अन्वयार्थ – २/धर्मांतरातील प्रियाराधन
लोकसभेचे सत्र चालू असले म्हणजे प्रत्येक खासदाराच्या मुक्कामी सकाळसंध्याकाळ हजार-दोन हजार पानांचे लोकसभेतील कामकाजासंबंधीचे कागदपत्र येऊन पोहोचतात. सकाळी अकरा वाजता संसदेचे कामकाज सुरू होईपर्यंत त्या सगळ्या कागदपत्रांवर उडती नजर फेकणेही अशक्य असते. संसदेच्या समित्या, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे, निगम इत्यादींचे अहवाल लोकसभेपुढे यायचे असले म्हणजे आवश्यक वाचनाची व्याप्ती खूपच वाढते.
कागदपत्रे मिळाल्यानंतर एकदोन दिवसांचा तरी अवधी मिळाला पाहिजे असा आग्रह कोणी धरीत नाही. कारण, एकदा सत्र चालू झाले, की दिवसभर कामकाज चालूच राहते आणि त्यानंतर पुन्हा नवीन कागदपत्रांचा ढिगारा येऊन पडतो.
मग, संसदेत चर्चा करतो कोण? काही खासदारांनी काही विशेष विषयांत त्यांच्या अभ्यासामुळे आणि अनुभवामुळे आपले एक स्थान तयार केले आहे. ही अभ्यासू मंडळी त्यांच्या विषयासंबंधी काही चर्चा होणार असली तर संबंधित कागदपत्र वाचून जातात; चर्चेत भाग घेतात. सर्वसाधारण खासदार मंडळी कागदपत्रे बघायच्या आधी सकाळच्या वर्तमानपत्रांतील ठळक मथळ्यांवर नजर टाकतात. बहुधा त्यांत काहीतरी सनसनाटी मिळतेच. तेवढाच विषय घेऊन प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाल्यापासून धुमाकूळ घालता येतो; जमले तर, सत्र तहकूबही करून घेता येते अशा हिशेबाने आरडाओरडीस सबब मिळेल एवढी बातमी, फारशा तपशिलात न जाता, वाचून वर्तमानपत्र घेऊन ते संसदेकडे जायला निघतात.
युनिट ट्रस्टसारखा एखादा विषय कित्येक दिवस पुरू शकतो आणि आघाडीचे शासन असले म्हणजे त्यातील कोणत्या ना कोणत्या पक्षाचा कोणी ना कोणी
मुखंड काहीतरी तारे तोडून लोकसभेत गदारोळ घालायला सबब तयार करून देतो.
सोमवार दिनांक २० ऑगस्ट २००१. सकाळच्या वर्तमानपत्रांत सरकारला धारेवर धरता येईल असे काहीच नव्हते. त्यामुळे, लोकसभेतले कामकाज कसे काय चालणार यासंबंधी कुतूहल वाटत होते; पण सोमवारच्या अंकात नसले म्हणून काय झाले? रविवारच्या अंकात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी श्रीकृष्णाविषयीच्या एका पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या निवासस्थानीच केले त्याची बातमी होती. असे कार्यक्रम एकामागोमाग एक घडतच असतात; पण या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक सुदर्शनजीही हजर होते. संघाचे स्वयंसेवक वेगवेगळ्या राज्यांतील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रचाराविषयी नाराज आहेत. त्यांच्या विरोधाचा परिणाम जागोजागी हिंसाचारातही होतो. संसदेतील विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी जन्माने ख्रिश्चन कॅथॉलिक पंथाच्या आहेत; तेव्हा, अटल बिहारी यांनी ख्रिस्ती धर्मप्रचाराविरुद्ध खंबीर भूमिका घ्यावी अशी संघस्वयंसेवकांची फार जुनी मागणी आहे. बहुधा सुदर्शनजींना खूश करण्याकरिता, पंतप्रधानांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. ख्रिस्ती धर्मप्रसारक गोरगरिबांची कळकळीने सेवा करतात; इतर कोणीही जेथे पोहोचत नाहीत तेथे ते जातात याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. पण, या सगळ्या भल्या कामगिरीमागे ख्रिस्ती धर्माचा प्रचार करून लोकांना तो धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याची जी बुद्धी आहे, ती मात्र दुर्दैवी असल्याची टिप्पणीही पंतप्रधानांनी केली.
श्रीकृष्णाविषयीच्या पुस्तकाचे प्रकाशन, त्यातून धर्मांतराचा विषय कसा काय निघाला असेल? भगवद्गीतेत श्रीकृष्णाने 'स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मो भयावहः' असे निक्षून सांगितले आहे. त्यातील 'धर्म' शब्दाचा अर्थ 'व्यक्तिमात्राची प्रकृती' असा आहे; सार्वजनिक संघटित धर्मांना उद्देशून हे वाक्य म्हटलेले नाही; पण हिंदुत्वनिष्ठांत इतक्या दार्शनिक तपशिलात जाण्याची परंपरा नाही.
