अन्वयार्थ – २/लादेन विरुद्ध दाऊद इब्राहीम


लादेन विरुद्ध दाऊद इब्राहीम


 ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत सकाळी नऊ वाजण्याच्या आसपास मॅनहॅटनमधील, जागतिक व्यापार केंद्राच्या दोन मनोऱ्यांवर चाच्यांनी पळविलेली दोन वेगळी वेगळी विमाने आदळण्यात आली. माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे हिंदुस्थानातही अनेकांना CNN वाहिनीवर दुसरे विमान प्रत्यक्ष आदळतानाचे दृश्य पाहायला मिळाले; काही वेळानंतर, एकामागोमाग एक दोनही मनोरे उभेच्या उभे खचतानादेखील पाहता आले. साऱ्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आणि मानबिंदू असलेल्या या ठिकाणी हल्ल्याच्या वेळी पन्नास हजारांवर माणसे काम करीत असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला; तेव्हा आतंकवाद्यांचा हा हल्ला किती भयानक होता या जाणिवेनेच सारे शहारून गेले. मृतांकरिता, साहजिकच, सर्वांच्याच मनात दुःख आणि त्यांच्या संबंधींकरिता सहानुभूती उफाळून आली. 'पर्ल हार्बर'शी तुलना करण्यासारखा हा हल्ला अमेरिकेच्या मर्मस्थानी झाला, तेव्हा आता अतिरेक्यांचे पारिपत्य केल्याखेरीज अमेरिकेसारखी महासत्ता राहणार नाही हीही जाणीव सर्वांना झाली.
 भारतातील जाणत्या नेत्यांना आणि जनसामान्यांनाही, एवढ्या भीषण परिस्थितीतही थोडे दु:खात सुख वाटले. ही प्रतिक्रिया मोठी विशेष होती.
 हिंदुस्थानात अतिरेक्यांनी कित्येक वर्षे थैमान घातले आहे. ईशान्येकडील प्रदेशात तेथील आदिवासी परकीय धर्माच्या आणि राजसत्तांच्या पाठिंब्याने कित्येक दशके हैदोस घालीत आहेत. पंजाबमधील खलिस्तानवादी अतिरेकी वर्षानुवर्षे हत्याकांड चालवीत होते. पंजाब सीमेवरील पाकिस्तानची सरहद्द मजबूत करण्यात आली, त्यानंतरच खलिस्तानवादी अतिरेक्यांचा बीमोड करता आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये आजही अतिरेक्यांचा धुमाकुळ चालू असल्याच्या बातम्या दररोज येत असतात. तेथेतर काश्मिरी अतिरेकी नाहीतच; सारे अतिरेकी पाकिस्तानी,
तालिबानी किंवा पाकिस्तानप्रेरित किंवा प्रेषित आहेत असा प्रचार सर्व माध्यमांतून निनादत असतो. हिंदू अतिरेक्यांनी बाबरी मशिद पाडली आणि त्यानंतर मुंबईत नियोजितपणे बॉम्बस्फोट झाले. त्यात शेकडो निरपराध नागरिक प्राणास मुकले. या बॉम्बस्फोटांचा नियोजक दाऊद इब्राहीम हिंदस्थानतून निसटून गेला. कोणी म्हणतात तो दुबईत राहत असे आणि तेथून हिंदुस्थानातील अर्थकारण, चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचे खेळ खेळत असे. अलीकडे तो पाकिस्तानात स्थायिक झाला आहे अशी बातमी होती. त्याला हिंदुस्थानच्या हवाली करावे अशी मागणी, आग्रा शिखर परिषदेच्या वेळी, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष मुशर्रफ यांच्याकडे केली. पण, मुशर्रफ यांनी सपशेल कानावर हात ठेवले. दाऊद पाकिस्तानात नाहीच असे त्यांनी निक्षून सांगितले. त्यानंतर काही दिवसांतच एका पाकिस्तानी वृत्तपत्राने दाऊदच्या पाकिस्तानातील निवासाचा आणि कार्यालयाचा तपशील देऊन तो तेथे काय राजेशाही थाटात राहतो याचे रसभरित वर्णनही दिले.
 या सगळ्या प्रकारांमुळे, हिंदुस्थान हा आतंकवादाने पिडलेला देश आहे अशी सर्व देशवासीयांची बालंबाल खात्री पटली आहे. तामिळी वाघ हिंदुस्थानच्या आधाराने श्रीलंकेत काय धुमाकूळ घालीत आहेत याचा बहुतेक हिंदुस्थानींना, आतंकवादाचा विषय निघाला म्हणजे सोयीस्कर विसर पडतो.
