अन्वयार्थ - १/हिंदू नसल्याचा अभिमान



हिंदू नसल्याचा अभिमान


 १९५१ मध्ये विनोबाजींनी लिहिलेला एक लेख अलीकडच्या 'साम्ययोग'च्या अंकात पुन्हा छापण्यात आला आहे. 'हिंदू धर्माचा आशय' हे त्या लेखाचे नाव आहे. १९४९ मध्ये तुरुंगात असताना विनोबाजींनी स्वतःच्या चिंतनासाठी हिंदू धर्माची व्याख्या तयार केली होती. या व्याख्येत त्यांचे स्वतःचे असे काही वैशिष्ट्य नाही, असे विनोबाजी स्वतःच सांगतात. अन्य लोकांनी केलेल्या व्याख्यांमधून काही घेऊन पूर्णता आणण्याच्या दृष्टीने आपण त्यांना जोडले आहे असे विनोबाजींनी म्हटले आहे. हिंदू धर्माची ही व्याख्या स्वतःला समाधानकारक वाटते असेही विनोबाजी म्हणतात.
 हिंदु कोण? तर -
 ज्याची वर्णधर्म व आश्रमधर्म यावर निष्ठा आहे, ज्याचा गोसेवेवर विश्वास आहे, जो श्रुतीला आईप्रमाणे आदरणीय मानतो, जो मूर्तीचा सारखाच आदर करतो, जो पुनर्जन्म मानतो आणि त्यापासून मुक्त होण्याची इच्छा बाळगतो आणि जो सर्व प्राणीमात्रांना सुखकर असा व्यवहार करतो.
 विनोबांनी दिलेली हिंदू शब्दाची व्याख्या ही अशी आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या आधाराने हिंदू धर्माचा सांगितलेला हा आशय मोठा मनोहारी आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा विनोबाजींचा गाढा अभ्यास या एकाच व्याख्येवरून इतका स्पष्ट होतो, की वाचणाऱ्याचे मन थक्क व्हावे.
 राष्ट्रवादी धर्म
 आजपर्यंत हिंदू शब्दाच्या व्याख्या अनेकांनी दिल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री. गोळवलकर गुरुजी यांच्या व्याख्या हिंदू राष्ट्रवाद जोपासण्याच्या बुद्धीने तयार केलेल्या आहेत. समुद्रापासून सिंधुतटापर्यंत सर्व भूभागाला जो आपली मातृभूमी मानतो आणि धर्मभूमी मानतो तो हिंदू अशा प्रकारची व्याख्या मुळातच खोडसाळ आहे. यहुदी, ख्रिश्चन व मुसलमान हे 'जुन्या कराराला' मानणारे तीन धर्म प्रकृतीनेच बहुराष्ट्रीय आहेत. विश्वाची निर्मिती, धारणा आणि अंत यासंबंधी एक विशिष्ट संकल्पना बाळगणारे जगातील यच्चयावत लोक या धर्माचे अनुयायी असू शकतात. यहुदी, ख्रिश्चन, मुलसमान कोणत्याही देशाचे नागरिक असोत, आपापला धर्म मानतात. भौतिक व्यवस्थेबद्दल त्या त्या देशातील नियम, शिस्त इत्यादी पाळली तर इतर बाबतीत आपापल्या धार्मिक संकल्पना ते सर्वोच्च मानतात.
 ज्याला आज 'हिंदू' धर्म म्हटले जाते तो फक्त एकाच देशात आहे. नेपाळचा किरकोळ अपवाद लक्षात घेण्याचे कारण नाही. त्यामुळे यच्चयावत बाबतीत राष्ट्रीय सत्ताच सार्वभौम मानावी हे हिंदू धर्मीयांना साहजिकच आणि सोयीचे वाटते. इतर धर्मीय साहजिकच एक अर्धा डोळा तरी राष्ट्रीय सरहद्दीच्या पलीकडे ठेवून असतात आणि याचे हिंदूंना मोठे वैषम्य वाटते.