धर्मांतर ही काही भयानक गोष्ट आहे अशी हिंदुस्थानातील अनेकांची ठाम समजूत आहे. मुसलमान बादशहांनी 'इस्लाम स्वीकारलास तर तुला जिवदान देतो, अन्यथा हाल हाल होऊन मरशील' अशी धमकी दिल्यावर निग्रहाने 'स्वधर्म' सोडण्यास नकार देणाऱ्या वीरांच्या बाणेदार कथा घोळवून घोळवून सांगितल्या जातात. त्यामुळे, आपला धर्म सोडण्यापेक्षा मृत्यू श्रेयस्कर अशी सर्वसाधारण भावना आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी जवळचा सहकारी नेताजी पालकर अशाच दडपणाखाली नाइलाजाने मुसलमान झाला. शिवाजी महाराजांनी त्याचे पुन्हा शुद्धीकरण करून घेतले. या ऐतिहासिक दाखल्यानेही धर्मांतराविषयीच्या एकूण कडवट भावनेत फारसा फरक पडलेला नाही.
हिंदुस्थानात फार मोठ्या प्रमाणावर हिंदू प्रजेने धर्मातर केले. मुसलमानी अमलात जातिभेद नसलेल्या, प्रार्थनास्थळांत सर्वांना प्रवेश देणाऱ्या नवीन धर्माचे आकर्षण अनेक शूद्रातिशूद्रांना वाटले. महात्मा जोतीबा फुल्यांच्या शब्दांत, 'त्यांनी महंमदाच्या जहांमर्द शिष्यांचे स्वागत केले.' बलुतेदारांना, कारागिरांना, कलावंतांना दरबारचा आश्रय हवा असेल तर बादशहाचा धर्म स्वीकारण्यात काही सोयही होती. एवढे मात्र खरे, की कुराणाच्या 'कलमा' देशी लोकांना समजतील अशा भाषेत पोहोचवून त्यांची शिकवण लोकांच्या गळी उतरवण्याचे प्रयत्न फारसे झाले नाहीत.
इंग्रजी आमदनीत ख्रिस्ती धर्मप्रसारक आले. त्यांना राजश्रय होता, साधनसंपत्तीही भरपूर होती. डोंगरखोऱ्यांत. रानावनांत, आदिवासी प्रदेशांत त्यांनी आपला शिरकाव केला. त्याबरोबरच, वारंवार दुष्काळग्रस्त होणाऱ्या इलाख्यांतही त्यांनी ठाण मांडले. एक चांगल्यापैकी दवाखाना किंवा इस्पितळ, एखादी शाळा आणि वर, लोकांना उदरनिर्वाहाकरिता काही आधार देऊ केला की दीनदुःखी लोक हजारोंच्या संख्येने त्यांच्याकडे आपोआप येत. सत्तेखालील काही अपवाद सोडल्यास, ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेसारख्या दुष्ट प्रथा आणि, उलटपक्षी, ख्रिस्ताची करुणामयी शिकवण यांवर भर दिला. रेव्हरंड टिळकांसारखी मंडळी ख्रिस्ती बनली. केवळ धर्माची शिकवणच ख्रिस्ती धर्मप्रसारक देत राहिले असते आणि बरोबरीने भुकेलेल्यांना जेवू घातले नसते, आजाऱ्यांची शुश्रूषा केली नसती तर लोक ख्रिस्ती झाले असते किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. पण, रेव्हरंड टिळकांसारख्या अनेकांना जडजंबाल कर्मठ धर्मापेक्षा करुणा शिकविणारा आणि अमलात आणणारा धर्म भारून टाकणारा वाटला यात काही शंका नाही.
हिंदुस्थानात, धर्म हा एक विषय सोडला तर बाकी सर्व विषयांत प्रत्येकाने आपापले मत मांडावे, आपल्यापेक्षा वेगळी मते असणाऱ्यांना आपला विचार पटवून द्यावा, आपल्या मताचा प्रचार करणे हा मनुष्यमात्राचा अधिकार आहे असे मानले जाते. धर्मांतराबाबतही दुसरे धर्म सोडून कोणी हिंदू धर्माचा स्वीकार केला तर हिंदुत्ववाद्यांना त्यात आक्षेपार्ह असे काहीच वाटत नाही; उलट,
आपले पितर स्वर्गात गेल्याचा आनंद होतो. आद्य शंकराचार्यांनी हातात मशाल घेऊन बौद्धधर्मीयांना वादविवादाचे आव्हान दिले आणि हिंदुस्थानातील बौद्ध धर्म संपवून टाकला अशी एक निराधार आख्यायिका सर्वदूर पसरली आहे. शंकराचार्यांनी काही वाईट कृत्य केले असे कोणी मानीत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लाखो दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्याबद्दलही अनेक हिंदुत्ववाद्यांच्या मनात खुपते; पण त्याबद्दल क्रोध उफाळून येत नाही.
