अन्वयार्थ - १/सुखशांतीचा राजीनामा


सुख शांतीचा राजीनामा


 मुंबईतील एक जुने पत्रकार मित्र बरेच दिवसांनी भेटले. भेटल्याबरोबर त्यांनी इंग्रजीत प्रश्न विचारला, "शरदराव तुमचे हिरो कोण?" पत्रकार मी भेटल्यावर साधारणपणे शेती, शेतकरी, शेतकरी संघटना यांबाबत प्रश्न विचारतात. क्वचित राजकीय परिस्थिबद्दल माझे मत विचारतात; पण असे वैयक्तित प्रश्न क्वचितच विचारतात.
 "ही काय नवीन विचारपूस चालली आहे?" मी विचारले. पत्रकार मित्र मुंबईतील एका प्रख्यात इंग्रजी दैनिकात एक नवीन सदर चालवीत आहेत. सदराचे नावच 'माझे आदर्श' किंवा माय हिरो असे आहे. जान्यामान्या लोकांना त्यांच्या आदर्श व्यक्ती कोणत्या त्याबद्दल विचारून त्या त्यांना का आदर्श वाटतात याबद्दल थोडक्यात टिप्पणी या सदरात होते. हिरो या शब्दाचा मराठीत अनुवाद निदान सिनेमा आणि नाट्यसृष्टीत नायक असा होतो; पण अमूक अमूक व्यक्तीला मी हिरो मानतो याचा व्यवहारात अर्थ असा होतो, की अशा व्यक्तीला मी केवळ निर्दोषच नव्हे तर काही प्रमाणात अलौकिक मानतो. आपापल्या हिरोषियी बोलताना लोक डोळे विस्फारून आणि भावनाविवश होऊन बोल लागतात. माझ्याबाबतीत जिच्या चरणी लीन व्हावे, तिचे अक्षरनअक्षर प्राणपणाने झेलावे आणि ब्रह्मवाक्य मानावे, जिचे सगळे चारित्र्य आदर्श मानावे अशी व्यक्ती विभूती कोणीच नाही.
 मा xxxxx परमपूज्य!
 उलट तारुण्याच्या भरात, शक्तीच्या अमदानीत, महाविद्यालयाच्या पहिल्या काही वर्षांत ग्रंथप्रामाण्य आणि व्यक्तिपूजा यांचा पगडा मुळातून उखडून टाकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. त्या काळात, कोणत्याही व्यक्तीचा किंवा ग्रंथाचा आपल्या मनावर पगडा राहू नये याकरिता मी आणि माझ्या सहाध्यायी मित्रांनी भरकस कोशीश केली आहे. शरीर कमावण्यासाठी एखाद्या पहिलवानाने मेहनत करावी, खुराक घ्यावा तशी आम्हा मेंदूच्या पहिलवानांची धडपड. त्याकाळी चाणक्य आणि आद्य शंकराचार्य या विभूती आणि भगवत्गीता हा ग्रंथ यांच्याबद्दल माझ्या मनात अपार श्रद्धा होती. एकदा सहज माझ्या मनात प्रश्न आला की, "हिंदू ब्राह्मण घरात जन्मलो नसतो तर या व्यक्तींना आणि या ग्रंथाला मी पूज्य मानले असते का?" प्रश्नाचे सरळ आणि प्रामाणिक उत्तर नाही असे आले. मग निष्कर्ष उघड होता. कोणत्याही मार्गाने या विभूती आणि ग्रंथाविषयी मनातील पूज्य श्रद्धाभाव दूर झाला पाहिजे. आमच्या कंपूतील पूज्य मित्राने युक्ती सुचवली. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा या व्यक्तींची किंवा ग्रंथांची नावे आपण घेऊ तेव्हा नावाच्या आधी एक अपशब्द वापरायचा! या युक्तीचा परिणाम लवकर दिसून आला. थोडक्यात, मनात कोणाला विभूतीस्थान नसावे याकरिता खास मेहनत घेतलेला मी माणूस आहे.
