अन्वयार्थ - १/श्रीकृष्णाविना वस्त्रहरण


श्रीकृष्णाविना वस्त्रहरण


 "भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना पांडव स्तब्ध राहिले, तशीच आमची स्थिती अयोध्येत मस्जिद पाडण्यात आली त्या वेळी झाली. पांडवांप्रमाणे मर्यादेने आम्ही बांधले गेलो कारण आम्हाला घटनेचे रक्षण करायचे होते." इति प्रधानमंत्री पी. व्ही. नरसिंह राव लखनौ येथील निवडणूक प्रचाराच्या सभेत भाषण करताना!
 उत्तर भारतात भाषण करायचे म्हणजे रामायणाचा उल्लेख करत करत, तुलसी रामायणातील वचने उद्धृत करत करत करावे लागते, तरच ते लोकांना समजते. रामायण, महाभारताचा संदर्भ दिल्याखेरीज वक्ता खरे बोलतो आहे असे लोकांना वाटतच नाही. न. वि. गाडगीळ यांनी ४० वर्षांपूर्वी हा अनुभव घेतला. उत्तर भारतातील सभांचा अनुभव असलेल्यांना हे चांगले ठाऊक आहे. तेथे भाषणाला जायचे म्हणजे कट्टर डावेसुद्धा रामायण, महाभारतातील काही कथांशी, बादरायणी का होईना संबंध जोडतात; मग नरसिंह रावांनी महाभारताचा संदर्भ द्यावा यात आश्चर्य ते काय?
 महापंडित वदले
 लखनोच्या काँग्रेसच्या सभेचे वातावरणही उत्साहाने धुंद झाले होते. मुलायमसिंगांच्या मेळाव्यापेक्षा काँग्रेसचा मेळावा अधिक मोठा भरल्यामुळे काहीसा कैफ चढलेलाच होता. प्रधानमंत्री येणार म्हटल्यावर त्यांची भरमसाट स्तुती करण्याची काँगेसजनांची परंपरा आहे. ती स्तुती ऐकून घेण्याची, त्यामुळे खुष होण्याची आणि खुषमस्कऱ्यांना यथाकाल, यथोचित बक्षिसी देण्याची पंतप्रधानांची परंपरा आहे. 'राव'साहेबांचे स्वागत 'महापंडित' इत्यादी स्तुतिसुमनांनी झाले. त्यामुळे आपले पांडित्य दाखवण्याची जबाबदारी 'राव' साहेबांवर पडली; म्हणून कदाचित त्यांनी द्रौपदी वस्त्रहरणाचा उल्लेख केला असावा. कदाचित, रामायण, महाभारतावर केवळ भाजपाचा हक्क आहे असे नाही. आपणही त्यासंबंधी बोलू शकतो हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक वस्त्रहरणाचे रूपक वापरले असावे.
 "इतिहासाची पुनरावृत्ती होते, पहिल्या वेळी शोकांतिका म्हणून आणि दुसऱ्या वेळी प्रहसन म्हणून" असे मार्क्सचे वचन आहे. इतिहासातील कोणताही प्रसंग जसाच्या तसा पुन्हा घडत नाही. द्रौपदी वस्त्रहरण एका शोकांतिकेची नांदी होती. ६ डिसेंबरचा प्रसंग कदाचित शोकांतिका ठरेल; पण 'राव'साहेबांचे विधान मात्र विदुषकी प्रहसनासारखे आहे.
 असली रूपके फार ताणायची नसतात. ती सर्वतोपरी शंभर टक्के लागू पडतील अशी अपेक्षाही नसते; पण दिलेल्या उदाहरणात आणि प्रत्यक्ष प्रसंगात काही निदान साम्य असायला पाहिजे.
 ते महाभारत आणि हे महाभारत
 महाभारतात द्रौपदीला भर दरबारात विवस्त्र करण्यासाठी दुर्योधन, दुःशासन उठले. धृतराष्ट्र, गांधारी, द्रोण, भीष्म आदी गुरुजन आतंक पाहत राहिले. द्रौपदीने युक्तिवाद केला, "माझे पती दास झाले हाते, दासांना आपली पत्नी द्यूतात पणाला लावण्याचा अधिकारच नव्हता." तिच्या शास्त्रार्थाकडे कोणी लक्ष दिले नाही. दुर्योधनाने तिच्या वस्त्राला हात घातला, तिचे केस मोकळे केले; पण द्रौपदीचा धावा ऐकून श्रीकृष्णाने असा चमत्कार केला, की वस्त्र फिटता फिटेना... अशी महाभारतातील थोडक्यात कहाणी आहे. श्रीकृष्णाच्या हस्तक्षेपाचा भाग तत्कालीन सेन्सॉरने बळेच घुसवला असावा. श्रीकृष्ण खरोखरच मदतीला धावून आला असता तर कौरवांची तिथेच फजिती झाली असती आणि मग पुढचे सूडाचे महाभारत घडण्याचे काही कारणच नव्हते.