 पाकिस्तानला आतंकवादी देश म्हणून घोषित करावे यासाठी हिंदुस्थान अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांत थोडासा दिलासा वाटेल अशी निवेदने अमेरिकन शासनाच्या काही नेत्यांनी केली; पण, उघडउघड 'आतंकवादी' असा शिक्का पाकिस्तानवर ११ सप्टेंबरपर्यंत मारण्यात आला नव्हता. आम्ही इतकी वर्षे ज्या घातपाती कारवायांमुळे त्रस्त झालो आहोत त्याचा अनुभव आता खुद्द अमेरिकेसारख्या महासत्तेला आला. आता या विषयावर 'रामाय स्वस्ति, रावणाय स्वस्ति' अशी ढिलीढाली भूमिका घेऊन चालणार नाही. आतंकवादाला सगळ्यांत जास्त विरोध करणाऱ्या, संयुक्त राष्ट्रसंघात त्यासंबंधी वारंवार प्रस्ताव आणणाऱ्या हिंदुस्थानचे आंतरराष्ट्रीय अतिरेक्यांच्या विरोधात कोणत्याही कारवाईत बिनीचे स्थान असायला पाहिजे आणि असणार अशी सर्व भारतीयांची खात्री होती. या नव्या संघर्षात अमेरिका आणि हिंदुस्थान यांच्या नेतृत्वाखाली अतिरेक्यांविरुद्ध - हिंदुत्ववाद्यांच्या लेखी मुसलमान देशांविरुद्ध - प्रचंड संघर्ष छेडला जाईल आणि अमेरिकेच्या मदतीने हिंदूंच्या ऐतिहासिक शत्रूचा निःपात होईल अशी शेख महंमदी स्वप्ने हिंदुत्ववादी पाहू लागले.
 या लोकांचा 'नोस्ट्राडॅमसची भाकीते' हा मोठा आवडता संदर्भग्रंथ आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रचंड धर्मयुद्ध होऊन त्यात हिंदूंची पताका जगभर मिरवणार आहे असा नोस्ट्राडॅमसच्या भाकिताचा सोयीस्कर अर्थ काही लावतात. ११ सप्टेंबरला मॅनहॅटनमध्ये मनोरे कोसळले आणि हिंदूदिग्विजयाचा कालखंड सुरू झाला, आता पाकिस्तानला कोणी विचारणार नाही; आता अमेरिका आणि हिंदुस्थान प्रमुख दोस्त राष्ट्रे बनतील अशी त्यांना खात्री वाटत होती.
 प्रत्यक्षात घडले ते काही विपरीतच. अमेरिकेने ओसामा बिन लादेन आणि त्याची संघटना यांच्यावरच आपल्या प्रतिक्रियेचा रोख वळवला आणि आपली आघाडी मुसलमान देशांविरुद्ध नाही असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी, अगदी अल्लाचे नाव घेऊन सांगितले. लादेन अफगाणीस्तानात लपून आहे, त्याला बिळातून बाहेर काढण्यासाठी अफगाणिस्तानवर व्यापक मोहीम बांधली जाऊ लागली. अफगाणिस्तानवर खुष्कीच्या मार्गाने हल्ला करायचा तर सरहद्दीवर असलेले प्रदेश - कझागीस्तान, इराण, पाकिस्तान यांचीच मदत घ्यावी लागणार. लष्करी तळाकरिताच नव्हे तर वायुदळाच्या हल्ल्याकरिता या शेजारच्या देशांत तळ असणे लष्करी हालचालींच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल.
 अफगाणीस्तानातील तालिबान राज्यकर्ते इतिहासात अवतरले ते सोव्हिएत युनियनने अफगाणीस्तानवर केलेल्या हल्ल्याचा विरोध करण्यासाठी. तालिबानला सर्व प्रकारची मदत पाकिस्तानमार्फत अमेरिकेने पुरविली होती. आजही इतर कोणत्याही देशापेक्षा तालिबानचे संबंध पाकिस्तानशीच घनिष्ट आहेत. अफगाणीस्तानवर हल्ला होणार अशी लक्षणे दिसताच लक्षावधी अफगाणी सरहद्द ओलांडून क्वेट्टा आणि पेशावर येथे दाखल झाले. अफगाणीस्तानविरुद्धच्या मोहिमेत अमेरिका व नाटो देश यांच्या खालोखाल सर्वांत जास्त महत्त्व पाकिस्तानला मिळाले.
 अमेरिका-हिंदुस्थान दोस्तीची स्वप्ने पाहाणाऱ्या भारतीय नेत्यांनी आपणहून सर्व प्रकारची लष्करी मदत - तळ, गुप्तहेरी माहिती- देऊ केली, तिच्याकडे फारसे कोणी लक्षही दिले नाही. उलटपक्षी ही कठीण परिस्थिती हाताळण्यात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ चांगलीच वाकबगारी दाखवीत आहेत.
