अन्वयार्थ - १/रशियात आता फॅसिझम लोकप्रिय


रशियात आता फॅसिझम लोकप्रिय


 शियात नव्या हिटलरचा उदय होणार अशी भीती वाटतच होती. जवळजवळ अर्धे शतक महासत्ता म्हणून मिरवलेले एक राष्ट्र सहजासहजी तिसऱ्या जगातील गरीब राष्ट्रांच्या पंगतीला जाऊन उभे राहील हे कसे शक्य आहे? प्रचंड चलनवाढीमुळे सगळी जीवनमूल्यं निकालात निघाली आणि भल्या घरच्या मुलामुलींनाही अनैतिकतेचा आधार घेतल्याखेरीज जगता येत नाही, अशी परिस्थिती तयार झाली, की त्यातून एखाद्या हिटलरच्या उदय होतोच. १९३०च्या आसपास जर्मनीत हेच घडले आणि आज रशियात पुन्हा तेच घडत आहे.
 राष्ट्राध्यक्षाच्या हाती सर्व सत्ता एकवटणारी घटना रशियन जनतेने मान्य केली आहे; पण निवडणुकांत मात्र सर्वांत मोठा पक्ष म्हणून येल्तसिन यांचा पक्ष पुढे आला नाही, बहुमत मिळाले नाही तरी सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आला तो झिरिनॉव्सकी यांचा 'फॅसिस्ट' तोंडवळ्याचा पक्ष. राष्ट्राध्यक्षांच्या हाती नव्या घटनेने सोपवलेले सर्वाधिकार येल्तसि पेक्षां झिरिनॉव्सकी यांच्या उपयोगाचे होतील अशी लक्षणे आहेत.
 पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना...
 रशियाचा एकूण इतिहासच असा आहे, की लोकशाही व्यवस्था तिथे टिकणे कठीण.
 तिथल्या जमिनीत लोकशाहीचे बियाणे रुजत नाही आणि अंकुरतही नाही. समाजवादी म्हणवणारी पहिली क्रांती लोकशाही परंपरा नसलेल्या रशियात झाली म्हणून साम्यवादाला विक्राळ 'स्टॅलिनी' स्वरूप आले. शतकानुशतके झार सम्राटांच्या गुलामगिरीची परंपरा असलेल्या देशात 'नाही रेची हुकूमशाही' या कल्पनेची विटंबना झाली. 'हुकूमशाही' तेवढी राहिली. 'नाही रे' बिचारे पुन्हा गुलामच राहिले, मार्क्सच्या अनुमानाप्रमाणे पहिली समाजवादी क्रांती इंग्लंड किंवा जर्मनी या औद्यागिकदृष्ट्या प्रगत भांडवलशाहीची देशांत व्हायला पाहिजे होती. प्रत्यक्षात ती उपटली रशियासारख्या भांडवलशाही ओळखही न झालेल्या सरंजामशाही देशांत. साहजिकच नावापुरता समाजवादी झेंडा फडकला; पण अंमल आला क्रूरकर्मा हुकूमशहाचा. पहिली क्रांती १९१७ साली रशियात व्हायच्या ऐवजी जर्मनीत झाली असती तरी फारसा फरक पडला नसता. जर्मन राष्ट्राचा इतिहास लष्करी एकाधिकारशाहीचा आहे. हिटलर 'जर्मन स्टॅलिन' म्हणून सर्वसत्ताधीश बनला असता एवढाच काय तो फरक इंग्लंमध्ये क्रांती ही असंभव घटना आहे. तेथे ती घडलीच असती तर साम्यवादाचे स्वरूप सौम्य लोकतांत्रिक झाले असते किंवा नाही याबद्दल विद्वानांत मोठे वादविवाद आहेत; पण इंग्लंडमध्ये 'स्टॅलिनावतार असंभव आहे.
