अन्वयार्थ - १/पङ्गुम् लंघयते गिरिम्


पङ्गुम् लंघयते गिरिम्


 क अगदी वेगळ्या प्रकारचे पुस्तक नुकतेच वाचनात आले. मराठीत अशी पुस्तके दुर्मीळ आहेत. म्हटले तर ही एक कादंबरी आहे; म्हटले तर एक कथानकही आहे; वेगवेगळी पात्रेदेखील आहेत; पण या कादंबरीत कथानकांनाही महत्त्व नाही. पात्रांनाही महत्त्व नाही. जन्मतः अपंग असलेल्या एका बाळाच्या आईच्या धडपडीची ही कहाणी आहे. लेखिका आहेत प्रभा घारपुरे. पुस्तकाचे नाव आहे 'साधना.'
 आपल्याला मूल व्हावे अशी सर्वच जोडप्यांची इच्छा असते; बहुतेकांची ती इच्छा पुरी होते. बहुतेक मुले अव्यंग जन्मतात. पाळण्यात पडल्यापडल्या बहुतेक मुले हातपाय हलवण्यापासून कुशीवर वळणे, रांगायला लागणे, उठून बसणे, पहिली पावलं टाकणे, चालणे अशी बाळाची पाहता पाहता झटपट प्रगती होत जाते. पडल्या पडल्या 'म मा बा बा' करणारे मूल म्हणता म्हणता चांगली वाक्ये बोलू लागते. जन्मतः एवढासा गोळा दिसणाऱ्या लहान बाळाचा हा विकास क्षणोक्षणी घडणारा चमत्कार आहे. कितीही वेळा त्याचा अनुभव घेतला तरी प्रत्येकवेळी अद्भुत वाटावा असा हा चमत्कार सगळीकडे सदासर्वकाळ घडत असतो.
 पण काही आईबापांचे भाग्य इतके थोर नसते. बाळाची प्रगती कौतुकाने, आनंदाने जोडीने पाहण्याचे त्यांच्यानशिबी नसते. काही बाळांमध्ये जन्मतःच दोष असतात, काहींना एखादा अवयवच कमी असतो. काही मतिमंद असतात. काहींच्या बाबतीत मेंदूच्या स्नायूंवरील नियंत्रण अपुरे असते. अशा बाळांना इंग्रजीत Cerebral Palsy किंवा थोडक्यात सी. पी. म्हणतात. 'साधना' ही एका आईची आणि तिच्या सी. पी. बाळाची कथा आहे.
 अपंग बाळाला कैदेची शिक्षा
 मला या एका आईच्या तपस्येत मन वेधून घेणाऱ्या अनेक बाबी दिसल्या. मूल अपंग जन्मले; त्याचे ओठ हलत नाहीत; तोंडातून सतत लाळ गळते; चेहऱ्यावर एक बावळटपणाचा भाव; हातपाय पाहायला गेले तर व्यंग असे काही नाही; पण त्याच्या हालचालीत एक काही विचित्र वेगळेपण, बाळाच्या सर्व हालचालीत त्या संतुलनाचा अभाव जन्मानंतर थोड्याच दिवसांत लक्षात येतो. आईचे सगळे प्रेमसुद्धा वर्षानुवर्षे प्राणांताने वाट पाहिली, ते आपलं बाळ अपंग आहे; हाय रे दैवा! आपल्याच नशिबी असे बाळ कां यावे? अशी वात्सल्य आणि दुरावा एकत्र असलेली आईची नजर त्या एवढ्याशा जीवाच्यासुद्धा पटकन ध्यानात येते. बापाची तर गोष्टच वेगळी. हसतेखेळते निरोगी बाळ असते तरी त्याचे न्हाऊन माखून झाले. तीट काजळ झाले, की बाळ पुन्हा दुपटे ओले तर करणार नाही ना? या चिंतेत बहुतेक बाप बाळांना जवळ घेतात. बाळ सी. पी. असेल तर मग विचारायलाच नको. अशा बाळांचे आपल्या सर्व महत्त्वाकांक्षावर तिलांजली सोडून सर्वस्व देऊन संगोपन करणारेही बाप नसतात असे नाही; पण ते अपवाद. बहुतेक पुरुषांना व्यंगाचे मूल डोळ्यासमोर देखील नकोसे वाटते. बाळाच्या आणि त्याच्या आईच्या भावनांचा विचार न करता ते त्याची उघडउघड हिडीसफिडीससुद्धा करतात. छोटे बाळ त्याच्या सगळ्या बौद्धिक कमजोरीच्या आरपारही हा दुरावा अचूक टिपते.
