अन्वयार्थ - १/आधुनिक तंत्रज्ञान नाकारून कुणाचे भले होणार?


आधुनिक तंत्रज्ञान नाकारून कुणाचे भले होणार?


 "गावातली लक्ष्मी शहरात जात आहे, गावातले उद्योगधंदे बंद पडत आहेत. गावे ओस पडत आहेत." ही आणि असली वाक्ये ग्रामीण समस्येविषयी बोलताना हरहमेश वापरली जातात. गावातील हुन्नरीची लूट म्हणजे गावची लूट, गावची लूट म्हणजे देशाची लूट; विलायती माल देशात आला, विलायती तोंडवळ्याचे कारखाने देशात उभे राहिले, त्यामुळे गावातील उद्योगधंदे मोडकळीस आले, बलुतेदार निर्वासित झाले, देश बुडाला इ. इ. शब्दांचे महापूर वाहिले आहेत.
 आधुनिक कारखानदारीसमोर ग्रामोद्योग हटले. त्यामुळे ग्रामोद्योगांचे, बलुतेदारांचे नुकसान झाले हे खरे; पण त्यामुळे देशाचे नुकसान झाले असे म्हणणे कठीण आहे. जो उद्योगधंदा अधिक कार्यक्षमतेने चालतो तोच शेवटी समाजाच्या हिताचा असतो.
 १९८४ मध्ये मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी सर्व सेवा संघाच्या सहकार्याने एक अभ्यास केला. गावकरी मंडळींनी शहरातला माल म्हणून घ्यायचा नाही, गांधीजींच्या आदर्शाप्रमाणे स्वयंभू, स्वयंपूर्ण गाव तयार करायचं असा निश्चय केला तर गाव पुन्हा संपन्न होईल काय? शहराविरुद्ध आर्थिक बहिष्काराचा कार्यक्रम चालवणे कितपत शक्य आहे? तो यशस्वी होईल काय? हे सारे तपासून पाहणे हा प्रयोगाचा हेतू होता.
 सुरुवात साबणाने
 सर्वसेवा संघ आणि ग्रामोद्योगाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था स्नानाचा साबण गावात तयार करून कित्येक वर्षे बाजारात ठेवत आहेत; पण बाजारात त्याला गिऱ्हाईक नाही. काही तत्त्वनिष्ठ मंडळी निष्ठा म्हणून कुटीराद्योगांच्या साबाणाच्या वड्या विकत घेतात आणि वापरतात. या साबणाच्या वड्यांची किंमतही कारखानदारी साबणाच्या वडीच्या तुलनेने काही फारशी कमी नसते. वडिलांच्या निष्ठेपोटी कुटीरोद्योगाचा साबण वापरावा लागतो. यामुळे घरातली माणसे, विशेषतः तरुण मंडळी मोठी नाराज असतात. या साबणाने अंग स्वच्छ व्हायच्याऐवजी अंगावर किटण चढल्यासारखे वाटते अशी त्यांची तक्रार.
 जनआंदोलन म्हणून कारखानदारी साबणावर बहिष्कार घातला आणि गावात तयार होणाऱ्या साबणाला प्रोत्साहन दिले, तर या एका मोठ्या ग्रामोद्योगाला दिवस बरे येतील, त्याची भरभराट होईल. तेव्हा शहरी मालावर बहिष्कार टाकण्याचा कार्यक्रम साबणापासूनच सुरू करावा, असा सर्वच मंडळींचा आग्रह पडला.