 विदूषक ठोकशहा
 हिलटरचा उदय झाला तेव्हा भल्या- भल्या जाणकारांची प्रतिक्रिया हिटलर एक विनोदी प्रहसनातील पात्र आहे अशी होती. एवढीशी मूर्ती कपाळावर लोंबणारे केस, नाकाखाली दोन बोटी मिशा एवं गुणविशिष्ट हुकूमशहा चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटाचा योग्य विषय होता; पण असल्या विनोदी पात्रातून भस्मासुर कधी उद्भवेल ते सांगता येत नाही. हुकूमशहा कोणी मोठा सामर्थ्यशाली, कर्तबगाार, बुद्धिमान, दूरदर्शी अशा गुणांनी युक्त नसतो. त्याला थोर नेता किवा हृदयसम्राट मानणारे लोक मिळतात याचा संबंध हुकमशहाच्या गुणांशी कणमात्र नाही. चांभारकाम, सुतारकाम, चित्रकार असल्या किरकोळ व्यवसायांतील सामान्य माणसे प्रसंग आला म्हणजे हुकूमशहाच्या रूपात प्रकट होतात. हुकूमशहांची मान्यता त्यांच्या गुणांवर अवलंबून नसते. लोकांच्या खऱ्या आणि मानसिक गरजांतून ती तयार होते. तरुण- तरुणी प्रेमात पडतात आणि प्रिय व्यक्ती कोणी स्वर्गातून उतरलेली सर्व गुणांची खाण आहे असे त्यांना वाटते. प्रत्येक प्रिय व्यक्ती अशी स्वर्गीय गुणांची थोडीच बनलेली असते? प्रेमात पडण्याची गरज तयार झाली, की गर्दभीसुद्धा अप्सरा वाटू लागते. तसेच आपला काही मानभंग झाला आहे अशी समज झालेला समाज कोणाही पागलाच्या मागे जाण्यास सहज तयार होतो. दुखावलेल्या अस्मितेला कुंकर घालून, "आपले राष्ट्र थोर, आपला वंश थोर, आपला धर्म थोर आणि त्याबरोबरच दुसरी एखादी जमात दुष्ट, नीच, आपल्या सगळ्या दुर्दशेला जबाबदार ती जमात," असा बेभान आरोळी ठोकणारा कोणीही पागल काही काळ का होईना हुकूमशहा बनू शकतो. कोणी आर्यवंशाच्या श्रेष्ठतेची द्वाही फिरवतो, कोणी हिंदुत्वाची, रशियात झिरिनॉव्सकीरशिन राष्ट्राच्या अस्मितेची आणि सन्मानाची गर्जना करीत आहे.
 शिवाजी पार्की गर्जना
 "माझ्या हाती सत्ता आली तर कोणताही प्रश्र वर्षभरात सोडवन दाखवतो" ही या सर्व मर्कटपात्रांची खास शैली. झिरिनॉव्सकी यांची काही आश्वासने याच मासल्याची आहेत.
 "मी केवळ ७२ तासांत रशियाची अन्नधान्य समस्या सोडवीन. पूर्व जर्मनीमध्ये १५ लाख रशियन घुसवावेत, जरूर तर अण्वस्त्रांचा वापर करून तेथील उभी पिके कापूस आणण्याची मी त्यांना मोकळीक देईन , आंतरराष्ट्रीय संकेत आणि कायदा यांची मी पत्रास बाळगत नाही."
 "अन्य देशांबरोबर सरळ अण्वस्त्रांची लढाई करावी लागली तरी काय हरकत आहे? दोन्ही बाजूंची धूळधाण झाली तरी मला पर्वा नाही."
 "मला रशियाचे म्हणजे 'स्लाव'वंशीयांचे साम्राज्य उभे करायचे आहे." स्वतःची ही असली निरर्गल वक्तव्ये, आपली स्वतःची ठोकशाही प्रस्थापित करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पात्राप्रमाणे झिरिनॉव्सकी करत असतो.