 सी. पी. बाळांच्या आईबापांच्या मनात एक अपराधीपणाची आणि न्यूनगंडाचीही भावना असते. आपल्यातील काही शारीरिक दोषांमुळे, कमतरतेमुळे बाळात हा दोष उतरला की काय? याची चिंता दोघांनाही लागते. आपल्या काही व्यसनांचा, बाळंतपणात केलेल्या औषधोपचारांचा परिणाम म्हणून बाळाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले काय? याची त्या दोघांनाही जिवघेणी रुखरुख लागलेली असते.
 सी. पी. बाळाचे आईवडील त्यामुळे बाहेर गेले तर बाळाला बरोबर कधी नेत नाहीत. आपले बाळ बघितले म्हणजे लोक आपल्याकडे विचित्र नजरेने पाहतात; आपली मनात कीव करतात. आपल्याला अपराधी मानतात या अनुभवाची त्यांना मोठी धास्ती वाटते. आजूबाजूला इतर मित्रमैत्रिणींची मुले हसून खेळून धिंगाणा घालत असताना आपले बाळ मात्र वेडेविंद्रे दिसते, तेव्हा त्याला बाहेर नेणेच नको म्हणून आईबाप, निदान आईतरी स्वतःला कोंडून घेते आणि बाळाला कोंडून ठेवते.
 बाळाचा शिक्षक-जग
 प्रभा घारपुरच्या 'साधना'मध्ये एक प्रयोग मोठ्या लक्षवेधीपणे मांडला आहे. अव्यंग जन्मलेले बाळसुद्धा वाढते कसे? हाडामांसाचा केवळ गोळा असलेले बाळ एक दिवस विश्वाला गवसणी घालणाऱ्या आईन्स्टाईनसारखे आणि चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या आर्मस्ट्राँगसारखे कसे बनते? बाळाचा विकास काही शिकवणीने होत नाही. दुपट्यात पडलेले बाळसुद्धा या जगात मी आलो आहे, मला हे जग समजून घ्यायचे आहे, हाताळायचे आहे अशा जिद्दीने हातपाय झाडीत असते. हाताच्या हालचालीची दिशा त्याला नेमकी ठरवता येत नाही. 'तान्ह्या बाळा तीट लावू' हे गाणे म्हणून बाळाला कपाळाच्या मध्यभागी तर्जनी न्यायला आईने शिकवले म्हणजे बाळाचा हात कधी टाळूवर तर कधी डाव्या-उजव्या कानापर्यंत जातो. समोर रंगीबेरंगी खेळणे ठेवले, की बाळ ते पकडू पाहते; जमत नाही; परत प्रयत्न करते आणि हातावर, पायावर, शरीराच्या सगळ्या अवयवांवर हळूहळू ताबा मिळवते. बोबड्या बोलण्यापासून ते लांबलचक वाक्यांपर्यंत फेक टाकण्याची प्रगती ते करू शकते. बाळाचा शिक्षक निसर्ग असतो. त्याला जितके फिरवावे, जग दाखवावे जितके ध्वनी; आवाज ऐकवावे, जितके स्पर्श अनुभवू द्यावेत, जितक्या चवींची रुची द्यावी, त्याच्याभोवती अनुभवांची जितकी संपन्नता तयार करावी तितकी बाळाची वाढ झपाट्याने होते.