 हिंदू धर्माची सावरकरी किंवा गोळवलकरी व्याख्या हिंदू धर्माचा आशय किंवा मर्म मांडण्याकरिता केली नसून, इतर धार्मिकांना प्रामुख्याने मुसलमानांना डिवचण्यासाठी उभारलेली आहे. हिंदुत्वाचा अभिमान मिरवणाऱ्या व त्याचे राजकारण करणाऱ्या कोणीही भारतीय तत्त्वज्ञानाचे मंथन आणि अवगाहन करून त्यातून नेमका मथितार्थ काढण्याची खटपट केली नाही. कारण धर्म हे त्यांचे क्षेत्र नव्हतेच. राष्ट्रवाद हे त्यांचे मैदान, धर्माचा त्यांनी केलेला वापर एक सोय होती, एवढेच.
 फ्रेंच हिंदू आणि कंबोडियन ब्राह्मण
 विनोबांची ही व्याख्या जगापुढे पुन्हा एकदा ठेवण्याचे काम 'साम्ययोग'च्या संपादकांनी केले, याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे.
 मी स्वतःला कधी हिंदू म्हणवून घेतलेले नाही. १९६८ मध्ये मी एक वर्षभराकरिता फ्रान्स देशात राहिलो होतो. विमानतळावर तपासणीच्या वेळी माझा पासपोर्ट पाहून तिथला अधिकारी म्हणाला, "तुम्ही 'ऐद'हून ('इंडिया'चे फ्रेंच रूपांतर) आलात म्हणजे तुम्ही हिंदू आहात." सरळ हो म्हणून मी मोकळा होऊ शकलो असतो; पण 'हिंदू' आणि 'भारतीय' यांतील फरक त्यांना मी समजावत बसलो. फ्रेंच भाषेत भारतात राहणारे ते सगळे हिंदू, मग त्यांचा धर्म कोणताही असो. 'हिंदू' हा शब्द धार्मिक नसून राजकीय आहे.
 याच्या नेमका उलटा अनुभव कंबोडियातील 'अंकोरवट' देवालये पाहताना आला. प्रचंड देवालये. म्हणजे एका एका देवळाचे प्रांगणच कित्येक चौरस मैलाचे. देवालयातील प्रत्येक मूर्तीच्या कपाळावर डोळ्याच्या आकाराचा एक व्रण स्पष्ट दिसतो. वाटाड्याने माहिती पुरवली, या प्रदेशात बौद्ध आणि ब्राह्मण यांच्या लढाया शतकानुशतके चालल्या होत्या. ब्राह्मण जिंकले, की ते बुद्धाच्या मूर्तीच्या कपाळावर तिसरा डोळा कोरून मूर्तीला शंकराची बनवण्याचा प्रयत्न करीत आणि बौद्ध जिंकले म्हणजे ते तिसरा डोळा लिंपून टाकीत.
 मी वाटाड्याला प्रश्न केला, "या लढाया हिंदू आणि बौद्ध यांच्यामध्ये होत होत्या ना?"
 "नाही, नाही," वाटड्याने उत्तर दिले. हिंदू नावाचा धर्म आहे हे त्याने कधी ऐकलेच नव्हते. ब्राह्मण धर्म आहे आणि या धर्माचे लोक भारतातील इतर लोकांवर जरब बसवून अंमल चढवतात असा त्याचा आग्रह होता. ज्योतिबा फुल्यांना त्याचे विवेचन ऐकून आनंद वाटला असता.
 तुम्ही हिंदू आहात?
 डायजेस्ट पद्धतीच्या मासिकात अनेकदा काही प्रश्नावल्या देतात. तुम्ही चांगले विद्यार्थी आहात का? तपासून पाहा. नवरा म्हणून तुम्ही कितपत योग्य आहात? पाहा! अशा प्रकारच्या मथळ्याखाली एक प्रश्नावली देण्यात येते. या प्रश्नांची उत्तरे वाचकांनी शक्य तितक्या प्रामाणिकपणे द्यायची असतात आणि मग दिलेल्या उत्तरावरून गुण मोजता येतात आणि वाचक कसोटीला कितपत उतरला याचा निष्कर्ष काढला जातो.
