजन ही कल्पनाच बाष्कळ आहे याचा एका बाजूला गणिती सिद्धांत तयार झाला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे सर्वसामान्यांच्या अंतर्मनात खुल्या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेची ग्वाही रुजली.
 समाजवाद उलथला तो प्रतीक्रांतीने नाही. याचा एक परिणाम असा झाला की समाजवादाचे सारे विक्रेते आपापल्या जागी जिवंत राहिले. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा गेली, राजकीय प्रतिष्ठा धुळीस मिळाली; पण समाजवादाच्या काळात त्यांनी विरोधकांचे जसे शिरकाण केले किंवा जशा शिरकाणाचे समर्थन केले तसे काहीच घडले नाही. खुल्या विचारवंतांच्या मनाला तशी कल्पनाही शिवली नाही. जुन्या समाजवाद्यांपैकी ज्यांच्याकडे काही कर्तबगारी होती ते नव्या व्यवस्थेत घुसून गेले आणि आपणच खुल्या विचाराचे आद्य समर्थक असल्याच्या आविर्भावात मिरवू लागले; पण असे थोडे बहुतेक जुने डावे पुन्हा एकदा इतिहास कलाटणी
घेणार आहे, पुन्हा एकदा आपले सोन्याचे दिवस येणार आहेत ही आशा मनात ठेवून जागोजाग दबा धरून आहेत. समाजवादाच्या काळात बांधल्या गेलेल्या मोठ्या धरणांचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करणारे तद्दन मोठ्या धरणांच्या मागे साम्राज्यशाही कट असल्याचा शोध सांगत आहेत. जगभर एकसंध लाल साम्राज्य तयार करण्याचा आंतरराष्ट्रवाद मांडणारे आणि राष्ट्र या संकल्पनेचीच कुचेष्टा करणारे कॉम्रेड आता जागतिकीकरण आणि WTO यांचा निषेध करण्यासाठी गांधीवादी आणि भगवी स्वदेशीवाले यांच्याशी मेतकूट जमवून आहेत. खुलेपणात साऱ्या ऐतखाऊंचे पितळ उघडे पडणार, युनियनच्या ताकदीवर भरमसाट फायदे उपटलेले कामगार जागतिक स्पर्धेसाठी कार्यक्षमता दाखवणे भाग पडले तर नाराज होणार. त्या असंतोषातून पुन्हा एकदा समाजवादी क्रांतीचा पुनर्भव होणार अशी स्वप्ने पाहत आहेत.
 याच्या उलट घडले असते तर काय चित्र दिसले असते? १९८५ च्या सुमारास बिगर समाजवादी देशांत मोठी आर्थिक मंदी येऊ घातली होती. मंदीची लाट प्रत्यक्षात येऊन कोसळली असती आणि परिणामतः नियोजनविरहित अर्थव्यवस्थेची सारी राष्ट्रे गुडघे टेकून समाजवादी रशियाकडे 'दे, हाता शरणागता,' म्हणून गेली असती तर स्वतंत्रतावादी विचारवंतांना कार्यकर्त्यांना लपण्यापुरता तरी आडोसा राहिला असता काय? इतिहास असे सांगतो, की उन्मत्त समाजवाद्यांनी विजयाच्या बेहोशीत लक्षावधी लोकांच्या कत्तली करून टाकल्या. व्यक्तीचे स्वातंत्र्य, बाजारपेठेची कार्यक्षमता आणि गुणवत्ता हे शब्ददेखील शब्दकोषातून हुकूमशहांनी काढून टाकले असते.