 श्रीकृष्ण गैरहजर
 अयोध्येतील द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी कोणी श्रीकृष्ण धावून आला नाही. एवढेच नव्हे तर भर दरबारात पुरा बलात्कार झाला. खऱ्या महाभारतात श्रीकृष्ण मदतीला धावून आले नसते तर पांडव स्तब्ध बसून राहिले असते काय? या प्रश्नाचे उत्तर मोठे कठीण आहे. 'राव'साहेबांच्या रूपकात एवढा तरी फरक मान्य केला पाहिजे. काँग्रेसी पांडवांच्या पाठीशी कोणी कृष्ण उभा नव्हता.
 द्रौपदी वस्त्रहरणाचा दोष पांडवांकडे येतोच धर्मराजा जुगारी. केवळ जुगाराच्या कैफात सगळे हरून द्रौपदीला पणाला लावून तीही हरण्याइतकी धर्मराजाची बुद्धी झालेली. रावसाहेबांच्या रूपकातला हा एवढाच भाग खरा आहे. अयोध्येची द्रौपदी काही एकदम भर दरबारात खेचली गेली नाही. पाच वर्षे एक एक क्षणाने तिच्या वस्त्रहरणाचे नाटक पुढे सरकत होते आणि तरीही आधुनिक पांडव उघड्या डोळ्यांनी सगळे काही पाहत राहिले.
 धर्मराज रावसाहेब
 काँग्रेस सरकार पांडव म्हणजे भाजपा, शिवसेना, बजरंगदल, विश्व हिंदू परिषद, हे सगळे कौरव असे रूपक ओघानेच आले. या कौरवानी ६ डिसेंबर १९९२ रोजी एक नाही दोन द्रौपद्यांचे वस्त्रहरण केले. मस्जिद पाडलीच; पण त्याबरोबर भारतीय संघराज्याच्या घटनेचेही वस्त्रहरण केले.
 रावसाहेब म्हणतात, "काँग्रेसी पांडव स्वस्थ राहिले कारण त्यांनी घटनेची मर्यादा होती. सरकार पांडव म्हणजे 'राव'साहेब धर्मराज हे उघडच आहे. आपण मोठे सत्यप्रिय, निष्कलंक चारित्र्याचे, सदा सत्यवचनी असा जो टेंभा मिरवायचा; पण प्रत्यक्षत कसोटीच्या प्रसंगी ज्याचे हीन चारित्र्य उघडे पडायचे तो धर्मराज. जुगारी, द्रौपदीच्या लालसेने कुंतीच्या अनवधानाने उच्चारलेल्या 'सगळ्यांनी वाटून घ्या' या आदेशाचा गैरफायदा घेणारा आणि प्रसंगी 'अश्वत्थामा मेला' असे मोठ्या आवाजात बोलून हळूच 'हत्ती' असे कुजबुजणारा धर्मराजा. 'राव'साहेब म्हणजे धर्मराज ही उपमा काही वाईट नाही. किंबहुना 'अश्वत्थामा मेला' यापेक्षा असत्य वचनात आपण अधिक प्रवीण आहोत हे रावसाहेबांनी सिद्ध केले आहे."
 घटनेची कोणती मर्यादा, कोणते कलम मशिदीचे रक्षण करण्यापासून त्यांना थांबवत होते? उलट मशिदीचे रक्षण करणे हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य होते. काय पडेल ती किमत देऊन त्यांनी आपले कर्तव्य पार पाडायला पाहिजे होते. ते पाडले नाही. उलट घटनेच्या मर्यादांमुळे आम्हाला काही करता आले नाही असा त्यांचा कांगावा चालू आहे. 'राव' साहेब धर्मराज शोभतात खरे!
 अर्जुन सिंग
 कौरव कोण ते ठरले. धर्मराज कोण हेही समजले. अर्जुनाची भूमिका अर्जुनसिंगांकडे जावी. केवळ नाव सारखे असल्यामुळे नाही. अर्जुनाचे द्रौपदीवरचे प्रेम यथायथाच होते, द्रौपदीच्या अपमानाने तो फारसा कधी क्षुब्ध झाला नाही. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा राजकीय उपयोग करून घेण्याचा अर्जुनसिंगाचा प्रयत्न आणि त्यात अर्जुनासारखे नव्हे तर बृहन्नडेसारखे त्यांनी दखवलेले शौर्य पाहता, अर्जुनसिंग अर्जुन ही उपमेय उपमानाची जोडी फारशी वाईट नाही. रावसाहेबांच्या धर्मराजला अर्जुनसिंगापेक्षा पराक्रमी अर्जुन कोठून मिळायचा?