 आदराऐवजी असूया
 माझ्या कोणी विभूती नाहीत; पण अनेक लोकांबद्दल आणि त्यांच्या कामाच्या काही अंगाबद्दल मला भरपूर आदर आहे किंबहुना अशा काही व्यक्तींविषयी माझ्या मनात मत्सराची भावना आहे. डार्विनच्या जागी आपण असतो आणि 'बिगल' बोटीवर निम्म्या जगाचा प्रवास करताना सापडलेल्या एकेक अवशेषाच्या पुराव्याची सांगड जोडता जोडता उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्याला मांडायला मिळाला असता तर केवढा आनंदा झाला असता. लायोनेल रॉबिन्स किंवा लॉर्ड केन्स यांच्या प्रभुत्वाने, शैलीदार गद्यात, अर्थशास्त्रातील अगदी कूट समस्यांचे हळूवार पायरी पायरीने विश्लेषण करीत करीत प्रचलित समजुती आणि सिद्धांत पार उलथवून टाकण्याचे आपल्याला जमले असते तर, अशा कल्पनांनी माझ्या तोंडाला पाणी सुटले. आर्ट बुखवाल्ड, अमेरिकन व्यंगकार दररोज एक ३०० शब्दांचा लेख नर्म विनोदासह, खुसखुशीत भाषेत, त्या दिवशीच्या ताज्या घटनांच्या संदर्भात आणि अचूक मर्मभेद करणारा असा वर्षानुवर्षे लिहितो आहे. असे आपल्याला काही जमले पाहिजे, अशी असूया मला सतत वाटते. टाईम्स ऑफ इंडिया उघडावा आर.के. लक्ष्मणचे व्यंगचित्र पाहावे आणि त्या दिवशीच्या घडामोडीवर त्यांचे व्यंगचित्र पाहिल्यानंतर, "अरे, हे आपल्याला का नाही सुचले?" असे म्हणून ती अनेकदा स्वत:च्याच थोबाडीत मारून घ्यावी. गाण्यातील काही कळत नसूनही भीमसेनांचे गाणे ऐकताना सगळा रसिकवृंद ज्या तल्लीनतेने डोळ्यात प्राण आणून त्यांच्याकडे बघतो ते पाहिल्यावर जनसमुदायावर अशी मोहिनी टाकण्याची एखादी विद्या आपल्याला येत असती तर असे सहज वाटून जाते. एक अपवाद थोरल्या महाराजांचा. त्यांच्या जागी आपण असल्याची कल्पना करणेदेखील अक्षम्य पाप वाटते. पु.लं.च्या 'गुळाचा गणपती' कथेतील नायक आपण कधी गायक, कधी चित्रकार, कधी निष्णात शल्यचिकित्सक असल्याच्या कल्पना करतो आणि स्वतःच्या कल्पनासृष्टीत रंगून जातो. 'याच्या जागी आपण असतो तर!' असा सुखद विचार ज्यांच्याबद्दल येतो त्या माझ्या विभूती. माझ्या लेखी याच्यावरचे पद नाही.
 कोण बाबा महाराजांच्या कृपेने किंवा चमत्काराने भारून गेलेले भक्तलोक बाबांचा विषय निघाला, की थोड्या दबलेल्या आवाजात गंभीपणे बोलू लागतात, अशा तऱ्हेची विभूतीपूजा आता फक्त भक्तमंडळीतच दिसते. विज्ञानयुगात अशी विभूतीपूजा मतिमंदातच सापडायची! ज्यांची विचारशक्ती अजून शाबूत आहे त्यांच्या बाबतीत विभूतीतत्त्वाची कमाल मर्यादा म्हणजे यांच्यासारखे आपल्याला जमले असते तर! असे ज्यांच्याबद्दल वाटते त्या विभूती.
 मनाचा सहज कौल, 'अल्ड्स हक्सले'
 पत्रकार मित्रांना माझ्या या असल्या लांबलेल्या प्रस्तावनेत काहीच स्वारस्य नव्हते. "पण तरी तुमचे हिरो कोण?" विचार करायला फारसा वेळ नव्हता. आयुष्यात भेटलेल्या किंवा पुस्तकरूपाने परिचय झालेल्या व्यक्ती आणि इतिहासाच्या पानात ज्यांच्या यशोगाथा अजरामर झाल्या आहेत अशा अनेक नावांची यादी करावी. मग त्यात प्राथमिक छाटणी, दुय्यम छाटणी असे करीत करीत नेमके उपान्त्य फेरीपर्यंत पोचलेल्या लोकांची नावे काढावी, असे सगळे व्यवस्थितपणे करायला फुरसदच नव्हती. नावे दोन चार सेकंदात नेमकी निवडणे अशक्यच होते, तरी मी उत्तर दिले आणि जे उत्तर माझ्या तोंडून आले त्याने माझे मलाच आश्चर्य वाटते आहे.