 "संपकऱ्याला खडी फोडायला पाठविणे," "रशियातून फुटू पाहणाऱ्या प्रदेशांना भुके मारीन," "मी जगन्नियंता आहे," "क्रूर हुकूमशहा आहे, हिटलटरच्या पावलावर पाऊल ठेवून जुन्या रशियाच्या हद्दींना भिडणारे साम्राज्य मला तयार करायचे आहे..." इ. ही असली बडबड आणि हा सर्व प्रकार आज विनोदी वाटेल; पण जगाने पूर्वी कधी ना पाहिला, ना ऐकला अशा महाभयानक हिटलर'चा उदय रशियात होतो आहे, ज्याच्यापुढे स्टॅलिन हा 'गोंडस वाटावा असा नवा हुकूमशाहा.
 सुपर-हिटलचा उदय
 जर्मनीचा पहिल्या महायुद्धात पराभव झाला. व्हर्सायच्या तहात त्याच्यावर अत्यंत कठोर अटी लादण्यात आल्या, आर्थिक व्यवस्था मोडून गेली. प्रचंड चलनवाढ झाली, त्यातून हिटलर निघाला. जर्मनीसारख्या कष्टाळू उद्योगप्रिय, संशोधक शिस्तप्रिय लोकांच्या देशातही हिटलर तयार झाला. उद्योजकता ही रशियास अनोखी असलेली चीज आहे. वरून कोणीतरी हुकूम सोडावा, आपण त्याची इमानेइतबारे अमलबजावणी करावी, या मोबदल्यात मालकाने आपल्या पोटापाण्याची आणि निवाऱ्याची सोय करावी ही सामान्य रशियन माणसाची अपेक्षा, मग मालक झार असो की कमिसार.
 स्वातंत्र्याची गोडी निर्माण होण्याइतकी त्याची चव रशियन लोकांना कधी चाखायला मिळालेलीच नाही. आपण होऊन काही उत्पादन करावे ही कल्पनाच रशियन व्यवस्थेत दुरापास्त वाटते. हिंदुस्थानसारख्या गरीब देशातही शहरातील दुकाने मालाने भरून वाहत असतात, याचे येथे येणाऱ्या रशियन प्रवाशांना मोठे आश्चर्य वाटते. व्यवस्था ढासळलेली आणि नवीन व्यवस्थेकरिता लागणारे जर्मन, गुण अभावानेच तळपणारे... अशा परिस्थितीत हुकूमशहा येणे आणि तो हिटलरपेक्षाही भयानक असणे अपरिहार्य आहे. हातात अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे, असलेला रशियन सुपर हिटलर म्हणजे पृथ्वीचा नाश करणारा कल्की होऊ शकतो.
 रशियातील निवडणुकांतील फॅसिस्टांची सरशी झाली त्यापेक्षाही विशेष गोष्ट म्हणजे साम्यवादी पक्षांची डाळ फारशी शिजली नाही. हुकूमशाही चालेल; पण अर्थवादी हुकूमशाही उपयोगाची नाही. एवढे रशियन नागरिकांना ८० वर्षांच्या अनुभवाने पुरेपूर उमजले आहे. कदाचित राष्ट्रवादी किवा वंशवादी हुकूमशही आली तर आपले भाग्य फळफळेल अशी निदान कल्पना करण्यात त्यांना आनंद वाटतो. लोकशाही व्यवस्थेत, बाजारपेठेच्या आधाराने, उत्पादन आणि उद्योजक यांच्या कर्तबगारीने खुली व्यवस्था उभी करण्यासाठी एक संयम लागतो. एक चरित्र लागते. मनाची एक शिस्त लागते, दीर्घकाळ कणाकणाने आणि क्षणाक्षणाने प्रयत्न करण्याची जिद्द, चिकाटी लागते. अशा गुणसमुच्चयातून थोर राष्ट्रे बनतात. इतर लोकांना भेटतात 'हिटलर', स्टॅलिन यांच्यासारखे हृदयसम्राट.
