अन्वयार्थ - १/वेदान्ताचे अर्थशास्त्र


वेदान्ताचे अर्थशास्त्र


 काही वर्षांपूर्वी 'हिंदू विकासाची गती' हा शब्दप्रयोग लोकप्रिय झाला होता. अगदी गलथान परिस्थितीतही ती वाढ होते - ३.५% च्या आसपास ती हिंदू विकासाची गती! या गतीचा आणि हिंदुस्थानचा तसा काही संबंध नाही.
 आजकाल हिंदू अर्थशास्त्राबद्दल ऐकू येते. देवळापलीकडे आपल्याला काही समजते हे दाखवण्यासाठी भाजप नेते काही अडगळीत पडलेल्या अर्थशास्त्रज्ञांकडून 'हिंदू अर्थशास्त्र' या विषयावर चोपडी लिहवून घेत आहेत. जन्माने हिंदुत्व आणि केवळ मास्तरकीच्या अधिकाराने अर्थशास्त्र एवढ्या भांडवलावर अर्धा डझन विद्वान 'हिंदू अर्थशास्त्रज्ञ' बनले आहेत. दक्षिणा देईल त्याचा जयजयकार करण्याच्या ब्राह्मणी परंपरेत हे ठीक बसते.
 हिंदू अर्थशास्त्रातील चोपड्यात वेदांतील अवतरणे, चार्वाकाच्या अर्थशास्त्रातील संदर्भ यांच्या भरताडाखेरीज काही सिद्धांत औषधालाही सापडत नाही. हिंदू अर्थशास्त्राचा सैद्धांतिक आधार वेद का उपनिषेद? या प्रश्नाचा निर्णय प्रथम व्हायला पाहिजे.
 कूपमंडुक वेद
 वेदांना मानणाऱ्या लोकांना कोणी 'मूढ' म्हटले किंवा वेदांची तुलना छोट्याशा आडाशी केली तर असे बोलणारा कोणी तरी हिंदुद्वेष्टा नीच मनुष्य असेल असा समज हिंदुत्वावाद्यांचा होईल आणि ते अशा लेखकाचा 'सलमान रश्दी' किंवा 'नसरीन' करता येईल की काय अशा प्रयत्नास लागतील.
 पण ही वचने कोणा धर्मद्वेष्ट्याची नाहीत; कोणा म्लेंच्छाची नाहीत, कोणा यवनाची नाहीत, ही अवतरणे सर्व हिंदू धर्मीयांना परमपूज्य असलेल्या श्रीमद् भगवद गीतेतील आहेत. विनाकारण वाद नको म्हणून गीतेतील संबंधित श्लोकांची लोकमान्य टिळकांनी केलेली भाषांतरे खाली देत आहे.
 हे पार्थ! (कर्मकांडात्मक) वेदांतील (फलश्रुतीच्या) वाक्यांना भुललेले व त्याखेरीज दुसरे काही नाही असे म्हणणारे मूढ (जे) लोक फुलवून असे भाषण करतात, की - २.४२ हे अर्जुना! (कर्मकांडात्मक) वेद (अशा रीतीने) त्रैगुण्याच्या गोष्टींनी भरलेले असल्यामुळे तू निस्वैगुण्य म्हणजे त्रिगुणातील, नित्य, सत्त्वस्थ, सुखदुःखादी द्वंद्वापासूनच अलिप्त आणि योगक्षेमादि स्वार्थात न गढता आत्मनिष्ठ हो - २.४२ चोहोकडे पाण्याचा पूरच झाला असता विहिरीला जितका अर्थ किंवा प्रयोजन राहते (अर्थात काहीच काम राहत नाही) तितकेच ज्ञान प्राप्त झालेल्या ब्राह्मणला सर्व (कर्मकांडात्मक) वेदांचे प्रयोजन असते (म्हणजे नुसत्या काम्यकम्यकर्मरूपी वैदिक कर्मकांडाची त्याला अपेक्षा राहत नाही.)
 - (नाना प्रकारच्या) वेदवाक्यांनी गांगरून गेलेली तुझी बुद्धी जेव्हा समाधिवृत्तीत स्थिर व निश्चिंत होईल, तेव्हा (हा साम्यबुद्धिरूप) योग तुला प्राप्त होईल २.५३.