पंजाबमध्ये शिख आणि हिंदू समाजांतील सरहद्दीची रेघ इतकी धूसर आहे की कोण हिंदू, कोण शिख हा प्रश्नसुद्धा फारसा उभा राहत नाही.
मतप्रचाराच्या स्वातंत्र्याला हिंदू मानसिकतेत धर्मांतर हा एकच अपवाद, तोसुद्धा शीख किंवा बौद्ध अशा दोस्त धर्माबद्दल नाही. थोडक्यात, धर्मातराविषयीचा सारा आक्रोश हा हिंदुंनी मुसलमान किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याविषयी आहे.
हिंदु समाजाने ज्यांना माणूस म्हणूनदेखील वागवले नाही त्यांनी दुसऱ्या धर्माच्या समाजात प्रवेश केला तर त्यात दुःख मानण्याचे ते काय कारण? याला हिंदुत्ववाद्यांचा युक्तिवाद असा, की मुसलमान किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्यांची राष्ट्रभावना मंदावते आणि ख्रिस्ती व मुसलमान यांच्याप्रमाणे त्यांचे डोळे देशाबाहेरील धर्मसत्तेकडे किंवा धर्मबांधवांकडे लागून राहतात. याहीपेक्षा खरे कारण असे, की कालपर्यंत ज्याला अस्पृश्य मानले तो मुसलमान किंवा ख्रिस्ती झाला, की रावसाहेब किंवा खानसाहेब म्हणून पार चावडीपर्यंत येतो, त्याला कोणतीच कमीपणाची भावना राहत नाही. धर्मांतराने जातिव्यवस्थेला बाध येतो हे हिंदू समाजाचे मोठे दुःख आहे.
धर्मांतरित मुसलमान आणि ख्रिस्ती समाजांतही जुने जातिभेद चालूच राहतात, ब्राह्मण ख्रिश्चन इतर जातींतून आलेल्या ख्रिश्चनांना बरोबरीचे मानीत नाहीत आणि मुसलमान झाले तरी हीन जातीचा बाट काही संपत नाही हे खरे; परंतु हिंदू समाजाशी त्यांचा जेथे जेथे संपर्क यईल तेवढ्यापुरतीतरी जातीमुळे आलेली हीनता फारशी राहत नाही.
मार्क्सवाद्यांना आपला विचार लोकांना पटवून सांगण्याचा आणि त्याना मार्क्सवादी बनविण्याचा अधिकार असेल तर कोणत्याही धर्माच्या पाइकास आपल्या धर्मातील तत्त्वे श्रेष्ठ आहेत हे दुसऱ्यास पटवून देण्याचा प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. ज्याला ते पटेल त्याला आपला धर्म बदलून दुसरा धर्म स्वीकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. राज्यघटनेने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचा अर्थ 'धर्मांतराचे स्वातंत्र्य' असाही होतो.
राहता राहिला एक किरकोळ प्रश्न. सेवासोयींची लालूच दाखवून धर्मांतराला प्रवृत्त करणे कितपत योग्य आहे? कोणाचे प्रेम संपादन करायचे असले तर त्याला वारंवार भेटावे, त्याच्या संगे बोलावे चालावे, त्याला भेटवस्तू द्याव्यात असे पूर्वसूरींनी सांगून ठेवले आहे. प्रणयाराधनाच्या काळात प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देणे अयोग्य आहे असे कोणी म्हणत नाही. मग, तहानलेल्यांना पाणी पाजणे, भुकेलेल्यांना खाऊ घालणे, ज्ञानाचा हक्क नाकारलेल्यांना लिहायवाचायला शिकविणे आणि रोगपीडितांची शुश्रूषा करणे यांत आक्षेपार्ह ते काय? माणसाच्या दुःखांकडे कठोरतेने दुर्लक्ष करणाऱ्या स्वधर्मलंडांपेक्षा या वेगळ्या प्रकारच्या माणसांचा विचार काय, हेतू काय, त्यांच्या प्रेरणा कोणत्या याविषयी कुतूहल निर्माण झाले आणि त्यातून कोणी आपला, जन्माच्या अपघाताने मिळालेला, धर्म सोडून देण्यास तयार झाला तर त्याचे कौतुक झाले पाहिजे. जन्माच्या अपघाताने मिळालेल्या धर्माचा जो अभिमान बाळगतो त्याचा तो अभिमान अभिनिवेशाचा आहे; जाणीवपूर्वक ज्याने धर्म स्वीकारला त्याचा धर्माभिमान नव्या 'मुल्ले'पणाचा काळ संपल्यानंतर तरी अधिक गंभीर आणि गाढ असणार.
दि. २५/८/२००१
■ ■