अन्वयार्थ – २/सुखी माणसाचा सदरा



सुखी माणसाचा सदरा


 शाळेतल्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकात एक धडा होता - सुखी माणसाचा सदरा. कोण्या एका राजाच्या वैद्याने सुखी माणसाचा सदरा घालावयास मिळाला तर राजाची व्याधी दूर होऊन तो खडखडीत बरा होईल असे निदान केले. राजाची सारी फौज सुखी माणसाच्या शोधात निघाली. पण, कोणीही प्रजाजन आपण सुखी असल्याचे सांगेना. अखेरीस, सकाळपासून कष्ट करून घामाने निथळणारा, थंड सावलीला बसलेला एक लाकूडतोड्या भेटला, 'मी सुखी आहे,' तो म्हणाला. शिपायाने त्याच्याकडे त्याच्या सदऱ्याची मागणी केली; पण त्याच्याकडे अंगात घालायलासुद्धा सदरा नव्हता, राजाला देण्याची गोष्ट दूरच राहिली.
 'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे' अशी तुकोबांचीही वाणी आहे. सुखाचा आणि संपन्नतेचा काही संबंध नाही अशी आमच्या लहानपणी समजूत होती.
 आता ही समजूत बदलत आहे; पैसा हे सुखाचे साधन आहे अशी सार्वत्रिक धारणा आहे. जिकडे जावे तिकडे सारे दुःखीच दिसतात. कोणाकडे पैसा नाही, कोणाला नोकरी नाही, कोणी गुंड आणि दादा यांच्या धमकावण्यांनी भयभीत झाला आहे, तर कोणी भ्रष्टाचारी पुढाऱ्यांच्या पक्षबदलू प्रवृत्तीमुळे सरकारे पडत गेली तर देशाचे कसे होईल याच्या चिंतेत पडला आहे. देशांच्या संपन्नतावार यादीत आपल्या देशाचा क्रमांक शेवटच्या गटात आहे. निरक्षरता वाढते आहे. यंदा तर सर्वदूर दुष्काळ पसरला आहे. प्यायच्या पाण्यासाठी लोक वैराण भटकत आहेत आणि पाण्याची भीक मागत आहेत.
 अशा परिस्थितीत भोवताली कोणी आपण 'सुखी' असल्याची द्वाही फिरवीत नाही हे समजण्यासारखे आहे. आजचा एखादा तुकोबाराया सुखदुःखाचे मोजमाप करायला निघाला तर 'बहुतेक सारे दुःखाने गांजलेले' अशाच निष्कर्षाला आला असता.
 विश्वास ठेवा, ठेवू नका; प्रत्यक्ष आकडेवारी याच्या अगदी उलट आहे. बाजारपेठेचा अभ्यास करण्यात तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या Roper Starch या कंपनीने गेल्या वर्षी जगी सर्व सुखी असा कोण आहे? याचा जगभर शोध घेतला. त्यांच्या अहवालानुसार, भारतीय पृथ्वीतलावरील सर्वांत सुखी लोकांपैकी प्रमुख आहे; भारतीयांपेक्षा सुखी, थोड्याफार प्रमाणात, फक्त अमेरिकन लोक आहेत; फ्रान्स इंग्लंडमधील नागरिकही भारतीयांपेक्षा कमी सुखी आहेत.
 या अहवालामुळे सर्वांत मोठा हलकल्लोळ माजला आहे. दूरदर्शनवर सकाळी नित्यनेमाने प्रवचने सांगणारे बाबा आणि महाराज या अहवालाचा दाखला देऊन आपल्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व भक्तगणाच्या मनावर ठसवू लागले आहेत. भारतीय खरोखरी जगातील सर्व लोकांत सुखी आहेत काय? पाहणी करणाऱ्या कंपनीने अनेकांच्या मुलाखती घेतल्या; तुमच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात काय? तुमच्या मिळकतीबद्दल तुम्ही खूश आहात काय? तुमच्या कुटुंबातील लोकांशी तुमचे संबंध आनंददायी आहेत काय? धर्म आणि देव यांच्या आयुष्यातील स्थानाबद्दल तुम्हाला संतोष वाटतो का? अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरे गोळा केली. ती गणकयंत्रात घालून त्यांवर बेरीज, गुणाकार आदी संख्याशास्त्रीय प्रक्रिया केल्या आणि अहवाल तयार झाला.