 तोट्याचा धंदा
 शहरातला साबण म्हणून घ्यायचा नाही असे ठरले तरे गावातील स्नानाच्या आणि कपडे धुण्याच्या साबणाच्या सर्व गरजा ग्रामोद्योग पुरवू शकेल काय? हा पुढचा प्रश्न. त्या क्षेत्रातील अनुभवी मंडळी म्हणाली, की सध्याचे उत्पादन पुरे पडणार नाही; पण अजून पुष्कळ गावी हा साबणाच्या उत्पादनाचा धंदा चालू करता येईल; पण त्यासाठी भांडवल लागेल. हे भांडवल बँकांकडून मिळणे कठीण आहे. कारण साबणाला मिळणाऱ्या किमतीत उत्पादनाचा खर्च काही भरून येत नाही. त्यामुळे सध्यादेखील सरकारी अनुदानाने आणि मदतीनेच हा धंदा चालला आहे. धंद्यात फायदा नाही म्हटल्यावर बँकेकडून कर्ज मिळणार नाही आणि सध्याची उत्पादनक्षमता अगदी १० पटींनी वाढवायची म्हटली तर एवढी सरकारी मदत मिळायची काही शक्यता नाही.
 शहरी साबणावर बहिष्कार घालण्याच्या कार्यक्रमात पहिली अडचण, गावाला लागणाऱ्या साबणाची गरज कुटीरोद्योग पुरवू शकणार नाहीत. उत्पादनात तातडीने वाढ करणे शक्य नाही. कारण त्यासाठी लागणारे भांडवल मिळणार नाही. भांडवल मिळणार नाही, कारण धंदा तोट्यात आहे. आता या दुष्टचक्रातून सुटायचे कसे?
 कारखानदारी उधळपट्टी
 मग आणखी एक नवा प्रश्न निघाला. परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि देशी कारखानदार लक्स, हमामसारखे साबण तयार करतात. त्यांचा माल वेष्टनापासून रंगापर्यंत आणि सुगंधापासून फेसापर्यंत लोकांना जास्त आवडणारा, भावणारा असतो. गावागावातल्या छोट्या दुकानांतही त्यांच्या साबणाचा पुरवठा होत राहील अशी व्यापारी व्यवस्था बिनबोभाट, अव्याहतपणे चालू आहे. वर्तमानपत्रांत त्यांच्या मालाच्या प्रचंड आकाराच्या आकर्षक जाहिराती सारख्या झळकत असतात. चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय "चित्रातारकांच्या सौंदर्याचा साबण, त्यांच्या मृदू मुलायम त्वचेचे रहस्य....साबण" अशा जाहिराती वर्तमानपत्रांत गुळगुळीत कागदांच्या मासिकात, रेडिओवर, दूरदर्शनवर पाहाल तिकडे सतत झळकत असतात. एवढा खर्च करून हे कारखानदार वर भरमसाट फायदाही मिळवत असतात. हे काय गौडबंगाल आहे? कुटीरोद्योगांना त्यांच्या गचाळ साबणाचा धंदा सगळी सरकारी मदत घेऊनही फायद्याने करता येत नाही आणि सगळी वारेमाप उधळपट्टी करणारे कारखानदार फॅन्सी माल देतात आणि वर फायदाही कमवून जातात, हे त्यांना कसे काय जमते?
 चित्रतारकांच्या जाहिरातीचे रहस्य
 या रहस्यांचे उत्तर तंत्रज्ञानात आहे अशी माहिती एका तज्ञाने पुरवली. सोडा आणि तेल यांच्या मिश्रणाने साबण बनतो. कच्चा मालाच्या गुणवत्तेवर साबणाची गुणवत्ता अवलंबून असते; पण कारखानदारी प्रक्रियेत साबणाला रंग, सुगंध, आकार आणि गुळगुळीत कोरडेपणा देता येतो, त्यामुळे माल आकर्षक बनतो. एवढेच नव्हे तर तेल आणि सोडा यांच्या रासायनिक प्रक्रियेतून साबणाखेरीज जोड-उत्पादन म्हणून ग्लिसरिन काढता येते. कारखानदारांच्या साबणाची खर्चीक जाहिरात आणि त्यांचा फायदा याचे रहस्य ग्लिसरिनच्या जोड उत्पादनात आहे.