 आग्रा शिखर संमेलनापर्यंत आंतरराष्ट्रीय आतंकवादाविषयी चर्चासुद्धा करायला तयार नसणारे राष्ट्र एका रात्रीत पाकिस्तानच आंतरराष्ट्रीय आतंकवादाचा शिकार झाल्याची बतावणी करू लागले आणि त्याने अतिरेक्यांच्या बीमोडाच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेस आपला सर्वतोपरी पाठिंबा असल्याचे जाहीर करून टाकले. मोबदल्यात
अमेरिकेने काश्मीर प्रश्नात काही हस्तक्षेप करावा अशा अटी घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला; पण त्याला फळं येण्याची काही शक्यता न दिसल्याने अटींचा आग्रह धरला नाही. उत्तर पाकिस्तानात तालिबानचा संपर्क आलेल्या पाकिस्तानच्या जनतेत लादेनबद्दल एक मोठे तेजोवलय आहे; हा एकटा 'खुदा का बंदा' अमेरिकेसारख्या महासत्तेला 'त्राहि भगवन' करून टाकतो याबद्दल एक बढाईखोर कौतुकही आहे. पाकिस्तानने अमेरिकेला मदत केली तर तालिबान आक्रमणाला तोंड द्यावे लागेल या धमकीकडे पाकिस्तान राष्ट्राध्यक्षांनी दुर्लक्ष केले. देशभर मुस्लिम कठमुल्लांनी हिंसक निदर्शने घडवून आणली, त्यालाही पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी भीक घातली नाही. अमेरिकेला मदत करण्याखेरीज दुसरा व्यावहारिक पर्याय नाही हे त्यांनी अचूक ओळखले. जुनी सारी आतंकवादाने गिचमिडलेली पाटी साफ पुसून मोठ्या संभावितपणाचा आव आणून पाकिस्तान भद्र राष्ट्रांच्या बरोबरीने उजळ माथ्याने मिरविण्याची धडपड करीत आहे.
 पाकिस्तानचा जन्मच आतंकवादाच्या पापात आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाची अहिंसक लढाई चालू असताना बॅरिस्टर महंमद अली जीना यांनी 'डायरेक्ट ॲक्शन' चा आदेश दिला आणि कोलकत्त्यापासून कराचीपर्यंत भोसकाभोसकी, जाळपोळ, बलात्कार यांचे थैमान सुरू झाले. १९४७ नंतरचाही पाकिस्तानचा इतिहास अशा घातपाती कृत्यांनी चितारलेला आहे. जगासमोर पाकिस्तानचे हे ढोंग 'बेनकाब' करण्यात हिंदुस्थानी मुत्सद्दयांना प्रचंड अपयश आले आहे. अमेरिका पकिस्तानच्या मदतीने अफगाणिस्तानच्या मोहिमा आखीत असताना पाकिस्तानातील अंतर्गत दुफळीचा फायदा घेण्याचा हिंदुस्थानचा इरादा नाही असा निर्वाळा परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीररीत्या देऊन टाकला.
 '११ सप्टेंबरच्या मॅनहॅटन व पेंटॅगॉन हल्ल्याची तुलना मुबईतील बॉम्बस्फोट मालिकेशी करून ११ सप्टेंबरच्या घातपाताचा कर्ता जसा बिन लादेन तसाच मुंबईतील बॉम्बस्फोटांचा कर्ता दाऊद इब्राहिम; लादेन अफगाणिस्तानात लपला आहे म्हणून अमेरिका अफगाणिस्तानवर आक्रमण करू इच्छीत असली तर त्याच न्यायाने दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी पाकिस्तानवर मोहीम करणेही आवश्यक आहे,' हा मुद्दा हिंदुस्थानी मुत्सद्दयांनी फारसा उठविलाही नाही. हिंदुस्थानी मुत्सद्दयांचे सारे डोळे जम्मू आणि काश्मीर प्रकरणी पाकिस्तानला आतंकवादी देश म्हणून ठरविण्याकडे इतके लागले आहेत, की इतर कोणत्याही शक्यतांकडे ते फारसे ढुंकून पाहत नाहीत.
 जम्मू-काश्मीर प्रकरणी इतिहास काहीही असला तरी शेवटचा निर्णय तेथील
जनतेच्या इच्छेला अनुसरून झाला पाहिजे अशी इच्छा अमेरिकेने व्यक्त केल्याने हिंदुस्थानी मुत्सद्द्यांच्या या प्रयत्नांस फारसे यश येत नाही. दाऊद इब्राहिमच्या छोट्या प्रकरणात पाकिस्तानला जगाच्या न्यायालयापुढे आतंकवादी म्हणून शाबीत करून देणे सध्याच्या परिस्थितीत सहज शक्य होते. तसा प्रयत्न हिंदुस्थानने केला नाही. अमेरिका-हिंदुस्थानप्रणीत आतंकवादविरोधी दोस्तफळीची संभावना विरघळून गेली आहे. आतंकवादविरोधी लष्करी कारवाई आतंकवादविरोधी कारवाईच्या अग्रभागी वर्षानुवर्षे जगभर धुडगूस घालणारी अमेरिका आणि आतंकवादात जन्मलेला आणि वाढलेला पाकिस्तान या दोन देशांच्या झेंड्यांखाली होईल असे दिसते आहे.

दि. २९/९/२००१
■ ■