 श्रीमद् भगवद गीता ब्रह्मविद्येच्या योगशास्त्रातील कृष्णार्जुन संवादाच्या रूपाने सांगितलेले उपनिषद आहे. उपनिषदात वेदांचा धिक्कार असेलच कसा? असा वाद राजकारणी हिंदुत्ववादी घालतील. धर्मशास्त्रातील जाणकारांना त्याबद्दल आश्चर्य वाटणार नाही.
 रानावनात फिरणाऱ्या पशुपालन आणि शेतीवर जगणाऱ्या आर्य टोळ्यांचे वेद हे ग्रंथ आहेत. जीवन सुलभ करणाऱ्या निसर्गातील वेगवेगळ्या देवतांना प्रमुख विषय आहे. वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी त्यात कर्मकांड सांगितले आहे. संघ, गण, राष्ट्र अशा समुदायांच्या श्रेष्टत्वाचे गुणगान वेदविचारात आहे.
 पिंडी तेच ब्रह्मांडी
 याउलट उपनिषदांची उत्पत्ती आर्यांची वस्ती हिंदुस्थानात स्थिरावल्यानंतर झाली आणि उपनिषदांच्या विचारांवर एतद्देशीय 'लोकायत' तत्त्वज्ञानाचा प्रभाव वेदांपेक्षा अधिक आहे. उपनिषदांत सांगितलेल्या तत्त्वज्ञानाला वेदांत म्हणजे वेदांचा अंत करणारे किंवा वेद जेथे संपतात तेथे ज्याची सुरुवात होते ते, असे नाव आहे.
 अनंत विश्व ज्याने व्यापले आहे, ते अविनाशी आहे, ते सतत रूप बदलते; पण नष्ट होत नाही, हे वेदान्तातील तत्त्व आधुनिक विज्ञानाशी सुसंगत आहे. 'अहं ब्रह्मोऽस्मि' म्हणजे कोणताही प्राणिमात्र आणि विश्व यांच्यातील अभिन्नता मानणारा हा विचार वेदान्ताचा पाया आहे.
 आचार्य विनोबा भावे यांनी हिंदू शब्दाची व्याख्या करताना 'हिंदू वेदांना मानणारा असावा' ही महत्त्वाची अट घातली. उपनिषदांना मानणारांना किंवा वेदोपनिषदांना मानणारांना असे म्हटले नाही. वेद आणि वेदान्त यातील स्पष्ट विरोध आचार्यांना मान्य होता हे उघड आहे. 'वेदोपनिषद' असा समास सर्रास वापरला जातो; पण हा समास 'रामलक्ष्मण' या जातीचा नाही, 'रामरावण' या प्रकारचा आहे. वेदातील विचार आणि वेदान्त तत्त्वज्ञान यांतील फरक आणि विरोध याबद्दल चिडीचूप मौन बाळगण्याचे एक व्यापक कारस्थान शतकानुशतके चालत आले आहे.
 वेदान्ताची वाढती मान्यता
 वेदान्त तत्त्वज्ञानाची मान्यता वाढत आहे. आधुनिक विज्ञान, विशेषतः क्वांटम (Quantum) सिद्धांत आणि त्यानंतरचे संशोधन वेदान्ताची पुष्टी करणारे आहे. सकल विश्वाच्या स्वरूपाचे आकलन सांगणारे तत्त्वज्ञान म्हणून उपनिषदांची मान्यता आहे. याउलट वेदांचे स्थान आर्य समाजाच्या एका विशिष्ट अवस्थेत संपत्ती, आरोग्य, संतती इत्यादी फले प्राप्त करून घेण्यासंबंधीचा विचार एवढे मर्यादित मानले पाहिजे.