 वाळूचे तेल वर वाळूही
 साबणाचे आधुनिक कारखानदार तेलाच्या उत्पादनातही भाग घेतात. शेंगदाण्यातील बरेच तेल गावच्या तेलघाणीत फुकट जाते. तेलाच्या गिरणीतही बराच स्निग्धांश ढेपेत निघून जातो. आधुनिक तंत्रज्ञानात नायट्रोजन शेंगदाण्यात पुन्हा भरून बिनतेलाचा शेंगदाणा जसाच्या तसा पहिल्यासारखाच दिसणारा खारवण्यासाठी किंवा इतर चटपटीत पदार्थ तयार करण्यासाठी हाती येतो. हे तंत्रज्ञान वापरले नाही तर त्यात फायदा कुणाचा नाही? तेलघाणीवाल्यांचा नाही, गिरणीवाल्यांचा नाही आणि देशाचाही नाही.
 राष्ट्रीय नुकसान
 कारखान्यात ग्लिसरिन काढून घेतात, मग ग्रामोद्योगाच्या साबणाची जाहिरात 'ग्लिसरिनयुक्त साबण' म्हणून केली तर? ग्रामोद्योगाच्या साबणातील ग्लिसरिनमुळे त्वचा अधिक चांगली राहते. आरोग्य चांगले राहते, असे सागता आले तर? मालाची विक्री चांगली होईल. कारखानदारी साबणातून ग्लिसरिन काढून घेतलेले असते. आमच्या साबणात आम्ही ग्लिसरिन ठेवलेले आहे अशी जाहिरात करता येईल; पण येथेही अडचण आली!
 ग्रामोद्योग साबणात ग्लिसरिन राहतच नाही. ते वाहून जाते, गटारात जाते. कारखानदार ग्लिसरिन गटारात जाऊ देत नाहीत, ते वाचवतात, गोळा करतात आणि फायदाही कमावतात. एवढेच नव्हे तर गटारात वाहून गेले असते ते ग्लिसरिन वाचवून राष्ट्रीय अपव्यय थांबवतात. राष्ट्रीय साधनसंपत्तीत भर घालतात.
 अकार्यक्षम ते राष्ट्रहिताचे कसे?
 म्हणजे मोठेच त्रांगडे झाले! गावचा साबण दिसायला अमंगळ, स्वच्छता नावाचीच, रंग फार आल्हाददायक नाही आणि जरा भिजला, की चिखलासारखा मेंदा होणारा. शहरी कारखानदारी साबण गुणांनी चांगला आणि वर राष्ट्रीय संपत्तीही वाचवणारा. मग देशाच्या भल्याकरिता कुटीरोद्योगाचा साबण वापरा असे म्हणायचे कोणत्या आधाराने? गावच्या साबणाला संरक्षण दिले किंवा आंदोलन म्हणून शहरी साबणावर बहिष्कार घातला तर त्यामुळे सगळ्या राष्ट्राचे नुकसान आहे, हे नक्की. ग्लिसरिनच्या रूपाने इतकी संपत्ती गटारात वाहून जाणार!
 साबणाचा ग्रामोद्योग बुडाला तर त्यामुळे गावच्या उद्योजकांचे नुकसान होईल हे खरे; पण त्यामुळे देशाचा तोटा न होता फायदाच होणार आहे. अशा परिस्थितीत ग्रामोद्यागाचे हित वेगळे आणि राष्ट्राचे हित वेगळे असे कबूल करावे लागेल. कारखानदारी साबणामुळे गावची लक्ष्मी शहरात गेली असे म्हणणे चुकीचे. कारखान्याने नवी लक्ष्मी तयार केली. त्या लक्ष्मीचा वाटा गावकऱ्यांना मिळाला नाही, ही गोष्ट वेगळी.
 जे कार्यक्षम नाही ते कृत्रिमरीत्या टिकवले, वाढवले तर त्यात फायदा कोणाचाच नाही. संरक्षण देऊन ग्रामोद्योग टिकवले तर त्यात गावाचाही फायदा नाही, देशाचाही नाही. परदेशांतील आधुनिक तंत्रज्ञान नाकारून शहरातील जुन्या कारखानदारीला संरक्षण देणे यातही कोणाचाच फायदा नाही, हे ओघाने आलेच.

(२३ डिसेंबर १९९३)
■ ■