अन्वयार्थ - १/माणसाचे श्रेष्ठत्व ठरविण्यासाठी वेगवेगळ्या मोजपट्ट्या


माणसाचे श्रेष्ठत्व ठरविण्यासाठी वेगवेगळ्या मोजपट्ट्या


 गभरातील पुराणांत, इतिहासात, कथा कादंबऱ्यांत अगदी लहान मुलांच्या परिकथांत राजाचा सर्वोच्च गुण म्हणजे शौर्य. राज्य मिळवायचे ते तलवारीच्या जोरावर, टिकवायचे ते बाहूच्या बळावर. जसजसा काळ लोटत गेला तसतसे राजा स्वतः शूर योद्धा असला पाहिजे अशी आवश्यकता राहिली नाही. सैन्य बलाढ्य असले म्हणजे राजयक्ष्म्याने अंथरुणाला खिळलेला पेशवासुद्धा दरारा गाजवू लागला. सैन्यप्रमुख मानला जाऊ लागला. राजाची जागा लोकतांत्रिक अध्यक्षांनी आणि पंतप्रधानांनी घेतली तसे सैन्याने राजकारणात लुडबूड करू नये, जो कोणी सत्ताधीश असेल त्याच्या आज्ञा मुकाट, बिनबोभाट पाळाव्या असा संकेत पडला; पण त्या देशांची संख्या अल्पमतात आहे. "राजकीय सत्ता तोफेच्या नळीतून येते," या माओच्या वाक्याचा आजही अंमल आहे.
 अगदी किरकोळ देशातील पोलिस स्वयंचलित अत्याधुनिक शस्त्रे घेऊन फिरतात; लंडनचा 'बॉबी' अजूनही हातात फक्त दंडुका घेऊन फिरतो. फरक प्रतीकांचा आहे; शासनाच्या मागे सामर्थ्य शस्त्राचे आहे. ते शस्त्र बाहेरील शत्रूविरुद्ध वापरता येते, तसेच देशात कोणी बंडावा पुंडाई केली तर त्याला शिस्तीत आणण्याकरिता वापरले जाते.
 सम्राट,शस्त्रे आणि शास्त्रे
 ताकदीचा वापर करून ऐतिहासिक व्यक्ती सत्तेवर आल्या; त्यांनी राज्ये स्थापली. शस्त्रांच्या ताकदीचा उपयोग राजघराण्यांनी केला; धर्मप्रसारकांनी केला, साम्राज्यवाद्यांनीही केला, समाजवाद्यांनीही केला. माणसाच्या अंगच्या पराक्रमापेक्षा त्याच्या हातातील हत्यार महत्त्वाचे असते हे स्पष्ट झाल्यावर अंगच्या शौर्यापेक्षा शस्त्रे आणि अस्त्रे तयार करण्याचे तांत्रिक आणि आर्थिक सामर्थ्य महत्त्वाचे ठरते. सत्ता शस्त्रांचीच; पण शस्त्रे चालविणाऱ्या अधड सैनिकांच्या हाती नाही. शस्त्रे तयार करणाऱ्या सगळ्या आर्थिक-सामाजिक व्यवस्थेच्या हाती गेली. युद्धांवर अर्थकारणाने वर्चस्व बसवले.
 टका सेर भाजी, टका सेर खाजा
 अजूनही आफ्रिका, दक्षिण अमेरिका अशा खंडांतील अनेक देशांत हे घडते. लष्करातील कोणी अधिकारी उठतो; राजधानीच्या रस्त्यातून रणगाडे फिरवतो आणि केवळ शस्त्राच्या जोरावर सत्ता हाती घेतो. शस्त्र एवढेच त्याच्या सत्तेचे समर्थन. सुसंस्कृत देशात शस्त्राने सत्ता मिळत नाही. ठरावीक कालावधीकरिता सत्ताधारी निवडले जातात. निवडणुकीत मतपेट्या पळविण्यासाठी, मतकेंद्र हातात घेण्यासाठी, एखाद्या उमेदवाराला संपविण्यासाठी इत्यादी इत्यादींसाठी शस्त्रांचा वापर होतो. निवडणुकीत लोकांची दिशाभूल करण्यासाठी, 'गरिबी हटाव'सारख्या घोषणांपासून 'अयोध्या मंदिरापर्यंत' दुष्ट प्रकार केले जातात; पण शेवटी निर्णय मतपेटीत पडलेल्या मतपत्रिकांच्या मोजणीने ठरतात. राजकीय सत्ता कोणाच्या हाती असावी हे ठरविण्यात कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. सैन्याच्या सरसेनापतीने मनात आणले तर सगळी सत्ता तो काबीज करू शकतो; पण मतपेटीसमोर गेल्यावर त्याला मत एकच, रस्त्यावर भीक मागत फिरणाऱ्या बेकार, अशिक्षितालाही एकच मत, महाप्रकांड विद्वानालाही एकच मत, सौंदर्याला प्रतिभेच्या स्पर्शाने मूर्तरूप देणाऱ्या कलाकारालाही एकच मत.