 उत्तर बारकाई विचार करून दिलेले नाही. ते असेच माझ्या तोंडून निघाले. आता विचार करायला बसलो तर मला ज्यांच्या जागी असणे आवडले असते. अशा व्यक्तींची लांबलचक यादी करता येईल. ज्योतिबा फुले, हो ची मिन्ह, मार्गारेट थॅचर, अहिल्याबाई होळकर अशी कितीतरी नावे जमा होतील; पण ऐनवेळी मी पहिले नाव दिले ते 'अल्डस हक्सले' यांचे.
 मोठे उत्तर आणि मुलाखत वर्तमानपत्रात छापून आली. रंगीबेरंगी फोटो माझाही आणि 'अल्डस हक्सले'चाही आणि मला अगदी धन्य धन्य वाटले. हक्सले यांना मनातील पहिली विभूती म्हणून उत्स्फूर्तपणे मी का जाहीर केले? याचा माझा मीच शोध घेतो आहे!
 अल्डस हक्सले, गर्भश्रीमंत उमरावांच्या घराण्यात जन्मलेले; पण सगळेच खानदान मोठे विचारवंतांचे. वडील थॉमस हक्सले निसर्गशास्त्रज्ञ. माकडापासून मनुष्याची निर्मिती झाली हा सिद्धांत डार्विनने मांडल्यावर या दोन प्राण्यांमधील साधर्म्याचा मोठ्या चतुरस्त्र प्रतिभेचे. एकाच वेळी जीवशास्त्रज्ञ असून त्यांनी इंग्लंडच्या राजकारणात मोठी महत्त्वाची भूमिका बजावली. डार्विनच्या प्रमेयांची सखोल विचक्षणा करून त्यांनी जी मांडणी केली तीच आज उत्क्रांतीवादाची अधिकृत मांडणी समजली जाते.
 अशा घराण्यात अल्डस हक्सले यांचा जन्म १८९४ साली झाला. बाप आणि वडीलबंधू यांची शास्त्रीय जिज्ञासू बुद्धी त्यांचेकडेही होती; पण बुजूर्गांची पद्धत शांतपणे संशोधन करण्याची. अल्डस हक्सले यांची बुद्धिमत्ता काहीशी विक्षिप्त तरुणपणी ते काहीसे मार्क्सवादी होते. नंतर त्यांनी शास्त्रविषयक चमत्कृतीजन्य लिखाणही केले आणि आयुष्याच्या शेवटी अध्यात्माचे मोठे जिज्ञासू अभ्यासक झाले. स्वतःच्या एका कादंबरीच्या प्रस्तावनेत त्यांनी तरुणपणी मार्क्सवादी, मध्यम वयात विज्ञानकथा लेखक आणि उतारवयात वेदांती बनणाऱ्या लोकांची येथेच्छ टिंगल केली आहे.
 मेस्कॅलिन आणि कुंडलिनी
 अल्डस हक्सले यांच्या जन्माच्या आठच वर्षे आधी जर्मनीत निवडुंगापासून काढलेल्या एका अर्काचा माणसाच्या ज्ञानेंद्रियावर आणि विचारशक्तीवर परिणाम होतो असे सिद्ध झाले; पण अशा द्रव्यांचा नेमका परिणाम काय होतो? ऐकण्यात, पाहण्यात, स्पर्शात, वासात नेमका काय फरक पडतो? माणसाच्या अनुभूतींची आणि तर्क शक्तींची धार कमी होते की जास्त? याचा नेमका अभ्यास करायचा कसा? पोटॅशिअम सायनाईड म्हणजे महाभयाक विष. जिभेवर थेंब पडताच मनुष्य मरून जातो. तरीदेखील त्याची नेमकी चव जगाला कळावी याकरिता काही शास्त्रज्ञांनी स्वतःवर प्रयोग करून घेतले आणि मरण्यापूर्वी कागदावर चवीचे वर्णन करणारे शब्द दोन शब्द लिहिण्याची धडपड केली अशी कथा (कदाचित दंतकथा) आम्ही ऐकली होती. मेस्कॅलिन या द्रव्याचा माणसाच्या ज्ञानसंस्थेवर काय परिणाम होतो? याचा प्रयोग करायला अल्डस हक्सले पुढे झाले. मनुष्य जातीचे भाग्य असे की, हा प्रयोग त्यांच्यासारख्या प्रज्ञावंत प्रतिभाशाली सिद्धहस्त गद्यशैली लेखकाने केला. त्यांचे अनुभव त्यांनी एका पुस्तकात प्रसिद्ध केले आहेत. कोणी ऐरागैरा स्वत:वर प्रयोग करून घ्यायला तयार झाला असता तरी होणाऱ्या संवेदनातील फरक इतक्या तरलतेने आणि बारकाव्याने मांडणे त्याला जमलेच नसते.