 विनोबाजींनी दिलेल्या व्याख्येच्या कसोटीला आपण कितपत उतरतो हे तपासून पाहण्याचा मला मोह झाला.
 गोभक्त नाही
 गायीचा भक्त? मी भक्त नक्कीच नाही. मी गायी पाळतो आणि गाय हा एक 'उपयुक्त पशू' आहे असे स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे मानतो. त्याबरोबर गोपालनाचा धंदा किफायतशीरपणे करायचा असेल तर छोटे गोऱ्हे, आजारी गायी इत्यादींचा बोजा संपवणे आवश्यक आहे असे मी इतरत्र लिहिलेले आहे. गोवधबंदीला माझा विरोध नाही; पण त्यासाठी अनुत्पादक गायींच्या पोषणाची जबाबदारी सर्वच समाजाने घेतली पाहिजे, एकट्या दूध उत्पादकांना ती पेलणारी नाही. म्हणजे मी गोभक्त नाही; पण गायींचा मला काही रागही नाही.
 वेदान्ती वेद कसा मानेल?
 श्रुती म्हणजे वेद आणि उपनिषद यांचा गाभा. त्यांना मी मातृवत आदरणीय समजत नाही किंबहुना, कोणतेही एक पुस्तक किंवा एक व्यक्ती संपूर्ण निर्दोष असू शकतच नाही. हा माझ्या विचार करण्याच्या पद्धतीचा पाया आहे. उपनिषदांचे जगभरच्या वाङ्मयात विशेष स्थान आहे. याउलट वेद उपनिषदांपेक्षा वेगळ्या पठडीतील आहेत. उपनिषदांचे 'वेदांती' तत्त्वज्ञान वेदांत सांगितलेल्या संकल्पनांचा उच्छेद करणारे आहे. म्हणूनच त्यांचे 'वेदांत' हे नाव सार्थक आहे असा माझा आग्रह आहे.
 मूर्तिभंजक नाही
 मूर्तीविषयी माझ्या मनात अनादर अजिबात नाही. अलीकडे मी देवळात जातो, पूर्वी जात नसे. नमस्कार वगैरे सहसा करीत नाही वेगवेगळ्या स्थानांतील देवीच्या मूर्ती आणि त्यांच्या डोळ्यांतील बुबुळांची जागा हा माझ्या जिज्ञासेचा एक विषय आहे.
 सर्व धर्माबद्दल माझ्या मनात सारखाच आदर किंवा अनादर आहे. मूळ संस्थापकाच्या काळी प्रत्येक धर्माने एक क्रांतिकारक, ऐतिहासिक कामगिरी बजावली, त्या कामगिरीचा कालखंड संपल्यानंतर बहुतेक धर्मांनी इतिहासाच्या गतीला अडथळे आणण्याचे काम केले. स्वार्थापोटी कोणी केले नसतील इतके अत्याचार, हिंसाचार, बलात्कार, रक्तपात, लूटमार धर्मांच्या नावाखाली घडलेली आहे.
 पुनर्जन्मातून मुक्ती कशी?
 मी पुनर्जन्म मानतो, पदार्थ विज्ञानशास्त्राच्या नियमाने. जडमात्र अविनाशी आहे, तेव्हा पुनर्जन्म या संकल्पनेला कोणी विरोध करू शकेल असे वाटत नाही; पण पुनर्जन्माची ही शास्त्रीय संकल्पना ग्राह्य धरली तर पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका होण्याची काहीही शक्यता राहत नाही. वस्तूचे अविनाशित्व कदाचित अवकाशातील 'ब्लू होल'मध्ये संपत असेल; पण कोणत्याही कर्मकांडाने ते होण्याची काहीही शक्यता नाही.