 जागतिक व्यापारसंस्था आणि खुला व्यापार यात कर्तृत्वहीन नादान लोकांचे नेतृत्व करून, पुन्हा एकदा इतिहास उलटा फिरवण्याचा प्रयत्न कॉम्रेड करताहेत. त्यांची काय ती वासलात इतिहास लावेलच. आपल्याला कोणत्याही Stalag (युद्धकैद्यांच्या छावणी) मध्ये कुजावे लागणार नाही आणि बंदुकीच्या फैरींना सामोरे जावे लागणार नाही याची मनात खात्री पटल्यामुळे असली ठोकशाहीच समजू शकणारे आता अधिकाधिक धीट बनू लागले आहेत आणि हाती सत्ता नसतानादेखील इतिहास, विज्ञान आणि अर्थशास्त्र उलटेपालटे करू पाहताहेत. ही महंमद घोरी आणि पृथ्वीराज यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती आहे. पृथ्वीराजाकडून तीन वेळा जीवदान मिळालेला घोरी एकदा पृथ्वीराज हाती लागल्यावर त्याचे अनन्वित हाल करण्यास डोळे काढण्यास सरसावला.
 १० एप्रिल २००१ रोजी हैदराबाद येथे कम्युनिस्ट पक्षाने 'जनशक्ती' या
नावाने कामगार संघटनांची एक परिषद भरवली. शेतकरी चळवळीने सर्वप्रथम डाव्यांना शेतीक्षेत्रातून काढून लावले. आज जमिनीचे फेरवाटप, सामूहिक शेती, शेतीचे राष्ट्रीयकरण असला कार्यक्रम घेऊन कोणतीही कम्युनिस्ट शेतकरी संघटना काम करू शकत नाही. ज्या काही किरकोळ शेतकरी संघटना कम्युनिस्ट पक्षाशी नाते सांगतात त्या जातिवंत समाजवाद्याच्या तळपायाची आग मस्तकाला पोचवणाऱ्या 'शेतीमालाच्या रास्त भाव' याच कार्यक्रमावर. हैदराबादच्या परिषदेत भाषणे काय झाली? 'खुलेपणा म्हणजे गुलामी, जागतिकीकरण म्हणजे साम्राज्यवाद!' थोडक्यात उरफाटे समाजवादी शब्दकोश पुन्हा एकदा प्रचलित करण्याइतकी आशा, नव्या व्यवस्थेच्या शिडकाव्याने गारवा झाल्याबरोबर बिळातून बाहेर पडलेल्या भाई लोकांना वाटू लागली आहे. खुली व्यवस्था टाळायची असेल तर शेतीक्रांती झाली पाहीजे असाही सिद्धांत कौशिक कोलकाटा यांनी मांडला. डाव्यांच्या शब्दकोषात कृषिक्रांती याचा अर्थ उत्पादनात वाढ नाही, उत्पादकतेत वाढ नाही, तंत्राज्ञानाचा विकास नाही, बाजारपेठेत उपभोग्य वस्तूंची रेलचेल नाही, कृषिक्रांतीचा डाव्या शब्दकोषातील अर्थ जमिनीचे राष्ट्रीयीकरण समान वाटप किंवा सामूहिकीकरण, हे असे काही घडले तर खुल्या व्यवस्थेकडे जाणारा कालप्रवाह काही काळ खुंटल्यासारखा वाटेलही; परंतु मनुष्य आणि मानवी समाज यांचा अखंड वाढत्या स्वातंत्र्याचा शोध थांबवणे कोणाही हुकूमशहाला आजपर्यंत जमले नाही. यापुढेही जमणार नाही. समाजवादी पुन्हा एकदा नादान कर्तृत्वहीनांच्या असंतोषाचा फायदा घेऊन सत्तेवर येतीलही; पण त्यांचे राज्य टिकणार नाही, समाजवादाचा दुसरा अवतार ७० महिनेही टिकणार नाही. ७० वर्षांच्या समाजवादी साम्राज्याची सारी पापे जनतेने पोटात घातली. दुसऱ्या पतनाच्या वेळी इतकी क्षमाशीलता दुष्कर होईल. खऱ्या स्वातंत्रतावाद्यांना असला प्रतिशोध रुचणारा नाही; पण समूहवादाच्या विषवल्लीचे समूळ उच्चाटन इतिहासात व्हायचे असेल तर त्यासाठी परिणामकारक साधन इतिहासच ठरवेल.

दि. १८/४/२००१
■ ■