 कनिष्ठांची दुक्कल
 नकुल-सहदेव ही दुक्कल साऱ्या महाभारतात फारसे काहीच करीत नाही; पण पाच पांडवात त्यांची मोजणी मात्र होते. शंकरराव चव्हाण अयोध्येतील वस्त्रहरणाच्या वेळी दिल्लीत बसून होते आणि शरद पवार वस्त्रहरण होणार अशी निश्चित बातमी कळल्यामुळे वस्त्रहरणाच्या चित्रीकरणाच्या खटाटोपास लागले हाते. तेव्हा शंकरराव, शरदराव ही जोडी नकुल सहदेवाच्या जागी फिट बसावी.
 बलभीम कोण? दाऊद इब्राहिम?
 कमतरता पडते ती फक्त बलभीमाची. या सगळ्या पांडवांत बलभीम कोणीच दिसत नाही. वस्त्रहरणाच्या वेळी संतापाने डोळे रक्तासारखे लाल झालेला, मुठी करकचून आवळणारा, दातओठ करकचून चावणारा बलभीम ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत काणीच नव्हता. वस्त्रहरणाच्या प्रसंगानंतर आपल्या मनातील धगधगती सूडाची इच्छा द्रौपदीने फक्त एक पांडवांना सांगितली, धर्मराजाला नाही, अर्जुनाला नाही, फक्त भीमाला. वस्त्रहरणाच्या आठवणीने जळत राहिला ती फक्त बलभीम. दुःशासनाने द्रौपदीला दाखवलेली मांडी फोडून तथील रक्त घटाघटा पिण्याची आणि द्रौपदीचे मोकळे झालेले कसे त्या रक्ताने माखवून मग तिची वेणी घालण्याची घनघोर प्रतिज्ञा करणारा आणि ती निर्धाराने पार पाडणारा भीम. 'राव'साहेबांच्या पांडवात भीम कोण? दाऊद इब्राहिम?
 शरदरावांचा तिहेरी रोल
 शरद पवार यांची मुख्य भूमिका सहदेवाची; पण त्यांच्यात थोडा अर्जुनही आहे. कुरुक्षेत्रावर उभे राहिल्यानंतर अर्जुनाला दोन्हींकडे आप्तबांधव दिसू लागले. शरदरावांचे स्नेहीजन पांडवांपेक्षा कौरवांतच जास्त बसलेले. या महाभारताच्या नौटंकीत शरदरावांकडे एक तिसरी भूमिकाही येण्याची शक्यता आहे. द्रौपदीच्या अपमानाने संतापून काही प्रतिशोध बलभीमाच्या हिरीरीने घेतला तो दाऊद इब्राहिम आणि पप्पू कलानी, ठाकूर संबंधांतून शरदरावांचा या आधुनिक भीमाशी स्नेहसंबंध स्पष्ट आहे. एकाच वेळी सहदेव, विषादातील अर्जुन आणि भीमाचा साथीदार अशी तिहेरी भूमिका शरदरावांकडे दिसते.
 एका उज्ज्वल शोकांतिकेचे रूपक एखाद्या आधुनिक लज्जास्पद घटनेवर केले, की अशा गमतीशीर तुलना घडू लागतात.
 'राव'साहेब प्रमुख पांडवांच्या बरोबर कृष्ण नाही. आहेत ते भीम, पांडव उघडपणे आपला म्हणायला तयार नाहीत आणि शेवटी 'राव'साहेबांच्या रुपकातील कुंती कोण? याचे उत्तर मोठे कठीण आहे. जी चार पाच उत्तरं संभवतात त्यांचा विचार केला म्हणजे 'राव'साहेबांची तुलना अगदीच गचाळ आहे असे वाटते.
 पुत्र नव्हे मलमूत्र
 महाभारतातील कुंती धर्मराजाचे ढोंग, धूर्तपणा, निष्क्रियता, वाचाळता या अवगुणांमुळे संतापून जाते. असा पुत्र असून काय उपयोग? त्यापेक्षा नसलेला बरा. अशी ती त्याची निर्भर्त्सना करते तरी, धर्मराजाची शांती ढळत नाही. तेव्हा कुंती त्याला संतापाच्या अतिरेकात म्हणते, "तू माझ्या पोटातून आलास म्हणून तुला पुत्र म्हणायचे; पण पोटातून पुत्रच येतो असे नव्हे, धर्मराज! तू पुत्र नव्हे, मलमूत्र आहेस."
 आधुनिक घटनेतील कुंती कोणीही असो, धर्मराजाच्या या आधुनिक आवताराला उद्देशून ती हेच बोलली असती. द्रौपदी वस्त्रहरण उपमा देताना 'राव'साहेबांना महाभारतातील या कुंतीच्या उद्गारांचीही माहिती असणारच, कारण ते 'महापंडित' आहेत!

(२९ ऑक्टोबर १९९३)
■ ■