 बहुसंख्य भारतीयांनी आपण सुखी असल्याचे का सांगितले असावे?
 एक कारण, आत्मप्रौढी हे असू शकते. भारतीय माणूस घरात खायला दाणा नसला तरी कणगीला 'मोत्यासारख्या ज्वारी'ची पोती लागल्याची प्रौढी चावडीवरील गप्पांत मिरवितो. 'आपल्या दुःखाची जाहिरात करून काय मिळणार आहे? उलट, आपण दुःखी असल्याची कबुली दिली तर औंदा पोरीचं लगीन जमायला वांधे होतील' असा सुज्ञपणाही भारतीयांत भरपूर आहे.
 दुसरेही एक कारण असू शकते! 'खाली पाहून चालावे' ही फार जुनी शिकवण आहे. 'बूट नसल्याने मी दुःखी होतो, पण जेव्हा पायच नसलेला माणूस पाहिला तेव्हा त्याच्या तुलनेने आपण कितीतरी बरे याची जाणीव होऊन आनंद वाटला' असे तुलनेने समाधान मानायला भारतीयांना भरपूर वाव आहे. नोकरी नाही, उद्याची शाश्वती नाही अशा माणसालाही झोपडपट्टीतील कंगाल, भणंग, दरिद्री, आजाराने पिडलेल्या माणसांशी तुलना करता 'आपले बरे चालले आहे,' असे समाधान वाटून घेता येते. गरिबी, कंगालपण आणि दुःख जागोजाग ओसंडत आहे. तेव्हा, 'तुलनेने आपले बरे चालले आहे' असा संतोष मानण्यास येथे भरपूर वाव आहे.अमेरिकेसारख्या श्रीमंत देशात घरचे उरलेसुरले शिळेपाके भीक म्हणून मिळाल्याबद्दल तोंड भरून आशीर्वाद आणि दुवा देणारी प्रजाच फारशी नाही; सर्वसामान्य अमेरिकन नागरिकाने खाली कोणाकडे पाहून संतोष मानावा?
 भारतीयांच्या संतोषाला ऐहिक आधार फारसा नाही. मग, भारतीयांचा सुखसंतोष हे त्यांच्या प्राचीन आध्यत्मिक परंपरेचे फळ आहे काय? अहवालावरून तसे दिसत नाही. भारतीय माणूस इंग्लिश किंवा फ्रेंच माणसापेक्षा लौकिक बाबतीत अधिक संतुष्ट असल्याचे सांगतो. याउलट स्थिती कुटुंब आणि धर्मसंस्था यांच्याबद्दल.
 अमेरिकेत निम्मे विवाह घटस्फोटाने संपतात; आत्महत्या आणि मादक द्रव्यांचे सेवन यांचे प्रमाण भरपूर आणि तरीदेखील, अहवालाच्या निष्कर्षानुसार अमेरिकन नागरिक आपल्या कुटुंबातील जिव्हाळ्याबद्दल भारतीयांपेक्षा अधिक सुखी आहेत. देव आणि धर्म ही तर भारतीयांची मोठी निष्ठेची स्थाने; पण अहवालाचा निष्कर्ष अगदी वेगळा आहे. पाश्चिमात्य जगातील माणूस धर्म आणि परमेश्वर यांना अधिक महत्त्वाचे स्थान देतो. आता, अहवालाच्या या निष्कर्षाचा अन्वयार्थ लावायचा कसा? दरिद्री भारतीय त्याच्या आर्थिक स्थितीविषयी संतुष्ट! आणि कुटुंबातील जिव्हाळ्याबद्दल असंतुष्ट! आणि सर्व गोळाबेरीज करता जगातील लोकांत भारतीय दुसऱ्या क्रमांकाने सुखी?