 विनोबाजींच्या प्रश्नावलीतील आठ प्रश्नांपैकी फक्त प्राणिमात्रांना सुखकारक असे वर्तन ठेवण्याच्या एकाच लक्षणाच्या कसाटीला मी उतरेन असे वाटते. म्हणजे मी लोकांना दुःख देत नाही असे नाही; पण ते दुःख देण्याच्या हेतूने देत नाही. बाकी उरलेल्या सात प्रश्नांपैकी सहा प्रश्नांबाबत माझी परिस्थिती कसेबसे काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी आहे; पण पहिल्या अटीबद्दल मात्र परिस्थिती मोठी कठीण आहे आणि ही अट साधीसुधी नाही. ज्याला आज हिंदू धर्म म्हटले जाते त्याचे एके काळचे नावच मुळी वर्णाश्रमधर्म असे होते. हिंदू धर्मातील इतर कसोट्यांना उतरला नाहीत तरी चालेल; पण वर्णाश्रम धर्मावरील विश्वास सक्तीचा विषय आहे. या क्षेत्रात नापास झाले, की बाकींच्या कसोट्यांना उत्कृष्टपणे उतरूनही काही फायदा नाही. इथे नापास तो नापास.
 मी वर्णधर्म मानत नाही आणि आश्रम धर्मही नाही. चारचौघांप्रमाणे शिकायच्या काळात शिकलो म्हणजे ब्रह्मचर्याश्रमी होतो असे नाही. आज संसारातील आणि सार्वजनिक जबाबदारीतील कामे टाकून वानप्रस्थी झालो आहे असेही नाही आणि हातात दंड घेऊन, भगवी वस्त्रे परिधान करून संन्यासी होण्याचा माझा आजतरी विचार नाही. आयुष्याची इतकी रोखठोक आणि सुबक कालविभागणी करता येते हे मला मान्य नाही. अशी विभागणी करायची झालीच तर ती ज्याने त्याने स्वतःसाठी केली पाहिजे, कुणा ढुढ्ढाचार्याने सांगितले म्हणून ठरावीक काळानंतर आश्रम बदलायचा ही कल्पना मला हास्यास्पद वाटते.
 वर्णधर्म अशीच अडचण उपस्थित करतो. रूढीनुसार जन्माच्या अपघाताने वर्ण, जात ठरवण्याची अमानुष पद्धत बाजूस राहू द्या; पण अगदी गुण आणि कर्म किंवा जन्म, शिक्षण आणि परिस्थिती यामुळे कोणाही एका माणसाकडे जन्मभर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांपैकी एकाच तऱ्हेची जीवनशैली मूत्यूपर्यंत राहावी ही कल्पनाच मला निव्वळ अडाणीपणाची वाटते.
 विविधता म्हणजे जीवन
 मी आश्रम बदलले नाहीत; पण वर्ण बदलले आहेत. मी शिकलो आहे, शिकवले आहे म्हणजे ब्राह्मणवर्णी राहिलो आहे. मी नोकरी केली आहे, त्यातील काही क्षत्रियधर्माची म्हणता येईल, काही वैश्य धर्माची. गेल्या तपावर मी कुणबी बनून शूद्र वर्णाचा स्वीकार केला आहे आणि औपचारिक ब्राह्मणवर्गात जेवढी विद्या मिळाली नाही तेवढी विद्या या शूद्र वर्णाच्या कालखंडात मला मिळाली.
 आयुष्य विविधतेने नटलेले आहे. त्याचा सर्वांगाने आणि सर्वपरीने अनुभव घ्यावा यात आयुष्याचे सार्थक आहे. यापेक्षा मनुष्यप्राणी अधिक काही दुनिया समजण्यासाठी करू शकत नाही याची मला खात्री पटली आहे. आयुष्य लाभले तर याहीपलीकडच्या काही वर्णाचा अनुभव घेण्याची माझी इच्छा आहे. एका जन्मात एकच वर्ण हे मी कधीच मानणार नाही, मग त्या कारणाने हिंदुत्वाच्या कसोटीला मी नापास झालो तरी चालेल. या कारणाने कोणी म्हटले की मी हिंदू नाही तर मी म्हणेन, "मी हिंदू नाही आणि त्याचा मला अभिमान आहे!"

(११ मार्च १९९३)
■ ■