 "शंभरात एक माणूस शूर निपजतो; हजारात एक पंडित, दहा हजारात एखादा वक्ता जन्मतो. दानशूर क्वचितच जन्माला येतो." असे संस्कृत वचन आहे. मतपेटीसमोर शूर, पंडित, वक्ते, दानी सारे एकसारखे. मतपेटीसमोर येण्याआधी आपल्या अंगच्या गुणांनी इतर मतदात्यांना आपल्या इच्छेप्रमाणे मते वापरू शकतात; पण एकच धनुष्य, तलवार, तोफेची नळी या सगळ्यांची जागा मतपत्रिका घेत आहे. ज्याला जास्त मते मिळतात त्याच्या हाती सत्ता अशी ही साधी सोपी पद्धत आहे.
 अर्थस्य पुरुषो दास
 राजकारणावर अर्थकारणाने ताबा मिळविला आहे, केवळ शस्त्रे उत्पादन करण्याच्या शक्तीमुळे नाही. लढाया रणांगणापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. सैन्यातील जवानाइतकीच शत्रूच्या हल्ल्याचा धोका सामान्य नागरिकालाही आहे. सैन्याची ताकद केवळ शस्त्राच्या ताकदीवर व पल्ला यांवर न ठरता लष्कराच्या मागे उभ्या असलेल्या वाहतूक, संचार, खानपान, साधने इत्यादींवर ठरते. अर्थप्रबळ राष्ट्र हेच शस्त्रप्रबळ ठरू लागले. 'सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते' असे उपरोधाने का होईना लिहिणाऱ्या कवीने, "जो श्रीमंत तोच कुलीन, तो विद्वान, तोच सुंदर ठरतो," असे म्हटले; पण श्रीमंत शूर ठरतात असे नाही म्हटले. आताच्या जगात श्रीमंत हाच शूरही ठरतो. उपरोधाने नव्हे तर खऱ्याखुऱ्या अर्थाने. ज्याच्याकडे संपत्ती तोच कला, साहित्य, विज्ञान आणि साहजिकच राजनीतीवरही प्रभाव पाडतो.
 संपत्तीची फूटपट्टी
 अर्थकारणातील सत्ता कोणाच्या हाती? प्रचंड मोठ्या व्यक्तिगत भांडवलदारांचे दिवस संपले. कंपन्यातील भागधारक आपल्या मतांनी अर्थकारण चालवितात; पण अर्थकारणातील मतदानात सरसकट दरडोई एक मत अशी पद्धत नाही. ज्याच्या हाती जितके समभाग त्या प्रमाणात त्याची मतदानाची ताकद कंपनीच्या सर्वसाधारण सभेत सगळी सभा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एकटादुकटा भागधारक असे चित्र दिसले, तरी प्रत्यक्ष मतदानात एकटा-दुकटा भागाधारक जिंकू शकतो. राजकारणात (साहजिकच सहकारात) डोकी मोजून निर्णय होतो. अर्थकारणात निर्णयाचे बरेवाईट परिणाम ज्याला जितके भोगावे लागणार त्या प्रमाणात त्याचा निर्णयावर अधिकार ठरतो.
 साहित्य, कला, विज्ञान वेशीबाहेर
 विद्वान, कलाकार, शास्त्रज्ञ इत्यादी दुर्मीळ गुणवानांना त्यांच्या खास क्षेत्राबाहेर सर्वसाधारण समाजात विशेष मान नसावा हे समजण्यासारखे आहे. आपल्या तपस्येच्या, व्यासंगाच्या, स्वरांच्या, सुरांच्या आणि रंगाच्या ब्रह्मानंदी कैफात आकंठ बुडालेल्यांना राजदंडाचे किंवा अर्थसत्तेचे काय सोयसुतक असायचे? "तू भला धनवान असलास तरी मीही शास्त्रवेत्ता आहे; तू लढाईत जिंकतोस तर मी वादविवादात; तुझ्याकडे नोकरचाकर असतील तर माझीही शिष्यपरंपरा आहे. तू मला मानत नसशील तर मीही तुला तुच्छ मानून निघून जातो." अशी निःस्पृहता भर्तृहरीसारखे विद्वान दाखवीत. आता ही जात शिल्लक नाही. ही गोष्ट अलहिदा.