 अहवालाच्या निष्कर्षात काही तथ्य असते तर परदेशी दूतावासांच्या समोर तेथे जाऊन स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या भारतीयांच्या झुंबडी दिसल्या नसत्या. पाहणी करणाऱ्या निरीक्षकांना दिलेली तोंडी उत्तरे काहीही असोत, भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता महाराजांनी पटवून दिल्यावर गच्च भरलेल्या मंडपातील श्रोतृवृंद कितीही मोठा टाळ्यांचा कडकडाट करीत असो; 'आपण सुखी आहोत काय?' या प्रश्नाचे उत्तर भारतीय वाचेने देत नाहीत, हात वर करून देत नाहीत; शक्य होईल तेव्हा, शक्य होईल तेथे देश सोडून निघून जातात - एका अर्थाने भारतीय आपले खरे मत पायाने स्पष्ट करतात.
 महात्मा जोतिबा फुले यांनी हिंदू धर्मग्रंथांतील चमत्कारिक घटनांची एका वाक्यात वासलात लावून टाकली - असल्या खल्लड ग्रंथांत तर्कसंगती ती काय शोधायची? ब्रह्मदेवाला चार तोंडे, शरीराच्या प्रत्येक अवयवातून त्याला गर्भधारणा होते आणि आपल्याच मुलीच्या मागे तो कामपिसाट होऊन लागतो. सत्य आणि शास्त्र शोधायला जाण्यात मतलब काय?
 निवडणुकांच्या निकालांविषयी अंदाज बांधणाऱ्या तज्ज्ञांबद्दल काही वर्षांपूर्वी बऱ्यापैकी आदर होता; बिहार विधानसभेच्या गेल्या निवडणुकांनंतर तो पार संपुष्टात आला.
 गेली काही वर्षे संयुक्त राष्ट्रसंघातील एक संस्था आर्थिक संपन्नतेच्या कक्षांच्या पलिकडे जाऊन व्यापक मानवी विकासाच्या निर्देशांकांचे आकडे प्रसिद्ध करीत आहे. या विकास-निर्देशांकांमुळे गावोगावच्या अर्ध्याकच्च्या पंडितांचे फार फावले आहे. कोणीही उठावे, संख्याशास्त्राच्या आणि समाजशास्त्राच्या अकटोविकट ज्ञानाच्या आधारे काहीही पाहणी करण्याचा घाट घालावा. असल्या कामांसाठी भरपूर निधी मिळतात, पैशाचा तुटवडा नाही, नावापरी नाव होते, पैसे मिळतात आणि अशा प्रकारे प्रसिद्धी-पुरुष व्हायला मिळते, या लालचीने असले खल्लड उपक्रम हाती घेतले जातात.
 या विषयातील विज्ञान शुद्ध आणि स्पष्ट आहे. माणसाच्या कोणत्याच भावनांचे मोजमाप करणे अशक्य आहे; ना सुखाचे, ना दुःखाचे. समाधानाचीसुद्धा गणना करणे शक्य नाही. भुकेल्या माणसाने भाकरीचा एक तुकडा खाल्ला तर त्याला प्रचंड संतोष मिळतो; आणि भूक भागल्यानंतर तो खातच राहिला तर त्याला मिळणाऱ्या समाधानाचे प्रमाण कमी कमी होत जाते. एकाच माणसाच्या वेगवेगळ्या परिस्थितीतील भावनांची तुलना कदाचित् शक्य असेल; पण, पहिला घास खाणाऱ्या 'अ'चे समाधान आणि दहावा घास खाणाऱ्या 'ब'चा संतोष यांची तुलना अशक्य आहे. या सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट गोष्टीमुळे सारे कल्याणकारी अर्थशास्त्र आणि समाजवादी नियोजन ढासळून पडले.
 विचार आणि भावना व्यक्ती अनुभवते, समूह नाही. समाजवादाच्या पाडावाचा हा धडा तळागाळापर्यन्त पोहोचत नाही म्हणून आनंदाचे, एवढेच काय, आध्यात्मिक उंचीचे मोजमाप घेऊ पाहणारे डॉन क्विग्झोट अनेक झाले, अनेक आहेत आणि अनेक होतील.

दि. ९/५/२०००
■ ■