 अपंगितांचा चालविता
 अव्यंग निरोगी बाळाच्या बाबतीत हे खरे आहे. जन्मजात व्यंग घेऊन आलेल्या बाळांना थोडेफार माणसाच्या बाळाप्रमाणे वाढायचे असेल तर इतर बाळांपेक्षा हजारोपट धडपड करावी लागते. समोर रंगीबेरंगी खेळणे ठेवले तर त्याला पकडण्याची कला इतर बाळांना दोन-चार दिवसांत साध्य होत असेल, तर दुर्दैवी सी. पी. बाळाला कदाचित सहा महिने, वर्ष लागेल. म्हणजे त्या बाळाला जग अधिक दाखवण्याची, वेगवेगळ्या गोष्टींची अधिक अनुभव, चव, गंध, स्पर्श याचा अनुभव देण्याची गरज असते. वेगवेगळे लोक पाहणे, बरोबरीच्या बाळाशी संबंध ठेवणे हे सी. पी. बाळाला इतर बाळांपेक्षाही आवश्यक असते आणि बाळाचे आईबाप त्यांच्या मनातील न्यूनगंडामुळे नेमकी ही अनुभवांची संपन्नताच त्याला नाकारतात. घरात पडून राहणारे, आईखेरीज दुसरा चेहरा दृष्टीला न पडणारे बाळ त्याच्या या कैदेमुळे अधिकाधिक अपंग बनत जाते. लेखिकेचा निष्कर्ष; आईबापांना सी. पी. बाळाला बाहेर नेण्याची कितीही लाज वाटत असो, आपल्या दुर्दैवी बाळाची मोठ्या माणसांनी, बरोबरच्या सवंगड्यांनी कुचेष्टा करू नये, बाळाचे त्या कुचेष्टेपासून संरक्षण करावे अशी त्यांची प्रेमापोटी इच्छा असते. जगाशी संपर्क तोडल्याने आईबाप बाळाचे नुकसान करतात.
 एक आई आणि तिचे बाळ. ते निरोगी असो, की व्यंगाचे असो, महत्त्वाचा धडा हा; बाळाला जग पाहू द्या, अनुभवू द्या. त्याला इजा होईल की काय? याची थोडीफार चिंता ठीक आहे; पण त्या चिंतेपोटी निरोगी बाळाला दुर्बळ बनवू नका आणि अपंग बाळाला आणखी अपंग बनवू नका.
 अर्थशास्त्र्यांना आईचा धडा
 आपला देश एक निरोगी बाळ आहे का? की सी. पी. बाळ आहे. या प्रश्नावर पुष्कळ वादंग घालता येईल. देश निसर्गतः संपन्न आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी; वेगवेगळे हवामान; मनुष्यबळ, एक दीर्घकालीन इतिहास... सगळे लाभलेला हा देश अपंग नाही, असेही म्हणता येईल. जाती, धर्म, भाषा, यांच्या भेदाभेदाने पिडलेला, शतकानुशतके वेगवेगळ्या आक्रमणांनी निर्बल झालेला; दारिद्र्यामुळे, निरक्षरतेमुळे, छित्रभिन्न झालेला असा आमचा देश एखाद्या सी. पी. बाळाप्रमाणे आहे असे कुणी म्हटले तर तेही फार चूक आहे असे म्हणता येणार नाही.
 आमचे बाळ अव्यंग आहे किंवा नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही. बाळ कसेही असो. निसर्गाने त्याला दिलेले गुण आणि दोष लक्षात घेता त्याचा जास्तीत जास्त परिपोष करण्याचा मार्ग त्याचा सगळ्या बाकीच्या जगाशी संबंध येऊ देणे हा आहे. जगाशी देवघेव थांबवून, व्यापार थांबवून, उद्योगधंद्यांना संशोधकांना संरक्षण देण्याचे निमित्त करून तुम्ही या बाळाला बंद खोलीत ठेवले, जगाच्या मोकळ्या वाऱ्यापासून आणि अनुभवाच्या विविधतेतून, नवनव्या तंत्रज्ञानापासून, विचारापासून, संशोधनापासून बाळाला वेगळे ठेवले तर ते निरोगी असले तरी अपंग होते. स्वातंत्र्यांनंतरच्या ५० वर्षांचा अनुभव हाच आहे. आईची बुद्धी दुष्ट होती असे कसे म्हणावे? आईची इच्छा बाळाच्या भल्याचीच होती; पण प्रेमापोटी तिने बाळाला अपंग बनवले, अशी उदाहरणे वास्तवातही आपण अनेक पाहतो. एक सुज्ञ आई बाळाच्या भल्याकरिता जे करते त्याचे सूत्र आमच्या पुढाऱ्यांना आणि शासनकर्त्यांना समजले असते तर आजची अवस्था आली नसती. प्रभा घारपुरेंच्या 'साधना'तील एक आईच्या धडपडीच्या या साध्या गोष्टीत एवढा मोठा आशय दडलेला आहे.

(२४ सप्टेंबर १९९३)
■ ■