 कुंडलिनीयोगाचा अनुभव सांगणारे, पद्मासन घालून बसले आणि काही मुद्रा घेतल्यानंतर गुरुचा प्रसाद लाभला तर काय अननुभूत ब्रह्मानंदाचा अनुभव येतो त्याचे वर्णन करतात. काही संवेदना कुंडलिनीयोगात येत असतील; पण त्या अनुभूतीचा संबंध चिद्तत्त्वाशी आहे असे निश्चयपूर्वक कसे सांगता येईल? सांगणाऱ्याचा अभ्यास काय? अधिकार काय? कुंडलिनीचा अनुभव घेतल्यानंतर फल्डस हक्सले कदाचित म्हणाले असते, हा अनुभव अमुक अमुक द्रव्य अमुक अमुक प्रमाणात घेतल्यानंतर येणाऱ्या अनुभवासारखा आहे. ज्यांचा पुर्वानुभव काहीच नाही अशा ब्रह्मवाद्यांनी या विषयावर बोलणे खरे म्हणजे अनुचितच. त्यासाठी अल्डस हक्सलेचा अधिकारच हवा!
 नवे शूर जग
 पण अल्डस हक्सले जगभर गाजले ते त्यांच्या 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' या कादंबरीने. उद्याच्या नव्या शूर जगात काय असेल याचे वर्णन करणारी ही काही विज्ञानकथा नाही. अगदी प्रगत अशा मनुष्य समाजानेसुद्धा आज जी काही मूल्ये आणि जे काही आदर्श बाळगले आहेत त्यांचाच पाठपुरावा केला गेला तर काय विचित्र जग तयार होईल याचे मोठे विदारक चित्र या कादंबरीत आहे. माणसाला सुख पाहिजे, शांती पाहिजे आणि त्यासाठी तो उपभोगांच्या मागे लागला आहे. त्यातून काय होईल? हक्सलेच्या कथानकात एक मोठे महायुद्ध होते. जगाचा जवळजवळ विध्वंस होतो आणि विध्वंसानंतर नव्या जगाची उभारणी काही मंडळी हाती घेतात. ज्यामुळे युद्धाची आपत्ती ओढवली ते सगळे टाळून सर्व यच्चयावत प्राणीमात्र सुख, शांती, समाधानात जगतील असे जग त्यांनी उभे केले. विज्ञानाच्या आधाराने सुखी व्हायचे असेल, तर माणूसच बदलला पाहिजे, त्यासाठी प्रजोत्पादन आणि प्रशिक्षण बदलल्याखेरीज प्रजा सुखशांतीने नांदू शकणार नाही. नव्या शूर जगात संभोगाच्या अपरिमित शक्यतांना उत्तेजन देऊनही बाळांचा जन्म कारखान्यातच होतो. जगाच्या संचालकांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे प्रत्येक बाळाला त्याच्या नियोजित भवितव्याप्रमाणे जन्माच्या आधीपासून शिकवण दिली जाते. एक चातुर्वर्ण्य तयार केले जाते; पण गर्भावस्थेपासून मिळवलेल्या शिकवणुकीमुळे खालच्या वर्णाचे लोकही तक्रार करीत नाहीत. अशी नव्या जगाची मांडणी आहे.
 धोका टळला?
 काल परवापर्यंत हक्सलेचे 'नवे शूर जग' प्रत्यक्षात घडणार अशी भयानक चिन्हे स्पष्ट दिसत होती. गेल्या दोन चार वर्षातच काही शुभचिन्हे दिसू लागली होती. नियोजनाच्या व्यवस्था कोसळून पडत आहेत. केवळ सुखशांतीच्या मागे लागणारी बाहुली नाही तर स्पर्धेच्या वेदना सोसूनही स्वतःची स्वतःवरील निष्ठा जपण्यासाठी झुंजायला आनंदाने तयार होणारी उद्योजकांची पिढी पुढे सरसावत आहे. असे व्हावे हे अल्डस हक्सले यांचे स्वप्न होते. या कारणाने तर विभूती म्हणून त्यांचे नाव माझ्या जिभेवर सहज आले नसेल!

■ ■