 शापादपि शरादपि
 शस्त्रे कारखान्यात तयार होतात; पण त्यामागील विज्ञान संशोधकांचे आणि वैज्ञानिकांचे असते. कारखानदारांनी राजकारणावर मात केली खरी; पण अजून वैज्ञानिकांनी कारखानदारांवर मात केलेली नाही. अणुबॉम्ब तयार करण्याची शक्यता दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्पष्ट झाली तेव्हा राजकारण्यांच्या हाती असले भयंकर अस्त्र येऊ नये असे प्रयत्न काही वैज्ञानिकांनी एकत्र येऊन केले; पण सफल झाले नाहीत. वैज्ञानिकांचा लढा आजही जास्तीत जास्त बौद्धिक संपदेच्या हक्काकरिता आहे. समाजातील सार्वभौम सत्ता हाती घेण्याचे त्यांच्या मनाला अद्याप शिवलेलेही नसावे. जेम्स बाँडसारख्या कादंबऱ्यांत एखाद्या अफलातून शोधामुळे, जगातील सर्व सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणारा खलनायक दाखविला जातो. उद्या कदाचित महाभयानक अस्त्र-पृथ्वीचा विनाश करण्याची ताकद असलेले अस्त्र हाती असलेला कोणीही शास्त्रज्ञ सर्व पृथ्वीचे अपहरण करू शकेल.
 काठीने म्हैस आणि मान्यता
 प्लेटोने तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्यावर राज्यपद मिळालेल्या तत्त्वज्ञाची कल्पना मांडली होती. विद्वान आणि वैज्ञानिक यांच्या हाती सत्ता पुढेमागे येईलही; पण ती हिंसाचार करण्याच्या त्यांच्या ताकदीने येईल, व्यासंगाच्या आणि संशोधनाच्या तपस्येमुळे नाही.
 राजकारणात शिरगणती; अर्थकारणात संपत्ती अशा लहानमोठेपण ठरविण्याच्या साध्या-सोप्या आणि निश्चित फूटपट्ट्या आहेत. विद्वता, विज्ञान, कला या क्षेत्रात काही फूटपट्ट्या असल्या तर त्या स्पष्ट नाहीत. विद्यापीठाचे कुलगुरू विद्वत्तेच्या आधाराने ठरतात असे स्वतः कुलगुरूही म्हणणार नाहीत. राजकीय सत्तेचा आणि धन सामर्थ्याचा उपयोग यांच्या आधारानेच विद्वान श्रेष्ठ ठरतात. लेखककवींचे कंपू बसतात. निवडणुकांची राजकारणे करतात. लेखक मोठा कोण? कवी मोठा कोण? हे ठरवायचे कसे? सरकारी पाहितोषकांच्या रूचीने? पारितोषके आणि खप, मागणी आणि रसिकांची गर्दी या फूटपट्ट्या राजकारण आणि अर्थकारण या क्षेत्रातील आहेत. साहित्य, संगीत, कला, मागणी आणि रसिकांची गर्दी या फूटपट्ट्या राजकारण आणि अर्थकारण या क्षेत्रांतील आहेत. साहित्य, संगीत, कला, विज्ञान क्षेत्रांतील नाहीत. या गुणवाणांना समाधान देणारी दाद दुसऱ्या गुणवंतांची; पण त्या दादीने भाकरी मिळत नाही; रेफ्रिजरेटर आणि गाडीतर नाहीच नाही! विद्यापीठात कला, विज्ञानासंबंधी संस्थांत त्यांची त्यांची स्वतंत्र्य सार्वभौम सत्ताकेंद्रे तयार करायची म्हटली तर निवड कोणत्या निकषाने व्हायची हे ठरणेच कठीण आहे.
 मनुष्य अजूनही रानटी आहे. ज्याच्या हाती काठी त्याची म्हैस हाच नियम सगळीकडे लागू आहे. काठी पूर्वापारपासून शस्त्रधाऱ्यांच्या हाती राहिली, आता ती उद्योजकांच्या हाती राहिली, उद्या वैज्ञानिकांच्या हाती जाईल. श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी म्हशीहाक्याची काठी हातात घेणे एवढा एकच मार्ग असेल तर ते मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

(८ जुलै १९९३)
■ ■