 साम्यवाद्याचे प्रचारतंत्र अबाधित
 इतिहासाची पुनरावृती होताना काही विनोदी प्रकार जवळजवळ जसेच्या तसे पुन्हा घडतात. हिटलरचा उदय होत असताना जर्मनीतील समाजवादी कॉम्रेड समाजवादी व्यवस्थेचे तुणतुणे वाजवत राहिले. शेवटी हिटलरने त्यांचा समूळ नि:पात केला. आजच्या रशियातील साम्यवादी पुन्हा तोच कित्ता गिरवीत आहेत. अजूनही सजाजवादी अर्थव्यवस्थेचे तुटकेमोडके समर्थन येणकेण प्रकारे करण्यात ते गर्क आहेत. रशियन लालभाईंचा युक्तिवाद चालूच आहे. रशियन साम्यवादाचा पाडाव झाला खरा; पण तो आर्थिक कमजोरीने आणि अपयशाने नाही . रशियन अर्थव्यवस्था चांगली चालली होती. राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीची रशियन गती अमेरिकन गतीपेक्षा सातत्याने वरचढ राहिली. दुसऱ्या महायुद्धापासून ते थेट १९८१ पर्यत रशियन अर्थव्यवस्था भरभराटीत होती. अमेरिकन व्यवस्थपेक्षा सरस होती, असे जे जगाला आणि स्वतःलाही पटवू पाहत आहेत, जडजंबाल आकडेवारीने सिद्ध करू झाल्यापासून उत्पादन घटते आहे. रशियात पाडाव झाला तो समाजवादाचा नाही. समाजवादी व्यवस्थेची पुन्हा एकदा प्रतिष्ठापना करायला पाहिजे, असा त्यांनी धोशा चालवला आहे.
 आकडेवारीचा धादांत असत्ये मांडण्यासाठी उपयोग करणे या कलेचा उगम हिटलटरशाही 'गोबेल्स'ने केला, स्टॅलिन काळात या कलेचा 'सुवर्णकाळ आला. मनःपूर आकडे मांडावेत, सोयीस्कर तेवढेच आकडे द्यावेत, शक्यतो टक्केवारीत बोलावे, मूळ आकडे सांगूच नयेत. हे सर्व साम्यवाद्यांचे खास कसब ! त्यांच्या कसबाने जग कधी फसले नाही, फसले ते फक्त साम्यवादीच. कोंबडे झाकून ठेवले म्हणजे सूर्य उगवायचा राहत नाही. रशियातील सत्यस्थिती किती विदारक होती हे लपवण्याचा प्रयत्न निष्फळ झाला आणि सर्व व्यवस्थाच ढासळली; तरीही रशियन साम्यवाद्यांना ना उमज पडली, ना समज!
 केवळ प्रार्थनाच
 साम्यवादी हुकूमशाही परत आणू पाहणारे एका बाजूला, 'फॅसिस्ट' हुकूमशाहीचा झिरिनॉव्सकी भस्मासुर दुसऱ्या बाजूला. आधुनिक सुसंस्कुत लोकशाहीवादी रशियाच्या उदयाचा काळ वाटतो तितका जवळ नाही. रशियन जनतेने अनेक दुःखं भोगली, वर्षानुवर्षे सोसली. झारशाही पाहिली असीम क्रूर जमीनदारी पाहिली , स्टॅलिनच्या सामुदायिक कत्तली सहन केल्या, जर्मन आक्रमणाला तोंड दिले. अजून त्यांना काय काय सोसावे लागणार आहे, कोणास ठाऊक? त्या सर्व रशियन भावाबहिणींकरिता प्रार्थना करण्यापलीकडे आपल्या हाती काहीच नाही.

(१४ जानेवारी १९९४)
■ ■