 वेदान्त विचाराची पुष्टी वेगवेगळ्या क्षेत्रांत अनपेक्षितपणे होत आहे. सर्वसामान्य माणसांना दूरवरचे दिसत नाही, त्यांना आपले हित कळत नाही, त्यामुळे अवघे जन मोठ्या संकटात आणि दुःखात सापडलेले असतात असा टाहो बहुतेक सर्व समाजसुधरीणांनी फोडला. संसार - दुःखातून लोकांची मुक्तता करावी, त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवावा म्हणून धर्मक्षेत्रात अनेक अवतार, प्रेषित, बाबा आणि महाराज झाले. सर्व विश्वाचा निर्माता आणि पालक जो परमेश्वर त्याच्यात आणि सामान्य माणसात संबंध जुळवून देणाऱ्या 'अडत्यांच्या वखारी' त्यांनी घातल्या. या वखारी आता राजकारणापुरत्या उपयोगाच्या राहिल्या आहेत. विश्वाची उत्पत्ती आणि चलनवलन यांचे गूढ उलगडण्यासाठी धर्मवाद्यांकडे कोणी जात नाही. ती जबाबदारी आता विज्ञानाने घेतली आहे. धर्म विज्ञानाचे साधन राहिलेला नाही. तसेच नैतिकतेचेही नाही. धर्मशास्त्राने रूढ केलेली नीतिमत्ता निरर्थक झाली आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी मान राखणे ही नैतिकतेची नवी व्यक्तिनिष्ठ व्याख्या सर्वमान्य होते आहे.
 धर्मकारणात 'अडत्यांचा' पराभव झाला तसाच अर्थकारणातही झाला आहे. सामान्यजनांना आपले हित समजत नाही. स्वर्थासाठी ते धडपडतात; त्यांची धडपड परस्पर विरोधी असते. त्यामुळे एकूण समाजाचे नुकसान होते, ते टाळायचे असेल तर अर्थव्यवस्थेचे नियोजन झाले पाहिजे असा विचार अनेकांनी मांडला. समाजवादी, कल्याणवादी, नेहरूवादी वेगवेगळ्या पंथांनी सम्यक् आणि सूक्ष्म यात मूलभूत विरोध, एवढेच नव्हे तर संघर्ष आहे असे मांडून नियोजनाचा पसारा मांडला तो आता सारा ढासळून गेला आहे.
 पर्यावरणवादी सोडल्यास सम्यक् आणि सुक्ष्म यात मतभेद असल्याचे आता कोणी मांडत नाही. हा वेदान्त तत्वज्ञानाचा मोठा विजय आहे.
 व्यक्तीची संघावर मात
 संघशक्ती मागे पडत आहे. व्यक्तीचा उदय होत आहे. 'कलौ संघे शक्तिः' हे वचन मानले. तर कलयुग संपले आहे, असे समजावे लागेल. आर्याचा वेदांमध्ये सांगितलेला धर्म हा संघाचा धर्म आहे. ज्यु, ख्रिस्ती, मुसलमान हेही संघधर्म आहेत. या सर्व संघधर्मांचा पराभव होतो आहे. उद्योजकांच्या नव्या युगात व्यक्तीनिष्ठ वेदान्त तत्वज्ञानाचा म्हणजे साम्यक् आणि सूक्ष्म यास अभिन्नत्व उदय होतो आहे.
 भारतीय जनता पार्टीच्या प्रात्सोहानाने अर्थशास्त्र लेखन कामाठीस भिडलेल्या विद्वानांना वेद मान्य आहे, असे दिसते; पण उपनिषिदे मान्य आहेत किंवा नाहीत याबद्दल स्पष्ट संख्येत मिळत नाहीत. उपनिषदांचे अर्थशास्त्र अजून कोणी मानलेले नाही. 'पिंडी तेच ब्रह्मांडी' असल्यामुळे मध्यस्थ नियोजकांची आवश्यकता नाही. प्रत्येक व्यक्तीने आपले व्यक्तिमत्व प्रमाण मानून धडपडत राहवे. कोट्यवधी प्रणिमात्रांच्या अशा धडपडीतून त्यांनी केलेल्या चूकांमधून, सुधारनातून सर्व समाजाचे एवढे नव्हे तर, सर्व विश्वाचा हेतू साध्य होतो, थोडक्यात स्वतंत्र्य, अर्थव्यवस्था हे उपनिषदांचे अर्थशास्त्र आहे आणि गंमत अशी, की हिंदुत्वाचा झेंडा मिरविणारे त्याचा विरोध करत आहेत. संघर्ष उघड उघड एका बाजूला वेध आणि दुसऱ्या बाजूला वेदान्ताचा शेवट करणारी उपनिषदे असा आहे.

(१९ नोव्हेंबर १९९३)
■ ■